वाचा….. सचिन खुटवड यांची फिनिक्स भरारी

हल्लीचे तरूण अपयश पचवू शकत नाहीत, असे बहुतेकदा ऐकायला मिळते. अपयशी झालेले तरूण एकतर नैराश्याच्या गर्तेत सापडतात किंवा चाकोरीत अडकतात किंवा वेगळ्याच मार्गाला लागतात, असेही पाहायला मिळते. तरीही काही अपवाद असतात जे अपयशाला पचवतात आणि भरारी घेतात. अशा अपयशातून भरारी घेणाऱ्यांपैकी एक म्हणजे सचिन खुटवड. 

पुण्यात राहाणारा सचिन खुटवड आता पीएसआय सचिन खुटवड आहे. सचिनने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या संयुक्त परीक्षा गट ब मध्ये यश मिळवले, आणि तो पीएसआय झाला. सचिनची पीएसआय पदापर्यंत पोहोचण्याची वाट नक्कीच सोपी नव्हती. 

मुंबईच्या गिरणीत कामगार असलेले वडील पुण्यात खासगी चारचाकीवर चालक म्हणून कार्यरत होते. संसाराला हातभार लावण्यासाठी आईही खानावळ चालून हातभार लावत होती. आपल्या घरची हालाखीची परिस्थिती बदलण्यासाठी खासगी कंपनीमध्ये चांगल्यापैकी नोकरी मिळवणे हेच सचिनचे ध्येय होते. सचिनने महाविद्यालयात अव्वल क्रमांक मिळवत बी. एस्सी ही पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण करून मोठ्या कंपनीत काम मिळवण्यासाठी सचिन प्रयत्नशील होता. 

सचिनच्या घरच्या परिस्थितीची जाणीव असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्याला नोकरी करण्याचे ध्येय बाळगण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचा सल्ला दिला. आईवडिलांना समजावण्याचे कामही या शिक्षकांनी केले. मुंबईत राहाणारा सचिन पुण्यात आला. सचिनने परीक्षा देण्याचे प्रयत्न सुरू केले. कालांतराने आईवडीलही पुण्यात येऊन राहिले. 

सचिन ने एक दोनदा नाही तर तब्बल १२ वेळा विविध पदांच्या मुलाखती दिलेल्या आहेत. या सर्वांत त्याला अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही. या अवघड काळात त्याला आईवडिलांनी पाठिंबा दिला. घरची परिस्थिती बेताची असूनही आईवडिलांनी सचिनचा धीर खचू दिला नाही. विविध पदांसाठी तो मुलाखती देत राहिला. 

सुरूवातीला राज्यसेवा परीक्षा देताना त्याने कोणते पद मिळायला हवे याचा काही विशेष विचार केला नव्हता. ही परीक्षा उत्तीर्ण व्हायची या एकाच उद्देशाने तो अभ्यास आणि मेहनत घेत होता. मात्र पोलिसांविषयीचे आकर्षण तर लहानपणापासूनच होते. त्यामुळे सरतेशेवटी त्याने पीएसआय या पदाची निवड केली. यासाठी तयारी सुरू केल्यावर एकदा पायाला झालेल्या दुखापतीमुळे तर दुसऱ्यावेळी झालेल्या अपघातामुळे त्याला मैदानी चाचणी देता आली नाही. दोन वेळच्या अपयशातून काही गोष्टींची खुणगाठ बांधून नियोजन आणि योग्य मार्गदर्शन घेत त्याने शंभरपैकी शंभर गुण मिळवले आणि राज्यात पाचवा येत त्याची पीएसआय पदी वर्णी लागली. 

अपयशातून काय शिकायचे असेल तर भरारी घ्यायला शिकायला हवे, जिद्द, कष्ट आणि नियोजनाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत अपयशानंतरही अव्वल यश मिळवता येते हे सचिनच्या उदाहरणावरून नक्कीच दिसून येते. अपयशाने निराशेच्या गर्तेत जाण्यापेक्षा सचिन खुटवडसारखी फिनिक्स भरारी घ्या आणि यशस्वी व्हा. 


1 Comment
  1. Pratik Burande says

    Chanthapur

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole