आरं कंडक्टर तरी होशील नव्हं का? असा प्रश्न ज्याला विचारला तो झाला डेप्युटी कलेक्टर…

आपल्याकडे एखाद्या समारंभात किंवा अजून कुठे भेटल्यावर चौकशी करायची अशी रीत आहे. सगळं ठीक चाललंय ना? मुलं-बाळं काशी आहेत? त्यांचं काय चाललंय? अशी सगळी चौकशी केली जाते. कधी त्यात प्रेम आपुलकी असते तर कधी चिडवण्याची इच्छा कारण प्रत्येकाच्या घरी सगळं आलबेल असेलच असं नाही. म्हणून तर मुद्दाम त्या गोष्टीबद्दल विचारलं जातं. पण या चिडवण्याच्या वृत्तीलाही कोण आपली प्रेरणा बनवतो आणि आपलं आयुष्य उजळून टाकतो, अशा एका तरुणाची ही यशस्वी बनण्याची कहाणी (DC Haresh Sul Success Story) जाणून घेऊयात,

काय आहे त्याची पार्श्वभूमी ?

त्याचं नाव हरेश सूळ. तो मूळचा मोरोची तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर (Dc Haresh Sul, Dist. Solapur). गावाकुसांत राहिलेला, ग्रामीण भागात त्याचं शालेय शिक्षण झालं. पण त्याच्या मित्राच्या वडिलांनी याच्या वडिलांना सांगितलं की आता ११ वी पासून माझा मुलगा आयआयटीच्या तयारीसाठी पुण्याला राहणार आहे, तर तुमच्या मुलालाही ठेवा. मग त्यानिमित्ताने हरेश पुण्यात आला. आयआयटीची तयारी सुरू केली. पण आधीचं सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झालं होतं आणि हे अचानक इंग्रजी माध्यम…अवघड जाऊ लागलं होतं.

नंतर आयआयटीचा नाद सोडून दिला. आणि ११ वी – १२ वी पूर्ण केली. पुढे CET दिली आणि त्याद्वारे पिंपरीच्या डी.वाय.कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये मेकॅनिकल विभागात प्रवेश (Mechanical Engineering) घेतला. तिथं हरेशनं व्यवस्थित पणे पदवी घेतली. आणि Campus मधून त्याची निवड झाली. आता तो जॉब मेकॅनिकल क्षेत्रातला म्हणजे किती यंत्रवत काम करावं लागत असेल, पण हरेशचं मन इथं रमत नव्हतं. कारण ज्याप्रमाणे त्याचे वडील हे सामाजिक वृत्तीचे होते. गावात कायम माणसांमध्ये राहायचे, अडीअडचणीला धावून जायचे. हेच संस्कार हरेशच्याही मनावर झालेले होते. म्हणून त्यालाही असंच माणसांत राहण्याची इच्छा होती.

मग त्यानं एकदा शनिवारी सुट्टीला घरी गेल्यावर तो ही नोकरी सोडत आहे, याबद्दल आई-वडिलांना या निर्णयाची कल्पना दिली. घरी विचारणा झाली की मग पुढं काय करणार? तर हरेशनं व्यवसाय करण्याची इच्छा आहे, असं उत्तर दिलं. व्यवसाय करण्यासाठी त्यानं व त्याच्या मित्रानं छानबिन करण्यास सुरुवात केली. कोणी मार्गदर्शन करेल का? यासाठी खूप लोकांना भेटण्याचा सपाटा लावला. लोक प्रोत्साहित करण्यापेक्षा नाउमेदच करत होते. तरीही हरेशनं भेटणं चालूच ठेवलं.

हरेशनं मोर्चा आता वळवला…..

व्यवसायाच्या मार्गदर्शनासाठी एकाला हरेश व त्याचा मित्र जेंव्हा भेटायला गेले होते. तेंव्हा त्या व्यक्तीचे वडील भेटले आणि त्यांनी या दोघांची चौकशी केली. त्यांचा थोरला मुलगा तहसिलदार होता (tahsildar). त्यांनी यांना स्पर्धा परीक्षा करण्याबद्दल (competitive exam) सल्ला दिला. हरेशच्या डोक्यात हा विषय घोळत राहिला. यामुळे मान-सन्मान मिळेल आणि समाजासाठी काहीतरी करता येईल (Contribution to Society). आणि हरेशनं UPSC करण्याचा विचार पक्का केला. घरी याबद्दल सांगितलं. घरच्यांनीही याला पाठिंबा दिला. यासाठी त्यानं क्लास लावला.

इंग्रजीमध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम असल्यामुळं हे UPSC प्रकरण त्याला अवघड चाललं होतं. त्याला सगळं अवघड जात होतं. ७ -८ महिने गेले. त्यानं MPSC कडे लक्ष देण्यास सुरुवात केली. आधी अभ्यास तर तयार होताच आता केवळ महाराष्ट्राशी संबंधित बाबी पक्क्या करणं आवश्यक होतं. त्या करून त्यानं २०१४ चा प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षेसाठी ६ गुण कमी पडले. आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं अपयशाची चव चाखली होती. त्यामुळं तो तणावात गेला. तो काही दिवस फक्त रोजचा पेपर वाचण्यासाठी अभ्यासिकेत जात होता. एका मित्रानं त्याला staff selection करण्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, या परिक्षांमधून निवड लवकर होते. म्हणून हरेशनं staff selection चा अभ्यास चालू केला.

दोनदा त्यानं पूर्व आणि मुख्य परीक्षा देऊन पाहिली. तिथंही अपयश आलं. त्याला हा अभ्यास करताना वाटलं की यातून पद मिळेल पण जन संपर्क जो हवा आहे तो नाही मिळणार. मग पुन्हा एकदा MPSC वर लक्ष केंद्रित केलं. २०१५ ची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली. मुख्य परीक्षेसाठी तो पात्र ठरला. त्याला ही मुख्य परीक्षा देण्याची इच्छा नव्हती. पण मित्राने त्याला आग्रह केला आणि त्यानं तीही दिली यावेळी त्याला मुलाखतीसाठी पात्र होण्यास केवळ २१ गुण कमी पडले. त्याचा आत्मविश्वास वाढला. त्यानं ठरवलं की १००% या परिक्षेवरच लक्ष केंद्रित करायचं.

यशाच्या जवळ जाऊन यशाची चव चाखता येत नव्हती.

हरेशनं पुन्हा २०१६ च्या राजसेवा परीक्षेची तयारी केली. तो पूर्व व मुख्य परीक्षा पास झाला आणि त्यानं मुलाखतीसाठीचे प्रयत्न चालू केले. यावेळी यश आलं नाही, पण मुलाखतीचा अनुभव आला. यावेळी शासनाने केवळ १३५ पदांची भरती जाहीर केली होती. पुन्हा एकदा २०१७ ची परीक्षा, त्यानं तयारी सुरू केली. आता ४०० जागांसाठी पदभरती निघाली होती. यावेळी नक्कीच १ जागा मिळेल असं त्याला वाटलं. तो ज्या जोमानं तयारी करत होता त्यात थोडी ढिलाई आली. सातत्य कमी पडलं. पूर्व परीक्षा दिल्यावर जेंव्हा त्याला कळलं की तो मुख्य परीक्षेसाठी पात्र झाला नाही. वडिलांनी त्याला नीट समजावलं की जर पूर्ण वेळ प्रयत्न करूनही मुलाखतीपर्यंतही पोहोचता येत नसेल नक्की काहीतरी चुकत आहे. पुन्हा २०१८ चा प्रयत्न केला. 

यशाचा मार्ग खडतर असतो.

२०१८ चा प्रयत्न केला. मुलाखत वगैरे सगळे सोपस्कार पार पाडले. त्याच्या वाढदिवसा दिवशी ७ एप्रिल २०१९ ला निकाल होता. यादीत नाव आलं नाही. पण रडत बसायला वेळ नव्हता. आता ५-६ दिवसांत २०१९ ची पूर्व परीक्षा होती. त्याला बऱ्याच वेळा अपयश पदरांत पडल्यामुळे तणाव वगैरे होताच पण आता गावातले नातेवाईक ओळखीतले लोक विचारपूस करत होते, की झाला का अधिकारी? मिळालं का पद? यावर उत्तर देणं ही अवघड होऊन गेलं होतं.

एक जण तर आरं कलेक्टर राहू दे कंडक्टर तरी होशील का न्हाई?…

कोणी कोणी तर साहेब अशी चेष्टेनं सगळ्यांना उत्तरं देण्यापेक्षा त्या काळात त्यानं सामाजिक सहभाग कमी केला. समारंभांना जाणं बंद केलं. आता संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. पूर्व परीक्षा दिली. आता तो मुख्य परीक्षेची तयारी करू लागला. त्यानं मुख्य परीक्षा दिल्या नंतर पहिली answer key तपासली आणि मुलाखतीच्या तयारीला लागला त्याला मुलाखतीसाठी आपण पात्र होऊच हा विश्वास होता. पुन्हा दुसरी key आली. त्यात त्याला १६ मार्क कमी झालेले दाखवले. त्याची परत धाकधूक वाढली. पण तरीही त्यानं मुलाखतीच्या तयारीकडे दुर्लक्ष केलं नाही. 

आणि अखेर DC Haresh Sul –

या प्रयत्नानंतर त्याला विश्वास होता की काही नाही तरी हाताला लागेल. वर्ग १ नाही तरी वर्ग २ अधिकारी तरी होऊच असं त्याला वाटत होतंच. आता निकाल जवळ आला आहे, त्या आशेवरच तो होता. पण तो कोरोनाच्या पहिल्या लाटेचा काळ (first wave of Covid 19) होता. त्यानं गावी जायचं ठरवलं. घरी आला आणि लॉकडाऊन (lockdown) ची बातमी कानावर पडली. मार्च ते मे असेच गेले. आज निकाल उद्या निकाल, अशा वावड्या तर रोजच उठत होत्या. पण १९ जून २०२० या दिवशी निकाल लागणार होता.

हरेश सकाळपासून शांत होता. वडिलांनी या शांततेची चौकशी केली. तेंव्हा त्यानं सांगितलं की आज निकाल आहे. वडील आणि हरेश शेतात होते. मित्र हरेशला फोन करून त्याला धीर देत होता. थोड्याच वेळात मित्रानं पुन्हा त्याला फोन करून सांगितलं की निकाल लागला. हरेशला ती यादी उघडून नाव टाकायचं धाडस होत नव्हतं. पण वडिलांनी सांगितलं की देवाचं नाव घेऊन उघड यादी. तर त्याला विश्वासच बसला नाही. महाराष्ट्र स्तरावर २२ वा क्रमांक आणि उपजिल्हाधिकारी हे पद (Deputy Collector, Maharashtra Rank 22) त्याला मिळालं होतं. वडील तिथं शेतातच नाचायला लागले. दोघे घरी गेले आणि आईला ही आनंदाची बातमी त्यानं दिली. सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते.

काय होती MPSC Exam Strategy ?

२०१८ च्या परिक्षेआधी त्यानं यशस्वी झालेल्या मित्रांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी हरेशला सल्ला दिला की जास्त मटेरियल नको वापरू. मागील जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका पहा आणि सोडव. त्यानं परिक्षेआधी ५०-६० दिवस सर्व अभ्यास पूर्ण केला होता. नंतर केवळ सरावावर भर दिला होता.  वेळ काढणं बंद केलं. अभ्यासू आणि आधी यशस्वी झालेल्या मित्रांचा ग्रुप बनवला. अगदी मिनिटा मिनिटांचं नियोजन त्यानं केलं. ३ दिवसांची मुख्य परीक्षा असते. त्यात पेपर च्या मधल्या वेळेत काय वाचायचं? इतकं छोटं छोटं नियोजन करण्यावर भर दिला गेला.

२०१७ च्या आधी त्याला स्वतः नोट्स काढायची सवय नव्हती. ती त्यानं लावून घेतली. २०१८ च्या प्रयत्नापासून आधी होणाऱ्या सगळ्या चुका त्यानं सुधारल्या. मुलाखतीसाठीची तयारी करताना ड्रेसिंग कसं असलं पाहिजे. तसंच अगदी छोट्या छोट्या मुद्यांवर काय बोललं पाहिजे? याची तयारी केली. हरेशला मुलाखती दरम्यान जे पॅनल होतं, ते अवघड होतं. आता सोलापूर हा ऊस पट्ट्यातील जिल्हा. त्याला ऊस-साखर त्यावरची आंदोलनं व प्रश्न याबद्दल १०- १५ प्रश्न विचारले गेले.

कॉलेजच्या शिक्षणासाठी हरेश पुण्यात राहिला. तिथं शेतकरी संघटनेशी जोडला गेला. अन्य विविध क्षेत्रातील लोकांची भाषणं त्याला ऐकायला मिळाली. यामुळं त्याचं व्यक्तिमत्व घडत गेलं आणि आपसूक हा फायदा त्याला मुलाखतीच्या वेळी झाला. त्यानं सांगितलं की त्याची प्रत्येक कृती अशी होती की त्यातून त्याचे मार्क कसे वाढतील यासाठीचा प्रयत्न होता.
त्यानं सर्वांनाच हा संदेश दिला आहे की आपला comfort zone सोडा.. आधी काय करायचं ते ठरवा…त्यासाठी आपलं १००% द्या…यश तुमचंच आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole