१२००० किलो टाकाऊ प्लॅस्टिकचा केला पुनर्वापर आणि महिला झाली कोट्याधीश.

‘कोंड्याचा मांडा करणे’ ही म्हण भारतीय महिलांना नवीन नाही. सर्वसामान्य महिलांच्या अंगी नाविन्यपूर्ण कला आहे की जुन्या फारश्या उपयोगात नसलेल्या वस्तूंना घरात पुन्हा उपयोगाला आणणे. ही गोष्ट आहे अशाच एका महिलेची जिने जुन्या नव्हे तर कचऱ्यात टाकलेल्या प्लॅस्टिकची शोभाच वाढवली नाही तर त्यापासून लोक खरेदी करतील अशा शोभिवंत वस्तू बनवल्या आणि करोड रुपये कमावले. त्या महिलेबद्दल आणि तिच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

‘प्लॅस्टिक’ ही २१ व्या शतकात मानवी जीवनाला भेडसावणारी ही मोठी समस्या (plastic is major problem for environment) आहे. प्लॅस्टिक जमिनीत गाडले गेले तरी कित्येक वर्षे तसेच राहते, त्यामुळे सृष्टीचक्र बिघडून चालले आहे.  दिल्लीतल्या एका जोडप्याला याची चाहूल २० व्या शतकाच्या शेवटीच लागल्याने अनिता आणि शलभ आहुजा यांनी १९९८ मध्ये एनजीओ कंझर्व्ह इंडियाची स्थापना केली.ऊर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे, हा या एनजीओचा मुख्य उद्देश होता. या आहुजा दाम्पत्याला एक मुलगी आहे, कनिका तिचं नाव. खरंतर हे अहुजा पती-पत्नी करत असलेलं काम खूप मोठं होतं, परंतु आपल्या मुलीने यात उतरू नये, अशी त्या दोघांची इच्छा होती. म्हणून १२ वी नंतर कानिकाने मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कर्नाटक येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि नंतर एसआरसीसी येथून एमबीए करण्यासाठी ती पुन्हा दिल्लीला आली. २०१५ पर्यंत कानिकाने मार्केट रिसर्च फर्ममध्ये नोकरी केली. पण वर्षभरानंतर तिला ही नोकरी सोडण्याची इच्छा झाली.

कनिका यांनी केली सुरुवात

२०१६ मध्ये कनिका आपल्या पालकांनी स्थापन केलेल्या एनजीओमध्ये सामील झाल्या. पण काहीच दिवसानंतर एक असा मुद्दा आला की कनिका यांना हे कंझर्व्ह इंडिया करत असलेले काम फक्त निर्यात केंद्र असल्यासारखे वाटू लागले. तेव्हाच त्यांनी काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आणि  करत असलेल्या कामाचे पुनर्मूल्यांकन करण्याबद्दल ठरवलं. काही दिवसांच्या विश्रांतीमधून २०१७ साली ‘लिफाफा’ (Lifaffa) चा जन्म झाला. टाकून दिलेले प्लॅस्टिक पासून पाकीट, पिशव्या, लॅपटॉप स्लीव्हज, टेबल मॅट्स, इत्यादीं शोभीवंत वस्तू बनवण्याचा हा उद्योग ज्याचं ‘लिफाफा असं नामकरण केलं. दरवर्षी सुमारे १२ टन टाकून दिलेले ‘प्लॅस्टिक’ वापरून वस्तू बनवल्या जातात. अगदी काही कालावधीतच ‘लिफाफा’ हा ब्रँड बनला. भारत, यूएसए आणि युरोपमध्ये पुनर्वापर होणाऱ्या प्लॅस्टिक उत्पादनांची (Upcycled plastic products) डिझाईन आणि मार्केटिंग या लिफाफाद्वारे केली जाते. 

बनवली अर्थव्यवस्थेची एक साखळी

२०१७ मध्ये एक स्वतंत्र सामाजिक उपक्रम म्हणून लिफाफा लाँच केले गेले. टाकून दिलेल्या प्लास्टिकपासून छान वस्तू बनवण्यासाठी गटांना प्रशिक्षित करणे आणि भारतातील विकेंद्रित उत्पादन व्यवस्थेकडे वाटचाल करणे हा यामागचा खरा उद्देश होता. कन्झर्व्ह इंडियाने खरेदीदारांचे नेटवर्क तयार करण्यावर चांगलाच भर दिला. म्हणून ही उत्पादने तयार करण्यासाठी लोकांच्या गटांना प्रशिक्षण देऊन सुरुवात केली, ज्याची नंतर लिफाफा या ब्रँड नावाने विक्री केली गेली. सुरुवातीच्याच काही महिन्यांमध्ये लिफाफाने ‘अशोका’ या जगभरातील सामाजिक उपक्रमांना शोधून त्यांना मदत करणारा जागतिक उपक्रम फंडाकडून निधीही मिळवला. मिळालेल्या सुरुवातीच्या निधीनेच लिफाफाला प्रगतीपथावर वाटचाल करण्यासाठी इंधनाचंच काम केलं. 

एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकचा पुनर्वापर (Reuse of single used plastic) आणि करण्यासाठी सतत नवकल्पना विकसित करण्यावर काम करून लिफाफाने सुरुवात केली. हे प्लॅस्टिक  त्या वेळी कोणीही गोळा करून त्याचा पुनर्वापर करत नव्हते. लिफाफाने सिंगल-यूज प्लास्टिकचे नवीन फॅब्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले. या सिंगल-युज प्लॅस्टिक पिशव्या किती रंगांमध्ये बनवता येतात, याचं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं, ज्यामुळे लिफाफाचा खूप फायदा झाला. त्यातून सुंदर नमुने तयार करता आले. एका अनोख्या कल्पनेसह नुकत्याच सुरु झालेल्या या ब्रँडला २०१७ मध्येच मानाच्या लॅक्मे फॅशन वीक (Lakme Fashion Week) मध्ये स्थान मिळालं. या लॅक्मे फॅशन वीक मंचावर आपल्या बॅग्ज आणि वॉलेट अशा काही फॅशन अॅक्सेसरीज उत्तम प्रदर्शन करण्याची एक चांगलीच संधी मिळाली. लिफाफा या नव्या ब्रँडसाठी एक उत्तम लॉन्चपॅड ठरला.

सध्या लिफाफाकडे दरमहा १ टन प्लॅस्टिक पुनर्वापर करण्यात येते. 

मागील दोन वर्ष सगळ्या जगाला जसा कोरोनाचा फटका बसला तसा तो लिफाफाला पण बसला. पण पुन्हा सगळं सर्व रुळावर आलं तसं लिफाफाचंही झालं आणि आता दरमहा १ हजार किलो प्लॅस्टिक पुनर्वापरात आणलं जात आहे. यासगळ्या द्वारे एक महत्वाची गोष्ट होत आहे ती म्हणजे या सिंगल युज्ड प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तू आता चामड्याच्या वस्तूंना पर्याय बनत आहेत. ही लिफाफासाठी सगळ्यात जमेची बाजू ठरलेली आहे.

पर्यावरणाची कमीतकमी हानी होईल आणि तरीही उच्च दर्जाची उत्पादने ही ग्राहकांना चटकन भावली. त्याचबरोबर ही उत्पादने म्हणजे पर्यावरणपूरक आहेत, हे ही ग्राहकांच्या लक्षात आलं आहे. लिफाफाकडे सर्व स्तरातील ग्राहकांसाठीची उत्पादने आहेत, म्हणून याला लवकर लोकप्रियता मिळाली. म्हणूनच 

कायमस्वरूपी चालणारी आकर्षक फॅशन बनवणे. 

सध्या, लिफाफा २०० कचरा कामगार आणि ३०० कारागिरांसह काम करते. यापैकी अनेक महिला आहेत आणि काही निर्वासित देखील आहेत. एक पिशवी बनवायला एका व्यक्तीला साधारण दीड दिवस लागतो आणि महिनाभराच्या कामासाठी त्यांना जवळपास ८००० रुपये मिळतात. आता फक्त पिशव्याच नाही तर टेबल कव्हर, मॅट्स, ट्रे इत्यादी देखील बनवतात. कनिका यांनी पारंपारिक हस्तकलेमध्ये कुशल असलेल्या भारतातील अफगाणी निर्वासित महिलांच्या गटाला रोजगाराची संधी दिली व सहकार्य केले आहे. सर्व वयोगटांसाठी टिकाऊ तसेच आकर्षक फॅशनची उत्पादने बनवण्याची कल्पना आहे. ही टिकाऊ तर आहेतच आणि खूप ट्रेंडीही आहेत. या विविध शैली आणि डिझाइन घटकांचे एकत्रीकरण केल्याने अॅक्सेसरीजचे काही आकर्षक नमुने तयार होतात.

गेल्या आर्थिक वर्षात रु. १ कोटी कमाईचा टप्पा ओलांडल्यानंतर, येत्या वर्षात ब्रँड हा विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहे. आर एलान ‘फॅशन फॉर अर्थ’, लॅक्मे फॅशन वीक (LFW) आणि संयुक्त राष्ट्र (UN) अशा देशभरातील ३० हून अधिक शहरांमधून महत्वाच्या मंचांवर लिफाफाने स्थान मिळवले. कनिका आहुजा, लिफाफा हा आश्चर्याचा, चर्चेचा आणि कौतुकाचाही विषय बनलेले आहेत. पण कचर्‍यापासून बनवलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी पैसे का खर्च करावेत, असे लोक अजूनही विचारतात. कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊनही लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे हे सर्वात मोठे आव्हान लिफाफासमोर आहे, हे ही तेवढंच खर आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole