आयएएस सर्जना यादव: विना कोचिंग क्लासची अशी केली तयारी…..

केंद्रीय लोकसेवा आयोगा (Union Public Service Commission) मार्फत घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा (Civil Service Exam) विद्यार्थी लाखोंच्या घरात दरवर्षी देत असतात. यशस्वी होण्याचं प्रमाण अगदीच कमी असतं, पण महानगरांमध्ये जाऊन राहणे, क्लासेस लावणे यशस्वी होण्यासाठी काही वर्षे अभ्यास करणे यांत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा खूप पैसा खर्च होतो. परंतु नुसताच पैसा आणि वेळ खर्च करून यश पदरात पडेलच असं नाही तर त्या करता अभ्यास कसा करावा? याबद्दलचं योग्य नियोजन करणंही तितकंच महत्वाचं आहे. हे नियोजन करताना ज्यांनी या परीक्षांमध्ये यश मिळवलं आहे, त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन पथ्यावर पडतं. तर यशस्विता सर्जना यादव (Sarjana Yadav) यांच्याकडून त्यांची आयएसएस अधिकारी (IAS Officer) होण्याची कहाणी (Success story) जाणून घेऊयात.

नाही लावला कोणताही क्लास

सर्जना यादव या मूळच्या दिल्लीच्या. आजवर दिलेल्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांना या परीक्षेत यश मिळालं. २०१९ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल हाती आला आणि तेव्हा त्यात सर्जना यांनी राष्ट्रीय स्तरावर १२६ वा क्रमांक मिळवला. खरंतर युपीएससी तर्फे घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही खूपच अवघड परीक्षांपैकी एक आहे. पुणे, दिल्ली सारख्या शहरांमध्ये तर यासाठी खूप क्लासेस आहेत, जिथे मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेऊन तयारी करतात. पण सर्जना यांच्यामते क्लास लावावा की नाही हे परीक्षार्थी व्यक्तीने स्वतः ठरवावे. जर सर्व विषयांचे योग्य साहित्य आणि अभ्यास  तसेच उजळणी करण्यासाठी योग्य रणनीती असेल तर क्लासेस लावण्याची गरज नाही. परंतु आपल्या अभ्यासावर आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो असं जर वाटत असेल तर आपण क्लास लावला हरकत नाही. पण आपण अभ्यासाचं जे वेळापत्रक बनवलं असेल तर त्या बरहुकूम अभ्यास करायला हवा. त्याचबरोबर कायम स्वतःशी  ही प्रामाणिकपणे वागायला हवं. असं सर्जना यांनी सांगितलं. 

नोकरी करत करत केला अभ्यास 

सर्जना यांनी दिल्ली विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पदवी मिळवली. यानंतर त्यांनी ‘टीआरआय’मध्ये संशोधन अधिकारी म्हणून नोकरी मिळवली व काम करण्यास सुरु केले. दिवसभर नोकरी करत असतानाच त्यांनी नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासाला ही सुरुवात केली. साहजिकच त्यांना दोन प्रयत्नांत अपयशाचा सामना करावा लागला. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी समजून त्यांनी पुन्हा जोमाने अभ्यास केला व तिसऱ्या वेळेसही परीक्षा दिली. नोकरी करत अभ्यास हे सुरुवातीला केलं. परंतु नंतर अभ्यासासाठी तितकासा वेळ देता येत नव्हता. म्हणून यासाठी २०१८ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः अभ्यास केला. २०१९ च्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलं.

सर्जना यांनी सांगितली रणनीती

सर्जना यांनी या परीक्षेत यश मिळवण्यासाठी आवश्यक रणनीतीबद्दल (Strategy to crack UPSC) सांगितलं आहे की परिक्षार्थ्याला त्याच्या स्वतःच्या क्षमतेबद्दलचा अंदाज असायला हवा. तसेच वेळापत्रक किती तासांचं बनवायचं आहे ते ठरवायला हवं. जेवढे विषय आहेत, त्यांचा अभ्यास सखोल करावा. सगळे विषय समजून घेतल्यानंतर पुढच्या उजळणी व लेखनाचा सराव करण्यासाठी योग्य वेळापत्रक बनवावं. यश जोवर मिळत नाही तोवर सतत कष्ट करत राहिलं पाहिजे. 

भरपूर मॉक टेस्ट सोडवा. (Mock Tests)

विषयांच्या नोट्स बनवणं आवश्यक आहे. पण सर्वच विषयांच्या नोट्स काढणं गरजेचं नाही. आपल्याला सहज समजतील अशा नोट्स ही उपलब्ध असतात. त्यासाठी उगाच वेळ खर्च करु नये. कारण या परीक्षेसाठी विषय समजून घेतल्यानंतर स्वतःला तपासून पाहण्यासाठी सतत सराव परिक्षा देणं फार आवश्यक आहे. यांतून पेपर सोडवताना होणाऱ्या आपल्या चुका समजून घेऊन त्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. जे विषय सहज समजत नाहीत अशा विषयांच्या नोट्स बनवायला हव्यात. 

वर्तमानपत्र वाचणं चुकवू नये. (Don’t miss to read daily news paper)

एकतर परीक्षार्थी नोकरी करत असतो किंवा नुकताच पदवी घेऊन परीक्षेची तयारी करत असतो. या सगळ्यात परीक्षार्थी व्यक्तीला वर्तमानपत्र नियमितपणे वाचण्याची सवय असतेच असं नाही. खरंतर या परीक्षेसाठी वर्तमानपत्र वाचन हा विषय फार महत्वाचा आहे. कारण चालू घडामोडी हा महत्वाच्या विषयाचा अभ्यास वर्तमानपत्रातूनच होतो. त्याचबरोबर ऑनलाईन ही माहिती मिळते. अभ्यासाचे तास जास्त असण्यापेक्षा जितका वेळ अभ्यास कराल तितका वेळ मन लावून अभ्यास करावा. कारण मन लावून अभ्यास केलात व स्वतःवर विश्वास ठेवलात तर आणि तरच यश संपादन करता येईल.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole