हॉटेल कर्मचारी ते दमदार पोलीस अधिकारी, कसा केला हा थक्क करणारा प्रवास?

अख्या देशातलं धडाकेबाज असणारं पोलीस खातं कोणतं तर चटकन मुंबई पोलीस (Mumbai Police) हे नाव तोंडात येतं. मुंबई पोलिस खातं जबरदस्त झालं त्याचं कारण म्हणजे तितकेच जबरदस्त पोलीस अधिकारी मुंबई पोलिसदलाला लाभले. त्यातलं एक नाव म्हणजे दया नायक. (Daya Nayak )

हे नाव व त्याला असणारं वलय खूपच प्रसिद्ध आहे, कारण हे नांव ऐकल्यावर मुंबईतल्या दादा-भाई अशा गुन्हेगारी जगतातल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकायची, कारण दया नायक यांची ओळख फक्त मुंबईच नाही तर संबंध देशात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून होती. तर जाणून घेऊयात या गुन्हेगारांचा काळ असणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल.

दया नायकांचे मूळ –

दया नायक हे मूळचे कर्नाटकातले, उडपी जिल्ह्यात मंगलोरजवळच्या यन्नेहोळे (Yennehole) गावात कोकणी कुटुंबात त्यांचा जन्म झाला, त्यांचं बालपण तिथंच गेलं. ते तिथं ज्या कन्नड शाळेत जात होते. वयाच्या १२ व्या वर्षी ते गाव सोडून मुंबईला आले. त्यांचे वडील ३ मुलगे व १ मुलगी आणि त्यांच्या आईला सोडून अचानक गायब झाले. आईने मुंबईला आल्यावर मिळेल तिथे घरकाम करायला सुरुवात केली. कुटुंबाला मदत करायला हवी म्हणून दया हे लहान वयातच कामाला लागले. रात्र रेल्वे प्लॅट फॉर्म वर काढायची, तिथंच झोपायचं, नंतर त्यांना रेल्वे कँटीनमध्ये काम मिळालं.

यानंतर त्यांना वर्सोव्यातल्या हॉटेल मध्ये नोकरी लागली. कसली तर वेटरची. ही नोकरी करतच त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं होतं. कारण त्यांना हॉटेल मालकाचा पाठिंबा मिळाला. असं करत करत त्यांनी पदवी घेतली. अजूनही त्यांचं झगडणं थांबलं नव्हतं. ते नळ, पाईप दुरुस्ती करण्याचं काम करत होते. त्यांनी विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं. दिवसा काम आणि रात्री शिक्षण असं करत त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. आता डोळ्यांसमोर होतं की पोलिसखात्यात जाणं. तो ही अभ्यास सोबतच चालू होता. 

पोलीस म्हणून निवड –

जेंव्हा ते परीक्षा पास होऊन त्यांची पोलीस म्हणून निवड झाली ते साल होतं १९९५, आणि पुढच्या वर्षी त्यांची जुहू पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. मुंबईतल्या गुन्हेगारी जगताचा एक वेगळा इतिहास आहे. त्याचे वेगवेगळे अध्याय आहेत. छोटा राजन (Chota Rajan) हा त्यापैकी एक. पहिला सामना नायक यांचा याच छोटा राजन टोळीच्या गुंडांशी झाला. जेंव्हा हे गुंड दया नायक यांच्या हाताला लागले तेंव्हा त्यांनी चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला. आणि त्यातल्या दोघांना तर थेट यमसदनालाच पाठवलं. या कामामुळं ते सर्वत्र चर्चेत आले.

खात्यातून व वृत्तपत्रांमधून त्यांची खूपच प्रशंसा झाली. नंतर त्यांना खास कामगिरी देण्यात आली, त्यांना क्राईम इंटेलिजन्स युनिट मध्ये रुजू करण्यात आलं. आणि तिथं त्यांना भेटले त्यांच्यासारखेच तडफदार अधिकारी प्रदीप शर्मा. (Pradip Sharma). गुन्हेगारांच्या फाईल कायमच्या बंद करण्यात प्रदीप शर्मा यांचा अनुभवही तगडा. त्यांनी नायक यांना याबाबतीत योग्य मार्गदर्शन केलं.

या दोघांनी बबलू श्रीवास्तवच्या गुंडांना संपवलं. लिट्टे (LTTE) या दहशतवादी संघटनेच्या तिघांना तर भर गर्दीच्या ठिकाणी उडवलं. हे लोक कुख्यात गुंड अमर नाईकचे हस्तक होते. रफिक डब्बेवाला, श्रीकांत मामा, सादिक कालिया, परवेज सिद्दीकी,विनोद भटकर अशी ही यादी बरीच मोठी आहे. असे ९० च्या आसपास गुंड आहेत की यांची नावं दया नायक यांच्या बंदुकीतल्या गोळ्यांवर लिहिली होती. 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट Daya Nayak-

एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ख्याती झाली होती पण याचाच त्यांना पुढं तोटा झाला असं म्हणलं पाहिजे. २००६ पासून त्यांचा पुन्हा वाईट काळ सुरू झाला. त्यांच्यावर पदाचा गैरवापर करणं व जबरदस्ती पैसे वसूल करणे असे आरोप ठेवण्यात आले. त्यांना गैरमार्गाने ज्यादा संपत्ती बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून अटक करण्यात आली. न्यायालयीन खटला चालला. पण ते  या खटल्यातून निर्दोष सुटले. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबांधक कायद्यान्वये ही गुन्हा ठेवण्यात आला होता त्यातूनही त्यांची मुक्तता झाली. २०१२ मध्ये त्यांना पुन्हा पोलीस खात्यात रुजू होण्याची परवानगी मिळाली.

 त्यांची नागपूरला बदली करण्यात आली होती. पण ते नागपूरला गेलेच नाही. म्हणून २०१५ मध्ये त्यांच्यावर पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्यात आली. पण २०१६ मध्ये त्यांना पुन्हा मुंबई पोलिसमध्ये रुजू होण्यास सांगण्यात आलं. २०१८ मध्ये त्यांना इंस्पेक्टर पदावर नेमण्यात आलं. २०१९ ला त्यांना दहशतवाद विरोधी पथकात सामील करून घेण्यात आलं.

असं नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं आयुष्य आहे म्हणल्यावर सिनेमावाल्यांना यांत रस वाटला नाही तर नवलच. नाना पाटेकर अभिनित ‘अब तक छप्पन’ (Ab tak chappan) हा खूपच गाजला आहे., प्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा यांचा ‘कगार’, २०१० चा प्रसिद्ध तेलुगू चित्रपट ‘गोलीमार’ (Golimar) ज्यामध्ये तेलुगू सिनेमाचा सुपरस्टार गोपीचंद याने काम केलं आहे. २०१२ मध्ये ‘डिपार्टमेंट’ नावाचा हिंदी चित्रपट ज्याच्यामध्ये संजय दत्तचा अभिनय आहे. हे सगळे चित्रपट दया नायक यांच्या आयुष्यवर बेतलेले आहेत.

आपल्या तत्वांवर ठाम राहणं आणि काम करण्यासाठी व यश मिळवण्यासाठी तसंच शहर गुन्हेगारी मुक्त ठेवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही हेच Daya Nayak यांच्या आयुष्याकडे पाहून त्यातून प्रेरणा मिळते.


हे ही वाचा –

1 Comment
  1. Maske Pradip says

    Birilyant

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole