उडाणटप्पू म्हणून गणला गेलेला पोरगा जेंव्हा PSI होतो.

PSI च्या वर्दीची अनेकांना क्रेझ असते त्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांना पोलीस दलात अधिकारी बनायचं असतं. आजची हि MPSC Motivational स्टोरी खास त्यांच्यासाठी

मुलं एकत्र दिवसातून एकदा कुठंतरी भेटतात, त्याला कुणी अड्डा म्हणतं तर कुणी कट्टा. तिथं बसून हसणं, मज्जा करणं, एकमेकांच्या खोड्या काढणं, मापं काढणं हे सगळं चालू असतं. कोपऱ्यावर, नाक्यावर, चौकात अशा मोक्याच्या ठिकाणी बसूनही हे उद्योग चालू असतात. जोवर हे आपापल्यात चालू असतं, तोपर्यंत ते ठीक असतं, पण जेंव्हा येणाऱ्या जाणाऱ्यावर विनोद केले जातात, तेंव्हा या पोरांच्या कळपाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. ही पोरं कामधंदा न करता नुसती उनाडक्या करत असतात, त्यांना उडाणटप्पू हा शिक्का लागतो. समाजाच्या दृष्टीने ही वाया गेलेली जमात ठरते. यांचं काय आयुष्यात नीट होणार नाही, असं म्हणलं जातं. ही गेलेली केस वगैरे वगैरे….

पण या समाजाच्या दृष्टीने दिशाहीन मुलांमधल्या एखाद्याला जेंव्हा आपल्याबद्दल काय बोललं जातं हे समजत तेंव्हा तो पेटून उठतो, आव्हान म्हणून स्वीकारतो. आणि काहीतरी असं करून दाखवतो की परिसरातले लोक आश्चर्यानं तोंडात बोटं घालतात. असाच एक मुलगा त्याचं नाव सागर, संपूर्ण नाव सागर अंगद शिंदे. काय केलं त्यानं? २०२१ च्या जानेवारी महिन्यात तो सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच पीएसआय (PSI) या परीक्षेत उत्तीर्ण झाला. सागर (PSI Sagar Shinde) एका अतिसाधारण कुटुंबात जन्मला. घरची परिस्थिती इतकी बेताची की आई-वडील रोजंदारीवर कामाला गेले तर घर चालायचं. त्याला मोठा भाऊ आहे, तो लहानपणापासून हुशार; म्हणून त्याला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. त्याच्या हुशारीमुळे त्याला शाळेनं फीमध्ये थोडी सूट दिली. सागर तसा नव्हता, तो महानगरपालिकेच्या सरकारी शाळेत शिकत होता, त्याच्याबरोबर शिकणारी मुलंही झोपडपट्टीमध्ये राहणारी, हा सागराचा मित्रपरिवार.

सागर जेंव्हा दहावीत होता, तेंव्हा त्याचा एक जवळचा भाऊ जो गावी म्हणजे निमशहरी भागात होता, तो ही पोलीस निरीक्षकाची परीक्षा पास झाला. मुंबईत याबद्दल त्या भावाचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सागरनेही हजेरी लावली होती. ही अशी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार होतो, किती मान मिळतो आहे. तो प्रभावित झाला. त्यानं ठरवलं की आपण ही अशीच परीक्षा देऊन पोलीस व्हायचं. सागर ने ११ वीला वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला, ११ वी आणि १२ वी तो पास झाला. पण त्याला आता वाटू लागलं होतं की पोलीस व्हायचं तर कला शाखेत जायला हवं, म्हणून त्यानं तिकडे पदवीसाठी प्रवेश घेतला.

या निर्णयाची बाकी लोकांनी चेष्टा केली. सागरला आता ही वाणिज्य शाखा पण पेलवली नाही वाटतं म्हणून गपचूप कलाशाखा निवडली असावी. पदवीची तीन वर्षे शिक्षण घेत असताना त्याने बऱ्याच ठिकाणी नोकरीही केली. चहा ही विकला. त्याची अंतर्गत इच्छा त्याला गप बसू देत नव्हती. सागरने (PSI Sagar Shinde) हे सगळं बंद करायचा निर्णय घेतला, आणि फक्त अभ्यास एके अभ्यास करणार असं मनाशी। पक्कं केलं. आणि याबाबत तो त्याच्या पालकांशी बोलला. पण याबद्दल साहजिकच कुरबुर सुरू झाली. सगळ्यांनी कमावलं तर काहीतरी होईल, हे सगळं करायला ही वेळ नाही, असं त्याला सांगितलं. पण नंतर आईने त्याला पाठिंबा दिला. इतकंच नाही त्याने मुंबई सोडलं, थेट पुणे गाठलं. अभ्यासिकेत दिवस रात्र पुस्तक आणि अभ्यास यांत रमलेल्या मुलांच्या कंपूत तो आता सामील झाला. पण त्याला स्वतःशी लढायचं होतं. एकतर पहिल्यांदा घरच्यांना सोडून तो लांब आला होता. ते वर्ष होतं २०१६. घरचं वातावरण, कुटुंब याची सारखी आठवण येत होती. एकटं वाटायचं…पण त्यानं स्वतःला समजावलं आणि अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं.

अभ्यासिकेतल्या मित्रांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जोरदार तयारी सुरू केली. काही लोकांनी त्याला योग्य सल्ले व माहिती दिली, पण काहींनी मुद्दाम चुकीचं सांगितलं. सगळ्यांबरोबरीने त्यानंही रोज १२-१२ तास अभ्यास केला. पण दुर्दैव असं की त्या वर्षी सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या जागा निघाल्याच नाहीत. तो खूप तणावाखाली होता. आईला त्यानं फोनवर ही गोष्ट सांगितली. आईनं त्याला समजावलं आणि धीर दिला त्याचं मनोबल उंच केलं. पुन्हा त्यानं आत्मविश्वासानं अभ्यास केला. पुढच्याच वर्षी दोन परीक्षा झाल्या. सागर या दोन्हींमध्ये अपयशी ठरला. आता जवळच वाहणाऱ्या मुळा नदीच्या काठाला बसून तो ढसाढसा रडला. परत हरुन न जाता त्यानं आधीपेक्षा ही जोरदार प्रयत्न सुरू केले. आणि ठरवलं की आता अपयशाला खांद्यावर हात ठेवू देणार नाही. त्यानं वेगवेगळ्या चार परीक्षा दिल्या. त्यात त्याला यश ही मिळालं, पण अजूनही पोलीस सहाय्यक निरीक्षकाची परीक्षा बाकी होती.

त्याला पुण्यात येऊनही चार वर्षे झाली होती. त्यानं पीएसआय च्या पूर्वपरिक्षा व मुख्यपरिक्षा उत्तीर्ण केल्या. आता उरली होती तिसऱ्या टप्यातली शारीरिक क्षमता चाचणी. त्याचा मैदानी व्यायामाचा इतका सराव नव्हता. त्यानं याचीही तयारी सुरू केली. पण याची सवय नसल्यानं त्याला दुखापत व जखमेला सामोरं जावं लागलं….परीक्षेचं प्रावधान असं सांगतं की परिक्षार्थ्याला एका महिन्याची वाढीव मुदत मिळू शकते. डॉक्टरांकडून त्याच्या तब्येतीबाबतीतलं पत्रक घेतलं. पण उपयोग शून्य त्याला ती वाढीव मुदत नाही मिळाली नाही. तिथं उपस्थित असणाऱ्या डॉक्टरनं त्याला दुखणं कमी व्हावं म्हणून इंजेक्शन दिलं. पण या दुखण्याकडं दुर्लक्ष करून त्यानं ८०० मीटर चा पल्ला हा पूर्ण केला. जेंव्हा ८०० मीटरची चाचणी संपली आणि सागर मैदानातच कोसळला. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. यांतून जेंव्हा तो बाहेर आला त्यानंतर त्याने उरलेली परीक्षा दिली. यांत मात्र सागरच्या प्रयत्नांना यश आलं. तो ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. आता तो पोलीस अधिकारी आहे.

ज्याला उडाणटप्पू म्हणलं गेलं, तो आज पीएसआय झाला आहे. याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला, जिथं त्याला हिणवलं, तिथंच त्याचा मान-सन्मान करण्यात आला. सलाम त्याच्या प्रयत्नांना व जिद्दीला.


हे वाचलंत का ? –

2 Comments
  1. Bhagyashri says

    Pis

  2. Bhagyashri says

    Psi

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole