असं काय झालं की सरकारने प्लाझ्मा थेरपी बंद केली?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आता थोडा कमी होऊ लागला आहे. जागतिक विक्रम होईल इतके सक्रिय रुग्ण २४ तासांत सापडले, मृत्यूने थैमान घातलं. लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, पण लसींचा तुटवडा निर्माण झाला, लसीकरण बंद आहे. डीआरडीओने 2डीजी हे औषध शोधून काढले आहे. मग याआधी कोरोना रुग्णांना दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) होती. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाज्मादान करण्याबद्दल आवाहन केलं जायचं. मे च्या सुरुवातीपर्यंत प्लाझ्माची गरज आहे असे मेसेजेस् आपल्याला आलेही असतील, पण भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (ICMR) ने कोरोनावर उपचारासाठी असणारी ही plasma therapy; तिचा वापर थांबवण्याचे नुकतेच आदेश दिले. असं का करायला सांगितलं? काय त्या मागची कारणं? जाणून घेऊयात, 

प्लाझ्मा थेरपी काय आहे?

आपल्या रक्तात चार घटक असतात. लाल रक्त पेशी (ज्याला एरिथ्रोसाईट्स असंही म्हणतात.), पांढऱ्या रक्त पेशी (ज्याला ल्युकोसाईट्स असं म्हणतात.) प्लेटलेट्स (ज्याला थ्रोम्बोसाईट्स असं म्हणतात), शेवटचा प्लाझ्मा. तर प्लाझ्मा हा द्रवरूप घटक आहे व ज्याचं प्रमाण ५५% इतकं आहे. प्लाझ्मा हे कर्बोदके, प्रथिने, क्षार, स्निग्ध पदार्थ, पाणी यांचं एक मिश्रण असतं. लाल रक्तपेशी शरीरभर वाहून नेण्याचं काम हा प्लाझ्मा करतो. त्याच्याबरोबरीने रक्त गोठण्यास मदत करणारे प्रथिने, संप्रेरके, टाकाऊ पदार्थ ही या प्लाझ्मामध्ये असतात. पांढऱ्या रक्तपेशींमधल्या बी लिम्फोसाईट्स या एक प्रकारचं प्रथिन स्रवतात, त्याला इम्युनोग्लोब्युलिन म्हणतात. हे प्रथिन म्हणजेच अँटिबॉडी.

आता या अँटीबॉडीज् (antibodies) एखादा जीवाणू किंवा विषाणू शरीरात प्रवेश करतो तेंव्हा तयार होतात, त्या जीवाणूच्या/विषाणूच्या पेशीवरच्या भागाला जाऊन चिकटतात, त्याला अँटिजेन (antigen) म्हणतात. तर या अँटीबॉडीज् प्लाझ्मा मध्ये असतात. जेंव्हा कोरोनातून बरा झालेला रुग्ण त्याच्या शरीरात या अँटीबॉडीज् जर एखाद्या कमी प्रतिकारक शक्तीच्या सक्रिय रुग्णाला दिल्या तर त्याची प्रतिकारकक्षमता अधिक वेगाने काम करते. म्हणजे या अँटीबॉडीज् विषाणूला जखडून ठेवून त्याला मानवी पेशीपासून दूर ठेवून वाढण्यापासून रोखतात आणि रुग्णाचा आजार लवकर बरा होतो. 

Plasma Therapy बंद का केली ?

सार्स व इबोला सारख्या भयानक आजारांवर या उपचारपद्धतीचा चांगलाच उपयोग झाला होता तरीही ही परिणामकारक उपचारपद्धती कोरोनासाठी बंद करण्याचा राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सने घेतला का? काही वैद्यकीय संशोधक व डॉक्टरांनी केंद्राचे वैद्यकीय सल्लागार यांना पत्र लिहून ही उपचारपद्धती बंद करण्याचं आवाहन केलं होतं. कोरोना रुग्णांच्या बाबतीत गेल्या काही महिन्यात याचा अभ्यास करण्यात आला. त्यात ही थेरपी फारशी परिणामकारक आहे असं आढळून आलं नाही. कोविडमुळे होणारे मृत्युदर कमी करण्यासाठी तसेच गंभीर रुग्ण लवकर बरा होतो असं नाही.

देशात कोरोना थेरपीचा अवैज्ञानिक तसेच तर्कावर आधारित नसलेल्या पद्धतीने वापर सुरू असल्याचं आढळून आलं होतं. जर एखादा अलक्षणीय कोरोनाबधित असेल त्याच्यात असणाऱ्या अँटीबॉडीज् या तितक्याशा शक्तिशाली नसतात, जर या दुसऱ्या बाधिताला दिल्या तर त्या अपेक्षित परिणाम दाखवू शकत नाहीत. तर यामुळे विषाणूचे नवनवीन स्ट्रेन निर्माण होऊ शकतात, ते आपल्या प्रतिकारक शक्तीला दाद देऊ शकणार नाहीत, ते अधिक घातक असतील. 

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती खूपच बिकट होत आहे. नवनवीन स्ट्रेन सापडले त्यांना निष्प्रभ करण्यासाठी योग्य ती उपचारपद्धती तयार होण्यास वेळ लागत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आरोग्य व्यवस्था घाईला आली. म्हणून आता कोणताही धोका न पत्करायचा नाही म्हणून सरकारने टास्कफोर्सच्या मार्गदर्शक सूचना बदलल्या आणि ही उपचारपद्धती बंद करण्याचा झटपट निर्णय घेतला.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole