1 वर्षाची तयारी अन् UPSC परीक्षा उत्तीर्ण, वयाच्या 22 व्या वर्षी बनली IAS अधिकारी

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावं, म्हणून उमेदवार खूप झटतात. अजिबात वेळ वाया घालवत नाहीत. सतत अभ्यासात मग्न असतात. कारण या स्पर्धात्मक परीक्षा असतात. कधी कधी प्रयत्न करूनही थोड्या थोडक्या गुणांत अपयश येतं, म्हणून सदैव प्रयत्न करत राहणं.. हाच स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न आहे. या सगळ्या परीक्षांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ची नागरी सेवा परीक्षा ( CSE) ही सगळ्यांत अवघड असते. याला उमेदवारासाठी मर्यादित संधी असतात. म्हणून तर याची काठिण्य पातळी अजून जास्त आहे. ५-६ वर्षे प्रयत्न करून यश संपादन केलेले बरेच उमेदवार असतात. पण काही उमेदवार असेही असतात जे कमी वयाचे असतात आणि बहुतेक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात. अशीच यशाची कहाणी आहे IAS अनन्या सिंहची.

कायमच पहिल्या क्रमांकावर

IAS अनन्या सिंह ही मूळची उत्तर प्रदेशमधील प्रयागराज (Prayagraj, U.P.) शहरातील आहे. तिचे शालेय शिक्षण प्रयागराज मधील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल मधून झाले आहे. ती शालेय वयापासूनच अभ्यासात विशेष प्राविण्य मिळवणारी विद्यार्थिनी होती. दहावी मध्ये तिने ९६% गुण तर बारावीच्या परीक्षेमध्ये तिला ९८.२५% मिळाले होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत तिने भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (Council Of Indian School certificate examination – CISCE) बोर्डात तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. १२ वी उत्तीर्ण झाल्यावर अनन्याने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, दिल्ली इथून अर्थशास्त्रात (Economics) पदवी प्राप्त केली आहे.

अभ्यासाला किती वेळ दिला ? –

अनन्याने अगदी लहान वयात आपलं ध्येय पक्कं केलं होतं. शिक्षणातील पदवीची पायरी पार पाडल्यावर तिने पूर्ण लक्ष नागरी सेवा परिक्षेकडे दिलं. याआधी ती शेवटच्या वर्षाला असताना दिवसाचा अर्धा वेळ अभ्यासातच घालवला. तिने पदवी नंतर दिवसातील कमीत कमी ५-६ तास सरावावर भर दिला. एकच वर्ष पण अथक मेहनत केली.

पहिला प्रयत्न आणि प्रशासकीय अधिकारी –

अनन्याने पहिल्या वर्षीच जोरदार प्रयत्न केले, खूप मेहनत घेतली आणि यश संपादन केले. २०१९ च्या नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तिने ५१ वा क्रमांक पटकावला. सध्या अनन्या हिला बंगाल केडर मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमण्यात आलं आहे.

अभ्यासाची रणनीती –

अनन्याच्या मतानुसार, पूर्व आणि मुख्य परिक्षेपूर्वीचा काळ हा खूप अवघड असतो. या कालावधीमध्ये खूप कष्ट करण्याची आवश्यकता असते. जी पुस्तकं अभ्यासक्रमानुसार आहेत अशा पुस्तकांची यादी अनन्याने बनवून घेतली. आणि यादीप्रमाणेच पुस्तकं मिळवली. पदवी शेवटच्या वर्षात असताना सर्व विषय पूर्ण समजून घेण्यावर भर दिला. नंतर आवश्यक त्या नोट्स बनवल्या. या नोट्स लहान आणि अभ्यासक्रमानुसार आवश्यक घटक समाविष्ट करून बनवलेल्या असल्यामुळे त्या फार उपयुक्त ठरल्या, असं अनन्याने सांगितलं. जेंव्हा विषयांचं पूर्ण आकलन झाल्यावर मग पदवी उत्तीर्ण झाल्यावर वेळापत्रक बनवून तिने भरपूर सराव केला. या सरावावेळी आधी बनवलेल्या नोट्सचा खूप उपयोग झाला.

IAS अनन्या सिंह ची कौटुंबिक पार्श्वभूमी –

अनन्याच्या कुटुंबातील बाकी सदस्य हे ही उच्च शिक्षित आणि उच्च पदांवर कार्यरत असणारे असे आहेत. तिचे वडील हे जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आहेत. आई अंजली या IERT मध्ये वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावर आहेत. तिचा मोठा भाऊ ऐश्वर्य प्रताप हे सध्या कानपूर मध्ये असतात. तिथे ते मुख्य महानगर दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ऐश्वर्य प्रताप यांच्या पत्नी जोत्स्ना या ही कानपूर येथे दंडाधिकारी पदावर आहेत.

UPSC उमेदवारांना मार्गदर्शनपर संदेश –

UPSC परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी काय करावं यांवर अनन्या सांगते की अभ्यास व नोट्स त्याचबरोबर मागील जितक्या प्रश्नपत्रिका मिळतील, त्या पाहून सोडवून तयारी करावी. कारण बहुतेक वेळा मागील कोणत्या ना कोणत्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पुन्हा आलेला असतो. सतत उजळणी आणि सराव यांवर भर द्यायला हवा. अशाच पद्धतीने पेपर सोडवणे व उत्तर लेखनाचा सराव करावा. आणि कायम वृत्तपत्र वाचत राहायला हवं. कारण महत्वाचा टप्पा असलेल्या मुलाखतीमध्ये वृत्तपत्र वाचनाचा खूप फायदा होत असतो.


हे ही वाचा –

1 Comment
  1. Nutan janardan pehare says

    Yes I am intrsted this

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole