अभ्यास झाला, उजळणीचे काय? या टेक्निक्स वापरा.

वापरापरीक्षा कोणतीही असतो तिच्या उजळणी किंवा रिव्हिजनशिवाय केलेला अभ्यास पुन्हा आठवत नाही. त्यामुळे अभ्यास, सराव यांच्याबरोबरीने महत्त्व असते ते उजळणीला. सर्वसाधारण शिकताना आपण एखादा विषय शिकण्याच्या, त्याच्या अभ्यास करण्याच्या पद्धती शिकतो, आत्मसात करतो. मात्र केलेला अभ्यास लक्षात ठेवून तो प्रत्यक्ष पेपरात लिहिणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच उजळणी किंवा रिव्हिजनला असलेले महत्त्व नाकारता येणार नाही. त्यामुळे अभ्यास, सराव यानंतर अत्यंत महत्त्वाच्या अशा उजळणीविषयी जरा जाणून घेऊया. 

परीक्षेला सामोरे जाण्याआधी आपण केलेला अभ्यास, वाचलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा एकदा आठवून पाहणे म्हणजे उजळणी किंवा रिविजन, ही व्याख्या म्हणून बरोबर आहे. पण मेंदू सर्वच वाचलेल्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण पुस्तक वाचले तरीही त्यातील काहीच गोष्टी लक्षात राहातात. त्यामुळे आपण केलेला अभ्यास सतत वाचन, मनन आणि चिंतन केल्याने टप्प्याटप्प्याने तो लक्षात राहायला लागतो. त्यामुळे एखादे पुस्तक जेव्हा शंभर वेळा वाचले जाते तेव्हा ते लक्षात राहते. 

उजळणी करण्याच्या काही टेक्निक्स वापरता येतील. व्यक्तिपरत्वे त्यात बदलही होत असतो पण सर्वसाधारण व्यक्तीचा लक्षात ठेवण्याचा काळ हा २४ तासांचा असतो म्हणजे आपण जे वाचू ते २४ तास लक्षात राहू शकते. याचा अर्थ असाही की चोवीस तासाने ते आपल्या डोक्यातून निघून जाऊ शकते. मग अशा वेळी उजळणीसाठी एक पद्धत वापरायची ती म्हणजे २४-७-३० 

मानवी मेंदूचा विचार करून यातील काही गोष्टी ठरवण्यात आल्या आहेत. माणूस एखादी गोष्ट वाचली की ती चोवीस तास लक्षात ठेवू शकतो मग ती विसरली जाऊ लागते. तेव्हा आदल्या दिवशी जो धडा किंवा भाग वाचला आहे तो पुन्हा चोवीस तासाने वाचायचा आणि डोक्यात पक्का करायचा. आता हे केलेले वाचन साधारण सात दिवस म्हणजे एक आठवडाभर आपल्या डोक्यात पक्के होते आणि थोडे थोडे लक्षात राहायला लागते. 

त्यानंतर आपण वाचलेल्या गोष्टी विसरल्या जाऊ शकतात त्यामुळे सात दिवसांनंतर पुन्हा तोच भाग किंवा धडा वाचून काढायचा. तेव्हा वाचताना आपण मागे वाचलेल्या गोष्टी पुन्हा आठवू लागतात. त्यानंतर तो विषय थेट तीस दिवसांच्या अंतराने पुन्हा तो विषय आपल्याला पहायचा आहे. या तंत्रात तुम्ही थोडे विसरायला लागलात की पुन्हा लक्षात राहते आणि आपल्याला समजते की आपल्या लक्षात काय राहत नाही. ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत त्या नोंदवून ठेवायच्या किंवा त्या लहान लहान कागदावर लिहून डोळ्यांसमोर राहतील अशा ठिकाणी चिकटवून ठेवायच्या. त्या नेहमीच नजरेसमोर राहतील आणि रोज झोपण्याआधी त्या वाचल्या तर त्या डोक्यात पक्क्या होतात. 

या प्रकारे सर्वच विषयांची रिव्हिजन करता येते आणि मुख्य म्हणजे एका विषयाच्या जास्तीत जास्त रिव्हिजन होऊ शकतात आणि मुद्देही पक्के लक्षात राहतात. त्याशिवाय प्रत्येक धडा किंवा पाठावरील प्रश्न सोडवण्याचा सराव करावा. जेणेकरून वाचलेली माहिती पुन्हा आठवावी लागते. त्यामुळे उजळणी होईल. व्हिडिओ लेक्चर पाहूनही उजळणी करता येऊ शकते. त्यात आकृत्या, विविध उदाहरणे देऊन शिकवले जात असल्याने त्याच्या मदतीनेही उजळणी करता येते. यामध्ये संकल्पना लक्षात राहाण्यास मदत होते. काहीजण मित्रांबरोबर विषयांवर चर्चा करतात, ही पद्धतही उत्तम आहे. गटचर्चेत समजलेला भाग दुसऱ्याला समजावून सांगण्याने देखील लक्षात राहाण्यास मदत होते त्यामुळे उजळणीचा हा पर्यायही वापरता येतो. 

एमपीएससी सारख्या परिक्षेत उजळणीला फार महत्त्व आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे केलेल्या अभ्यासाची आवश्यक तितकी उजळणी होणे फार गरजेचे असते. तेव्हा आपल्याला सोपी वाटेल त्या पद्धतीने उजळणी करा आणि अभ्यास पक्का करून घ्या. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole