या आहेत नोकरी शोधण्यासाठीच्या काही ट्रीक्स

नोकरी शोधणे ही गोष्ट आता तशी अवघड राहिलेली नाही कारण तंत्रज्ञान हाताशी आलेले आहे. सध्या नोकरीच्या जाहिरातीपासून इंटरव्ह्यूपर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाईन होत आहेत. इंटरनेटवर अनेक वेबसाईट आहेत ज्या आपल्याला नोकरी शोधण्यासाठी मदत करतात. काही वेबसाईटस् त्यासाठी काही माफक शुल्क आकारतात. तरीही काही वेळा लक्षात येतं की आपल्याला कौशल्यानुरूप किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही. मग आपण अधिक प्रयत्न करत राहतो. हे प्रयत्न करत राहिलेच पाहिजे पण इतरही काही मुद्दे किंवा टिप्स त्यासाठी आहेत. 

ऑफलाईन नेटवर्किंग – 

ऑनलाईन नेटवर्किंग आपल्याला माहित आहेच पण ते जेव्हा वर्क करत नाही तेव्हा नोकरीसाठी ऑफलाईन नेटवर्किंगचा पर्याय शोधायला हवा. म्हणजे काय थोडक्यात सांगायचं म्हणजे ओळखीतून नोकरी मिळणे. म्हणजे आपल्या नातेवाईक, मित्र मैत्रिणी, त्यांचे मित्र मैत्रिणी, ओळखीच्या लोकांना भेटायचे आणि आपण कोणत्या प्रकारची नोकरी शोधतो आहोत ते त्यांना सांगायचे. जग कितीही ऑनलाईनच्या गप्पा करत असलं तरीही अजूनही काही टक्के नोकऱ्या या ओळखीतून दिल्या जातात. त्यामुळे आपल्या ओळखीच्या लोकांना, समुदायातील लोकांना भेटून आपल्या शिक्षणाचे, कौशल्याचे तपशील सांगावे. त्यामुळे ओळखीतून नोकरी लागण्याची शक्यताही वाढेल. या सर्वात एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्हाला लोकांशी उत्तम संवाद साधता आला पाहिजे. तरच तुमची गरज आणि कौशल्य समोरच्या व्यक्तीला योग्य पद्धतीने सांगता येईल. 

कन्सल्टन्सी एजन्सी- 

अनेक कंपन्या त्यांच्याकडील जागा भरण्यासाठी एखाद्या कंपनीला नेमतात. या कंपन्या सोर्सिंग असाईनमेंटवर काम करतात. थोडक्यात हे नोकरी सल्लागार म्हणून काम करत असतात आणि त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक कंपन्यांमधील उपलब्ध नोकऱ्यांसाठी लोकांना नेमण्याची जबाबदारी असते. त्यासाठी रिक्त जागा भरताना नोकरी शोधण्याच्या धोरणांचा वापर करतात. ह्या एजन्सीत विविध संकेतस्थळं, नेटवर्किंग साईट्स आणि योग्य उमेदवार शोधण्याच्या विविध पद्धतींचा वापर करतात. त्यामुळे या एजन्सींपर्यंत तुमची माहिती पोचली तर त्याचीही नोकरीसाठी मदत होऊ शकते. 

वर्तमानपत्रे- 

आजही वर्तमानपत्र नोकरी हवी अशा मथळ्याखाली जाहिराती छापते. हा उत्तम स्रोत होऊ शकतो. आपल्या शहराच्या जवळ किंवा आसपास किंवा राज्याबाहेरही लहान लहान कंपन्यांमध्ये नोकरभरती चालू असते. या सर्व कंपन्या वर्तमानपत्रात जाहिरात देणे पसंत करतात. त्यामुळे आपल्या रहिवासी भागाच्या आसपास असलेल्या नोकरीच्या संधी या नेहमीच ऑनलाईन माध्यमातून मिळतील असे नाही तर त्या वर्तमानपत्रात मिळतात. काही वर्तमान पत्रे विशेष पुरवणी देखील काढतात तर काही राष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तपत्रात सरकारी नोकरीच्या, करारावरील नोकऱ्यांची जाहिराती येतात. त्यामुळे नोकरी शोधताना वर्तमानपत्राचा पर्यायाचा विसर पडू देऊ नका. 

थेट कंपनीत अर्ज करा- 

आपल्याला स्वतःचे कौशल्य माहित असतेच त्यामुळे त्या कौशल्याचा वापर होणाऱ्या कंपनींची माहिती मिळवून थेट आपल्या योग्य असलेल्या पदासाठी अर्जही करू शकता. त्यासाठी संकेतस्थळावरूनही अर्ज करू शकता. त्यापेक्षा प्रत्यक्ष कंपनीत जाऊन तिथे रिझ्युम देऊ शकता. शक्य असल्यास तिथे रिक्त जागा आहेत का याचीही विचारणा करता येईल. काही वेळा थेट कंपनीतील रिक्रुटमेंट करणाऱ्या एचआर ला भेटून आपली माहिती सांगून मुलाखत घेता येऊ शकते का याचीही विचारणा करू शकता. जर कंपनीची गरज आणि आपले कौशल्य योग्य असल्यास संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात या सर्व गोष्टी करताना आपले संवाद कौशल्य आणि नम्रतापूर्वक वागण्याची परीक्षाही घेतली जाणार. तेव्हा या गोष्टींचे भान बाळगून संवाद साधावा लागेल.  


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole