रणनीतीतला बदल देऊन गेला यश, आयएएस अमित काळे यांचा यशाचा प्रवास….
राजकारण असो की कला, क्रीडा असो की साहित्य महाराष्ट्रात एक मोठी परंपरा राहिलेली आहे. विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात जन्मलेल्या धुरिणांनी यश संपादन करून उज्ज्वल कारकीर्द घडवली आहे. असं अजून एक क्षेत्र आहे, ते म्हणजे प्रशासन. प्रशासकीय सेवेत रुजू होऊन देशातील विविध राज्यांमध्ये सेवा बजावून या मराठी अधिकाऱ्यांनी नावलौकिक मिळवला आहे. या मराठी परंपरेतील अधिकारी व्यक्तींचा प्रवास, त्यांचा लढा, कार्य याची माहिती घेऊन बाकी युवक युवती प्रेरित होतील म्हणून आयएएस अमित काळे यांची यशोगाथा जाणून घेऊयात.
अमित काळे यांचा संघर्ष
राष्ट्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही सगळ्यात अवघड परीक्षांपैकी एक आहे. त्याची तयारी करण्यासाठी खूप खडतर परिश्रम घ्यावे लागतात हे सर्वश्रुत आहे. तर अशा परिश्रमपूर्वक असलेल्या या प्रवासाचा शेवट कुणाचा एका वर्षात होतो तर कुणाला वर्षांची मेहनत घ्यावी लागते. तर असेच अमित काळे हे तीन प्रयत्नानंतर यशस्वी झाले.
अमित काळे यांचा हा प्रवास अतिशय खडतर आहेच त्यातून प्रेरणा घ्यायला हवी, असा आहे. नागरी सेवा परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील पहिला टप्पा त्यांनी दोन वेळेस पार केला. पण पुढे जाणं त्यांना जमत नव्हतं. पण जमत नाही म्हणून त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. सतत लढा देत राहिले.
तिसरा प्रयत्न करताना त्यांनी पूर्व- मुख्यपरीक्षा- मुलाखत हे टप्पे पार पडले आणि त्यांनी यश संपादन केलं. पण त्यातही हवं ते पद यावेळी अमित यांना मिळालं नाही. कारण त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत जायचं म्हणून पुन्हा एकदा अमित यांनी परीक्षा देण्याचा निर्णय घेऊन अभ्यास सुरु केला. २०१८ च्या परीक्षेत त्यांनी यश मिळवलं आणि पुढच्याच वर्षी प्रशासकीय सेवेत स्थान मिळवले. तेव्हा अमित भारतीय संरक्षण मालमत्ता सेवा इथे प्रशिक्षण चालू होतं.
अमित काळे यांनी नागरी सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितात की तयारी सुरु करताना आधी आपली क्षमता समजून घ्यायला हवी कारण क्षमता कळली की परीक्षेसाठी योग्य रणनीती बनवायला सोपं जातं. जे विषय कठीण आहेत, असं आपल्याला वाटतं, त्याच्या तयारीसाठी जास्त वेळ द्यायला हवा. बाकी विषयांसाठीही वेळापत्रक बनायला हवं. पेपर सोडवण्यावर भरपूर भर द्यावा. यातून वेळेत उत्तरं लिहीण्याची सवय लागेल. उगीच भारंभार साहित्य वापरू नये. ठराविक संदर्भ पुस्तकं वापरावीत. इंटरनेटचा जरूर पण मर्यादितपणे करा.अभ्यास झाला की उत्तरलेखनाच्या उजळणीसाठी वेळापत्रक बनवावं. पहिल्या प्रयत्नात जर यश मिळवता आलं नाही तर निरुत्साही होता कामं नये. अपयश आलं तर खचून न जाता जोमाने प्रयत्न करून यश खेचून आणायला हवं.