७ वर्ष – ४० परीक्षा, आणि DySP बनण्याचा प्रवास…!

DySP Sanket Devalekar Success Story – व्यक्ती काही चुकीच्या व्यक्तींच्या, गोष्टींच्या नादाला लागते आणि म्हणून त्या व्यक्तीला त्याच्या कामात अपेक्षित यश येत नाही. मग त्या व्यक्तीबद्दल तो किंवा ती आता हाताबाहेर गेला वा गेली, असं बोललं जातं. अशा व्यक्ती वाट चुकलेल्या असतील तर त्यांच्याबद्दल हे उद्गार येणं स्वाभाविक आहे. पण काही व्यक्ती कुठल्याच चुकीच्या मार्गाला, नसत्या गोष्टींच्या नादाला लागलेल्या नसतात तरीही त्यांना असेच बोल ऐकायला मिळत असतील तर जरा आश्चर्य वाटायला हवं. अपयशाच्या गर्तेत पडलेला असताना सुद्धा पुन्हा आकाशात भरारी मारणाऱ्या या जिगरबाज तरुण मुलाची ही कहाणी आहे. चला जाणून घेऊयात,

पार्श्वभूमी –

नाव संकेत नथुराम देवळेकर (DySP Sanket Devalekar). याचे आई आणि वडील दोघेही शिक्षक. त्यामुळं घरात सुरुवातीपासून शैक्षणिक वातावरण होतं. त्याचा तसा त्याला फायदाच झाला. त्यानं दहावीच्या शालांत परीक्षेत चांगले ८८.४०% गुण मिळाले होते. पुढं बारावी नंतर त्यानं अभियांत्रिकी शाखेत (Engineering) प्रवेश घेतला. पण चक्र कसं उलट फिरलं ते समजलं नाही. कारण अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या असलेल्या आठ सत्रांत (Semesters) त्यापैकी पाच सत्रातील विविध विषयांत तो नापास झाला (ATKT). याचा नकारात्मक परिणाम त्याच्या आयुष्यावर झाला.

तो याधीच्या आयुष्यात कधीच नापास झाला नव्हता, तेंव्हा हे असं अपयश येणं हे म्हणजे त्याच्यासाठी एक प्रकरचा धक्का होता. जसा तो पहिल्या पाचेक सत्रांत नापास होत गेला, तशी त्याच्या मित्रांची संख्या कमी होऊ लागली. नंतर तो जेंव्हा शेवटच्या वर्षाला शेवटच्या सत्रात असताना त्याचा निकाल पाहून त्याच्या पालकांना त्याच्या कॉलेजमधल्या विभाग प्रमुखांनी बोलावून सांगितलं की “ हा सातत्यानं नापास होतो आहे. अशानं याचं आयुष्यात अभियांत्रिकी क्षेत्रात काहीच होणार नाही.” साहजिकच घरातलं वातावरण तणावपूर्ण बनलं. पण तो हि साहजिकच निराश झाला पण त्यानं स्वतः स्वतःला यातून बाहेर काढायचं ठरवलं.

७ वर्ष – ४० परीक्षा, आणि ACP बनण्याचा प्रवास!

सभोतालचं वातावरण इतकं नकारात्मक झालेलं होतं. कुणाचीच साथ नाही. बहुतेकच जण आपल्या बद्दल नकारात्मक बोलत आहेत. यामुळं मनुष्य इतका बिथरून जाईल, त्याच्या मनात नको नको ते विचार येतील. पण हाच खरंतर खूपच कसोटीचा काळ असतो. तुमच्या अपयशापेक्षाहि हा काळ तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत असतो.

जेंव्हा कॉलेजात प्राध्यापकांनी सांगितलं की याचं काहीच नाही होणार म्हणल्यावर तो थोडा खचला होता. शिक्षण घेत असताना येणाऱ्या अपयशामुळे त्याची घुसमट होत होती. त्या दबावामुळे तो कुठेच मन मोकळं करू शकत नव्हता. त्याला स्वतःला सिद्ध तर करायचं होतं, हे काळात होतं पण कुठल्या मार्गानं जावं हे अजूनही त्याला सापडलं नव्हतं. पण असा एक क्षण असतो. जो तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातो. त्याला ‘राजमुद्रा’ नावाचं पुस्तक मिळालं. त्यानं ते वाचून पूर्ण केल्यावर त्याला लक्षात आलं की अशाप्रकारे अपयश पदरी आलेले आपण एकटे नाही तर असे बरेच तरुण तरुणी आहेत, ज्यांनी अपयशाच्या खडतर मार्गावरून प्रवास करून यशाचं शिखर सर केलं आहे. त्या व्यक्तीही शैक्षणिक आयुष्यात फार उत्तम कामगिरी करू शकल्या नाहीत, पण नंतर त्यांनी यश मिळवलं. यातून प्रेरणा घेऊन त्यानं ठरवलं की आता आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या मार्गावर जायचं आहे.

आधी म्हणलं तसं आधीचे मित्र तर लांब गेलेले होते व जे जवळ होते त्यांना त्यानं या आपल्या निर्णयाबद्दल सांगितलं, पण त्याची मित्रांनी खिल्ली उडवली. २०१२ सालापासून त्यानं प्रयत्न करायला सुरुवात केली. जे व्यक्ती आपल्या सारखेच असे अपयशी आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी काहीतरी करायचं असं त्यानं पक्कं केलं. लगेच पुढच्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC च्या नागरी सेवा परीक्षेचा (CSE) पहिला प्रयत्न देऊन  बघितला. पहिला टप्पा पूर्व परीक्षा त्यात तो पात्र ठरला, पुढच्या दुसऱ्या टप्प्यावर म्हणजेच मुख्य परीक्षेत त्याला केवळ ६ गुण कमी मिळाले. आणि तो मुलाखतीसाठी अपात्र ठरला.

पुन्हा पुढच्या वर्षी पूर्व आणि मुख्य परीक्षा दिल्या, आता त्याला या प्रयत्नावेळी १६ गुण कमी पडले आणि पुन्हा तो मुलाखतीसाठी अपात्र ठरला. पुढच्या वर्षीच्या प्रयत्नात मुलाखतीसाठी त्याला २२ गुण कमी मिळाले. चौथ्या प्रयत्नात त्याला आता ३५ गुण कमी पडले. पाचव्या प्रयत्नात त्याला याच मुलाखतीला पात्र होण्यसाठी ४१ गुण कमी पडले. मुख्य परीक्षेत येऊन मुलाखतीच्या टप्प्यावर जायच्या आधी तिथेच तो अडकून बसला होता.

मग त्यानं यावर उपाय म्हणून जे मोठं ध्येय ठेवलं होतं त्याच्या खालच्या पायरीपासून सुरुवात करायची. त्यानं गावकामगार तलाठी पदासाठी परीक्षा दिली, आणि तिथं त्याची निवड झाली. कारण पाचेक वर्ष खर्च केल्यानंतर सुद्धा नोकरी नाही म्हणल्यावर जी समोर येईल ती नोकरी करणं भाग होतं. म्हणून त्यानं आई- वडीलांना न सांगताच परीक्षा दिली. नोकरी करत असतानाच त्यानं UPSC सोबतच आता MPSC साठीही अर्ज केला. इतक्या वर्षांच्या तयारीमुळे त्याला या MPSC च्या पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपाधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग (DYSP- Excise Dept.) हे पद मिळालं. पुन्हा एकदा त्यानं MPSC चा पुढचा प्रयत्न केला. आणि त्याला यावेळी त्याला पुन्हा पोलीस उपाधीक्षक -पोलीस उपायुक्त (DYSP-ACP) पदावर निवड झाली. अथक परिश्रम तसेच चढ-उतार त्यानं हे यश प्राप्त केलं.

DySP Sanket Devalekar MPSC Strategy

त्यानं २०१२ पासून प्रयत्न करत करत त्यात सात वर्षे गेली. पण सात वर्षे त्यानं स्वतःला पूर्णपणे बदललं. महत्वाचं काय तर स्वतःमधले असलेले दोष आणि होणाऱ्या चुका यांत सुधारणा करणं हेच त्याच्यासमोरचं मोठं आव्हान होतं. सगळ्यात मोठा दोष म्हणजे त्याची स्मरणशक्ती. तो सांगतो, त्याची स्मरणशक्ती खूप कमकुवत होती. आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम इतका असतो, तर तो अभ्यास अशा व्यक्तीला लक्षात ठेवणं अवघड असतं. मग यावर उपाय त्यानं स्वतः शोधला. आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक माहिती साठवण्यासाठी काही मजेशीर वाक्यं बनवून ती माहिती लक्षात ठेवायची, असं तंत्र त्यानंच विकसित केलं. त्याचा चांगला फायदा झाला. इंग्रजीची ही अडचण होती. त्याला याच्याबरोबरीने इंग्रजीही सुधारायचं होतं.

त्यासाठी त्यानं द हिंदू (The Hindu), इंडियन एक्स्प्रेस (The Indian Express) सारखी वर्तमानपत्रं सतत वाचली. त्यानं आपलं इंग्रजी इतकं चांगलं केलं की त्यानं आपल्या शेवटच्या दिलेल्या प्रयत्नात राज्यसेवा मुख्य परीक्षेतील इंग्रजीच्या लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले. ज्या चुका UPSC चा प्रयत्न करताना झाल्या, त्या त्यानं सुधारल्या. आधीचे जे काही यशस्वी विद्यार्थी होते, त्यांची रणनीती समजून घेतली. त्यातील ज्या गोष्टी सारख्या वाटल्या त्यानं त्या अंमलात आणायला सुरुवात केली. त्या अनुषंगाने नियोजन केलं. पण त्याचा वापर UPSC च्या पूर्व परीक्षेलाच केला होता, म्हणून तो मुख्य परीक्षेत पात्र होत नव्हता. आता MPSC च्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या सगळ्या टप्प्यांवर DySP Sanket Devalekar रणनीती वापरली. आणि यश खेचून आणलं.

अपयशाचा अडथळा हा मार्गात असतो, तसाच यशाचा मैलाचा दगड ही असतो. हे मधले अडथळे पार केल्याशिवाय यश मिळत नाही. भोवतालच्या लोकांनी त्याला इंजिनीरिंग मध्ये यथातथा उत्तीर्ण होऊन वर अजून सात वर्षे वाया घालवली, म्हणून अजूनच दूषणं दिली. चाळीसेक परीक्षा आणि हाती काही नाही, हातावर हात ठेवून न बसता संकेत सतत प्रयत्नशील राहिला. कारण ती वेळच रुके ना तू, झुके ना तू, थमे ना तू अशी असते. त्यानं कोणाकडेच लक्ष दिलं नाही. परिश्रम केल्यामुळे अभ्यासाच्या या प्रक्रियेमुळे आयुष्याची योग्य दिशा तर त्याला मिळालीच पण एक नवी दृष्टी मिळाली.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केवळ नोकरीच नाही तर सामाजिक भान, आपल्या समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांबद्दलची जाणीव देतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतो. ज्या कॉलेजमध्ये “त्याचं काहीच होऊ शकत नाही”, असं सांगितलं, त्या कॉलेजनं त्यानं मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या पालकांचा सत्कार केला. आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. फक्त स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनाच नाही तर हिंमत हरलेल्या सर्वांना त्यानं हा संदेश दिला आहे की, “अपयशाचा काळ खूपच कठीण असतो. पण त्या वेळी शांत बसून गंजत राहण्यापेक्षा कष्ट घेऊन झिजत राहिलेलं अधिक योग्य आहे.”


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole