तलाठी ते DySP, अपयशाचे रूपांतर यशात करणारा संकेत देवळेकर यांचा प्रवास

रत्नागिरी जिल्ह्यातील मु. पो. नाचणे या गावातील दोन शिक्षकांचा मुलगा असलेले संकेत देवळेकर (DySP Sanket Devalekar) आज डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जिल्ह्यातून राज्यसेवेसाठी पात्र ठरलेले ते एकमेव उमेदवार होतेच शिवाय २०१९ सालामध्ये ते डीवायएसपी पदावर निवडले गेले त्यातही त्या वर्षीचे ते पहिलेच उमेदवार होते.

शालेय जीवन

रत्नागिरीतल्या कुवरबाव मधल्या राधाबाई गोपाळराव जागुष्टे हायस्कूल मध्ये संकेत देवळेकर यांचे शिक्षण झाले आहे. त्यांचे शिक्षक मस्तीखोर मुलगा म्हणूनच ते सुपरिचित होते. देवळेकर पास झाल्यानंतर त्यांनी याविषयी एक आठवण सांगितली ती म्हणजे एकदा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला होता आणि शाळेच्या ज्या फळावर ते लिहिले होते त्याच फळ्याखाली त्यांना ओणवे उभे केले होते, कारण त्यांनी त्या दिवशी कोणाला तरी बेदम मारले होते. त्यांची आई शिक्षिका असल्याने शाळेत त्यांच्यावर शिक्षिकांचे लक्ष होतेच. शाळेत स्कॉलरशिपही मिळाली होती. तर कनिष्ठ महाविद्यालयात वडील जॉईंट सेक्रेटरी असल्याने तिथेही त्यांच्यावर लक्ष ठेवले होते.

अभियांत्रिकी महाविद्यालयात मात्र त्यांना मोकळेपणा मिळाल्याने खूप मस्ती केली, अगदी पाच सेमिस्टरला केटी मिळेपर्यंत ती मस्ती सुरू होती. डीवायएसपी झालेल्या देवळेकर यांना अभियांत्रिकीमध्ये केवळ ५३ टक्के पडले आहेत. पण मेहनत आणि कष्ट काय जादू करू शकतात हे आत्ताच्या देवळेकर यांच्याकडे पाहिल्यानंतर कळते. त्यांच्या महाविद्यालयाच्या २० वर्षाच्या इतिहासात एवढे कमी गुण कोणालाही मिळाले नसतील, इतके हे गुण कमी होते. शेवटच्या सेमिस्टरला केटी लागल्यानंतर प्राचार्यांनी वडिलांना बोलावुन तुमच्या मुलाचे काही होणार नाही, त्याच्यासाठी वेगळा मार्ग शोधा असा सल्ला दिला होता.

स्पर्धा परीक्षेचा प्रवास

अर्थात डीवायएसपी झाल्यानंतर महाविद्यालयाच्या त्याच प्राचार्यांनी देवळेकर यांच्या पालकांना बोलावून सत्कारही केला होता. २०१२ सालापासून युपीएससी च्या परीक्षेचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २०१९ सालापर्यंत त्यांनी ४५ वेळा परीक्षा दिल्या, त्यात ते अयशस्वीही झाले. पण सातत्य आणि चिकाटीने ते प्रयत्नशील राहिले. २०१२ पासून पाच ते सहा वेळा युपीएससीची परीक्षा दिली. चौथ्यांदा युपीएससीची परीक्षा दिली तेव्हा तलाठी या पदासाठी त्यांची निवड झाली.

त्यानंतर २०१७ ला युपीएससी ची पूर्वपरीक्षा दिली ती पास होणार याची खात्री होतीच. त्यावेळी तहसीलदार साहेबांनी त्यांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी जाण्याचा सल्ला दिला कारण देवळेकर यांची हुशारी लक्षात यायला वेळ लागला नव्हता. त्यामुळे सुट्टी घेऊन परीक्षेची तयारी करायची आज्ञाच दिली. या सर्व अपयशाच्या काळातही देवळेकर यांचे शिक्षक सातत्याने प्रोत्साहन देत राहिले. त्यामुळे अपयशाचे रूपांतर यशात करण्यात देवळेकर यांना यश मिळाले आहे. या सर्वात सातत्याने उमेद टिकवून, टिच्चून अभ्यास करण्याला फार महत्त्व असल्याचे देवळेकर यांच्या खडतर प्रवासातून लक्षात येतेच. युपीएसीसीची परीक्षा देताना मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे दोन टप्पे असतात, मुख्य परिक्षेत जर विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवले तर मुलाखतीच्या टप्प्यात कमी मार्क मिळाले तरीही विद्यार्थ्यांना पदाचे प्राधान्य कायम ठेवता येते.

विद्यार्थ्यांना मंत्र

परीक्षा देणाऱ्यांना विद्यार्थ्यांना DySP Sanket Devalekar यांनी एक मंत्र सांगितला, वेळेचे नियोजन करा, एखादा यशस्वी विद्यार्थी जेव्हा अयोग्य गोष्ट बोलून जातो त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवू नका. त्यापेक्षा नियोजनपूर्वक अभ्यास करा, आदल्या वर्षीचे पेपर सोडवा. त्यात अपेक्षित उत्तराचा भाग पुस्तकातून रिवाईज करायचा. आपल्या मनाप्रमाणे पोस्ट मिळत नाही तोपर्यंत नियोजनबद्ध अभ्यास करायलाच हवा. तेव्हाच अपेक्षित यश आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. वाटेने भरकटण्यापेक्षा योग्य सुनियोजित सराव, अभ्यास हाच यशाचा मार्ग ठरणार आहे, हे देवळेकर यांच्या अनुभवातून लक्षात येईल.


हे वाचलंत का?

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole