भावनिकतेला दूर सारल्यामुळे यश मिळवता आलं…सागर मनोरे यांचा यशापर्यंतचा प्रवास….
स्पर्धा परीक्षा देण्याचं नक्की केल्यावर विद्यार्थी अभ्यास कसा करावा? रणनीती कशी आखावी? प्रश्नपत्रिका सोडवताना काय काळजी घ्यावी? नियोजन कसं करावं? याचबरोबर सतत प्रेरणा मिळावी व सकारात्मक दृष्टिकोन रहावा यासाठी विविध यशस्वी लोकांची भाषणे ऐकत असतात आणि व्हिडिओ पहात असतात आणि अधिक जोमाने अभ्यास करायला लागतात. तर अशा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारी यशापर्यंतचा प्रवास कसा केला त्याची एक वेगळी गोष्ट या लेखाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर २०२० च्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळवणारे म्हणून निवड झालेले सागर मनोरे; त्यांची रणनीती काय होती? त्यांनी यश मिळवताना त्यांचा अनुभव कसा होता? (Success story of Sagar Manore) या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे,
मूळचे गिरड, जळगावचे असणारे सागर सुरेश मनोरे यांनी आय.टी. इंजिनियरिंगची पदवी घेतली. पण इंजिनियर होऊनही स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात जायचं हे आधीच ठरवलं होतं. लहानपणापासून पोलीस अधिकारी असणाऱ्या वडिलांना पाहत आल्यामुळे घरातूनच त्यांना याबद्दलची प्रेरणा मिळाली होती. मुलाचीही प्रशासनात नोकरी करण्याची इच्छा ऐकून साहजिकच घरातूनही सागर यांना पाठिंबा मिळालाच.
क्लास लावावा की नाही?
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु करण्यापूर्वी क्लास लावावा की नाही हा मुख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतो. याबाबत बोलताना सागर म्हणतात की क्लास लावणं/ न लावणं हा खरंतर हा वैयक्तिक मुद्दा आहे. तसेच त्यासाठी पुण्याला जाणं याबद्दलही तेच मत आहे. कारण आज बऱ्याच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध होतात. पण क्लास लावणं, पुण्याला जाऊन अभ्यासिका लावणं. याचा फायदा होतो.अभ्यास करण्याची दिशा लवकर मिळते. आजबाजूचे विद्यार्थी अभ्यास करताना पाहून अभ्यास करण्याची ओढ वाढत जाते. जास्तीत जास्त वेळ त्या अभ्यासू वातावरणात रहायला मिळतं. जर घरात शांतपणे अभ्यास होत असेल तर चांगलं आहे, जरूर घरीच अभ्यास करावा. पण वैयक्तिक मत असं आहे की घरापासून लांब असावं. घरात राहून अभ्यास होत नाही. लक्ष विचलित होतं. पाहुणे येतात, विचारपूस होते, वेळ वाया जातो इ. म्हणून आपल्या गावात चांगली अभ्यासिका लावणं गरजेचं असतं. जर आपण नुकत्याच अधिकारी झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात असू तर लांब जाण्याची गरज नाही.
पुर्वी परीक्षेची तयारी कशी?
पूर्व परीक्षेची तयारी हा प्रक्रीयेदरम्यानचा महत्वपूर्ण टप्पा आहे. याविषयी सांगताना सागर म्हणतात की याबद्दल विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो की फक्त सीसॅट (CSAT) चा अभ्यास केला आणि यात पास झालं की पूर्वपरीक्षा सहज पास होतं येते. परंतू असं नाही. सामान्य अध्ययन (General Studies) याच्या चारही पेपरचा अभ्यास हा फार महत्वाचा आहे. त्याचा पूर्व परीक्षेपूर्वीच नीट अभ्यास केला नाही तर मुख्यपरिक्षेत नक्कीच गटांगळ्या खाव्या लागतील. म्हणून GS आणि सीसॅट दोन्हीवर योग्य पद्धतीने भर द्यायला हवा आणि दोन्हींमध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. कारण मुख्य परीक्षेत टिकायचं असेल तर GS वर भर देणं बंधनकारक आहे.
CSAT ची तयारी करण्याबद्दल सागर यांनी सांगितलं आहे की यांत बुद्धीमत्ता चाचणी (Aptitude) सहज जमत होतं कारण आधीपासून गणित चांगलं होतं. परिश्रम घ्यावे लागले ते उताऱ्यांवरील प्रश्न (Comprehension) यासाठी…याची तयारी करताना आयोगाचा उतारे टाकण्याचा दृष्टिकोन आणि पद्धत समजून घेऊन त्यानुसार याचा अभ्यास करणं जास्त योग्य आहे. तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून आधी विचारलेले प्रश्न समजून घेतले.
पूर्वपरीक्षेसाठी स्त्रोत आधी जास्त वापरले होते. म्हणून ३ परिक्षा दोनदा मुलाखती झाल्या..मग यादरम्यान अंदाज आला आणि मग स्त्रोत मर्यादित केले पाहिजेत. ते केल्यामुळे यश मिळालं. कारण पूर्व परिक्षेची माझी रणनीती ठरलेली होती.
पूर्व परिक्षेतला एक भाग म्हणजे इतिहास. पूर्व परीक्षेत इतिहासात १५ प्रश्न येतात. त्याचा ठोकताळा नाहीय की ५-५-५ असे प्राचीन-मध्ययुगीन-अर्वाचिन असे ठरवून आयोग कधी प्रश्न टाकत नाही. आयोगाच्या मनानुसार प्रश्न येतात. आधुनिक इतिहासाचा अभ्यास हा मुख्य परीक्षेच्या अभ्यासा दरम्यान झालेला असतो. यांवर जास्त लक्ष न देता ११ वी स्टेट बोर्डाचं आणि समाधान महाजन ही पुस्तकं आणि प्राचीन व मध्ययुगीन याकरता स्टेट बोर्ड आणि ल्युसेंट जनरल नॉलेज ही पुस्तकं वापरल्याचं सागर सांगतात. त्याच्या मते इतिहासाला पूर्व परीक्षेत जेमतेम महत्व द्यावं.
GS 3 ची तयारी…
मानवी संसाधन आणि विकास (HRD) या GS 3 च्या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय संघटना (International organizations) याबद्दलचेवर प्रश्न बऱ्याच वेळेस भंबेरी उडवतात. याची खास तयारी करायला हवी असं सागर सांगतात. यासाठी बाजारातल्या पुस्तकांचा फारसा उपयोग झाला नाही, उत्तरं चुकली असा सागर यांना अनुभव आला.
मग याचा खरी माहिती देणारा स्त्रोत म्हणजे त्या त्या संघटनेच्या वेबसाईट्स. या वेबसाईट्सवरून सगळी माहिती त्यांनी मिळवली. हे खरंतर खूप वेळ काढू होतं पण तेव्हा दुसरा पर्याय सागर यांना मिळाला नव्हता. मग पुढे जाऊन जेव्हा त्यांच्या हातात अध्ययन अकॅडमीचं GS 3 चं पुस्तकं आलं. त्यात सखोल आणि क्रमवार माहिती होती. ते खूप उपयोगी पडलं. ते वाचून सागर यांनी त्याच्या नोट्स काढल्या. त्या नोट्स अशा पद्धतीच्या होत्या की पेपरच्या आदल्या दिवशी वाचता याव्या. याचा त्यांना खूप फायदा झाला.
GS 3 मध्ये मूल्य, नीती, तत्वे आणि प्रमाणके उपघटक याचा अभ्यास करण्याबद्दलही सागर यांनी सांगितलं की यांवर विशेष भर दिला नाही. कारण याचं वेटेज बदलत असतं. यासाठी काय करावं? तर एक भावी प्रशासक म्हणून आपला दृष्टिकोन घडवणं फार महत्त्वाचं आहे कारण त्यावर हे प्रश्न सुटू शकतात. त्याचबरोबर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकाही उपयोगी पडल्या.
GS 4 साठी रणनीती…
या GS 4 मध्ये मुख्य काय तर अर्थशास्त्र. यासाठी स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून मूलभूत संकल्पना समजून घ्यायला हव्यात. तसेच अर्थव्यवस्थेची निगडीत गोष्टींवर कायम नजर ठेव्याला हवी. वर्तमानपत्रातील शेअर मार्केट, म्युचुअल फंड अशा गोष्टींवर भर देऊन त्याबद्दलची माहिती असायला हवी. अर्थशास्त्रीय संज्ञा नीट समजून घ्याव्यात. अर्थशास्त्रासाठी सागर यांनी रंजन कोळंबे, डिसले, अध्यनॉमिक्स ही पुस्तकं वापरली. त्या पुस्तकांच्या नोट्स काढल्या परंतु ज्या पुस्तकात जो टॉपिक चांगल्या प्रकारे दिला आहे, त्याच्या वेगळ्या नोट्स काढल्या.
मुख्य परीक्षा – इंग्रजी – मराठी व्याकरण पेपर
याबद्दल मार्गदर्शन करताना सागर यांनी सांगितलं की मराठीच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असाव्यात. इंग्रजी बोलताना अडचणी असल्या तरी वाचताना आणि लिहिताना अडचणी नसाव्यात.
मराठीसाठी मो.रा.वाळिंबे तर इंग्रजी व्याकरणासाठी पाल अँड सुरी ही अगदी योग्य पुस्तके आहेत.
मराठी आणि इंग्रजीचा पेपर सोडवताना आपापली अशी खास रणनीती आखण्याची गरज असते कारण हा वेळखाऊ पेपर असतो. यासाठी सागर यांनी आपलं १८:२२ वैयक्तिक सूत्र बनवलं. १८ मिनिटांत मराठीचे ४५ प्रश्न व २२ मिनिटांत इंग्रजी आणि १० मिनिटांत उतारे व नंतरच्या १० मिनिटांत गोळे ठरलेली रणनीती त्यानुसार कसून सराव केला. यासाठी आयोगाचे मागचे पेपर वेळ लावून सोडवावेत.सागर यांनी रोज एक पेपर सोडवले. कोणता विषय वेळखाऊ होणार आहे याचा अंदाज घेऊन त्याला जास्त वेळ म्हणजे २२ मिनिटे देऊन बाकी वेळेत बाकी पेपर सराव केल्याचं त्यांनी सांगितलं.
मुलाखत सगळ्यात महत्वाची
सागर यांना २ वेळेसचा मुलाखतींचा अनुभव आला होता. त्याची त्यांनी वेगळ्या तयारी प्रकारे केली होती. यासाठी ऑनलाईन चर्चा करण्यावर त्यांनी भर दिला होता. यासाठी टेलिग्राम चा उपयोग करून चर्चा त्यांनी रोज केली. ही चर्चा रोज १-१.५ तास होत असे. चालू घडामोडी वगैरे सर्व बाबींवर चर्चा केली जायची.
२०२० ची मुलाखत केवळ ९:३० मिनिटे झाली. या मुलाखतीला आंतरराष्ट्रीय संबंध, देशावरचे प्रश्न असे महत्वाचे कोणतेच प्रश्न न विचारता फक्त कौटुंबिक पार्श्वभूमीवर प्रश्न विचारले गेले. याची योग्य व आत्मविश्वासपूर्वक उत्तरं सागर यांनी दिली. पण या मुलाखतीबद्दल ते स्वतः समधानी नव्हते, असं त्यांनी सांगितलं. त्यांना ती मुलाखत होती की चाय पे चर्चा हेच कळलं नाही. पण नंतर यातच यश मिळालं.
कोणती सवय, गोष्ट केल्यामुळे यश मिळालं?
सागर यांनी त्यांच्या यशामागचं कारण म्हणजे भरपूर कष्ट आणि संयम हेच सांगितलं. व्यावहारिक राहून अभ्यास केला, भावनिक गुंतवणूक केली नाही. ते म्हणतात की तुम्ही एकदमच उत्कृष्ट विद्यार्थी असाल तर पहिल्या प्रयत्नात यश मिळतं. पण माझ्यासारख्या लोकांना संयमाने काम करावं लागतं. प्रयत्न करावे लागतात तेव्हाच यश मिळेल.
जर पूर्व परिक्षा हुकली तर किती मार्कात हुकली. पुढच्या जोमाने परिक्षा द्यायची आणि पास व्हायचं. तिसऱ्यांदा जर पूर्व परीक्षा नापास झाल्यानंतर दुसरं करिअरचा विचार करावा. सागर यांनी सांगितलं की ते जर पूर्व परीक्षेत अपयशी झाले असते तर एमबीए करण्याचा माझा विचार होता. पण ते पास झालो. मुख्य परीक्षेत एकदा पास होऊन दोन मार्कांत पोस्ट हुकली. इथून शिकायला मिळालं की भावनिक बांधिलकी ठेवायची नाही. हा तुमचा कमकुवतपणा होतो. यंत्रासारखं काम म्हणजे अभ्यास करायला हवा.
आताच्या विद्यार्थ्यांना संदेश…
प्रशासनात का यायचं आहे? हा मुख्य आणि पहिला प्रश्न स्पर्धा परिक्षा देण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारायला हवा. सुरुवातीलाच अभ्यासक्रम व विषय नीट पाहून घेणं, ते आपल्या आवडीचे आहेत का? याचीही चाचपणी करायला हवी.
प्रेरणादायक व्हिडिओ पाहणे, कोणीतरी म्हणतंय म्हणून स्पर्धा परीक्षा करू नये. हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. कारण इथं अंधार खूप आहे. प्रकाश फार कमी जणांना मिळतो. यशाचं प्रमाण किती आहे याचा अंदाज घ्यावा. वाटेत जे टप्पे पार करावेत तरच यश पदरात पडेल असं सागर मनोरे यांनी सांगितलं.