MPSC Success Story: अडचणींवर मात करत अखेर बनला PSI, राहुलने पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश

PSI Rahul Jadhavएमपीएससी किंवा राज्यसेवा परीक्षा ही सोपी नक्कीच नाही. त्यासाठी आत्मशक्तीचे बळ फार मोठे असते. शहरी भागात अनेक विद्यार्थी येऊन परीक्षेसाठी तयारी करतानाचे चित्र कायम पाहाण्यात येते. दिवसरात्र अभ्यास करून विद्यार्थी परीक्षेला बसतात. हे सर्व विद्यार्थी गावाकडून येतात त्यांना घरच्यांची साथ असतेच. ते यशस्वी होतातही. काहींच्या वाटेवर मात्र खळगेच जास्त असतात. ते भरून काढत त्यांना परीक्षेची वाट चालायची असते आणि डोळ्यात ध्येयपुर्तीची स्वप्ने बाळगायची असतात. असाच कष्टाच्या मार्गाने ध्येयपुर्ती केलेला राहुल जाधव (PSI Rahul Jadhav)

अंबेजोगाईत नोकरीला असलेला राहुल जाधव मूळ लातूर चा. वडिलांची खासगी नोकरी असल्याने घरची परिस्थिती बेताची होती मात्र राहुलने जिद्दीने एक स्वप्न उराशी बाळगलं होतं ते म्हणजे पीएसआय होण्याचं. लातूरच्या विविध शाळांमध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या राहुलने लहानपणापासून पोलिस अधिकारी व्हायचे ठरवले होते.

स्पर्धा परीक्षेची तयारी

उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २१ व्या वर्षी पोलिसात भरती झाले. त्यानंतर २०१६ मध्ये मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्नाची जबाबदारीही आली. पण या सर्व धबडग्यात त्यांनी आपले स्वप्न मागे सोडले नाही. नोकरी, संसार, घराची जबाबदारी सर्व गोष्टी पेलता पेलता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

परीक्षेची तयारी करताना मार्गदर्शनाची तेही योग्य दिशेने होणे महत्त्वाचे असते. अभ्यासाचे तंत्र अवगत करणेही महत्त्वाचे असते. यावेळी मदतीला आले दत्तात्रय व्हटकर, त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी आई सेंटरच्या नागेश जोंधळे यांची भेट घेऊन मार्गदर्शनाची विनंती केली. त्यांनीही आनंदाने ती मान्य करता मार्गदर्शन करायला सुरूवात केली. राहुल यांनी पीएसआयचे लक्ष्य ठेवले होते. व्हटकर आणि जोंधळे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मनोबल तर वाढलेच पण सकारात्मक उर्जाही मिळाली. जोमाने अभ्यास करत राहुल जाधव यांनी २०१७ सालातली राज्यसेवा पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा दिली. तीन वर्षांनी या परीक्षांचा निकाल लागला तेव्हा राहुल जाधव पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाले होते. राज्यातून ६८ क्रमांक मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरले.

पोलिस कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरिक्षक हा प्रवास राहुल यांच्यासाठी नक्कीच सुखकारक नव्हता. जबाबदाऱ्यांचे खळगे पार करून त्यांनी हे निर्भेळ यश मिळवले आहे. राहुल जाधव यांना कुटुंबियांचीही मोलाची साथ मिळाली होती. सकारात्मक विचार व नियोजनबद्ध, योग्य दिशा ठेवून स्पर्धापरिक्षेत यश नक्कीच मिळते. जिद्दी आणि चिकाटी अंगी बाळगणाऱ्या कोणत्याही तरूणाला स्पर्धा परिक्षेत यश मिळू शकते. ही प्रेरणा देण्याचे काम राहुल जाधव यांच्यासारखे जिगरबाज तरूण करतात. राहुल यांचा हा प्रवास नक्कीच इतर होतकरू तरूणांना बळ देणारा असेल.


हे वाचलंत का?

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole