नव्याने आलेल्या Bird flu च्या स्ट्रेनचा माणसांसाठी धोका किती आहे?

सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून आपण थोडे सावरत आहोत. कोरोनाच्या उपचार पद्धती औषधे यांबद्दल नवनवीन संशोधन सुरूच आहे. पण कोरोनाचं मूल शोधण्याचाही प्रयत्न आहे. चीनमधल्या (China) वुहानच्या विषाणू प्रयोगशाळेकडेच सगळेजण प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रित्या बोट दाखवत आहेत. कारण चीनने या प्रकरणातली माहिती नीटशी उघड केलेली नाही, म्हणून संशय बळावतो आहे. अशातच चीन मध्ये अजून एका विषाणूचा शिरकाव झाला आहे. (Bird flu) बर्ड फ्ल्यू चा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. या Bird flu च्या विषाणूबद्दल माहिती घेऊयात,

एप्रिलच्या शेवटी चीनच्या जियांगसु प्रांतातील शिनजियांग शहरात ४१ वर्षीय एकजण आजारी होता म्हणून दवाखान्यात गेला, त्याला कोरोनासारखीच लक्षणे म्हणजे ताप, सर्दी झालेली आढळली. पण जवळपास महिन्याभराने त्याला झालेल्या आजाराचे निदान झाले. त्याला बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती. त्याच्यामध्ये जो विषाणूचा स्ट्रेन आढळला तो नवीन नव्हता, त्याला H10N3 म्हणतात. पण या स्ट्रेनची याआधी माणसाला कधीच लागण झाली नव्हती. हे पहिलंच उदाहरण आहे.

हे H व N म्हणजे काय? कोणते आहेत अन्य स्ट्रेन?

फ्ल्यू म्हणजे एन्फ्ल्युएंझा, या पक्ष्यांपासून होणार्‍या फ्ल्यूला शास्त्रीय भाषेत एव्हियन एन्फ्ल्युएंझा असं म्हणतात. हा संसर्गजन्य रोग आहे. पक्ष्यांच्यामार्फत प्राण्यांना, आणि प्राण्यांमार्फत प्राण्यांना याची लागण होऊ शकते. जंगलातून या विषाणूंचा जास्त फैलाव होतो. वन्य पाणथळ भागात आढळणारे पक्षी हे याचा मुख्य स्त्रोत असतात. साधारणपणे या विषाणूचे तीन प्रकार पाडले आहेत, A B व C. यांतले B आणि C हे इतके धोकादायक नसतात, पण त्यामानाने टाइप A हा जास्त धोकादायक असतो. या A प्रकारचे अजून १३१ उपप्रकार आहेत. यांतले दोन सोडले तर अन्य सर्व उपप्रकारांपासून पक्षी संक्रमित होतात. या A टाइप ची जगभरात फैलाव होण्याची क्षमता आहे.

१९१८ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जगभरात स्पॅनिश फ्ल्यू (Spanish flu) म्हणजे H1N1 ची  साथ पसरली होती. तर १९५२-५३ मध्ये एशियन फ्ल्यू (H2N2) ने हाहाकार उडवला होता. तर १९६८ मध्ये H3N2 म्हणजेच हाँगकॉंग फ्ल्यू तर २००५ मध्ये H5N1 म्हणजे एव्हियन एन्फ्ल्युएंझा ची साथ तर २००९ मध्ये आधीच्या H1N1 चा थोडा सुधारित अवतार असलेल्या स्वाईन फ्ल्यूने कहर केला होता. यातला H5N1 हा स्ट्रेन सगळ्यात घातक आहे. तर यांतले H व N म्हणजे नक्की काय? या वर सांगितलेल्या A टाइप मध्ये दोन प्रकारचे प्रथिने (Proteins) असतात. त्यातील एक आहे H म्हणजेच Hemagglutinin व दुसरे N म्हणजे Neuraminidase. तर हे दोन प्रथिने एकत्र येऊन त्याचे वेगवेगळे संयोजन किंवा जोडण्या (Combinations) तयार होतात.

या H मध्ये 1, 2, 3 आणि N मध्ये असणारे 1 व 2 हे साधारणपणे मानवाला संक्रमित करतात. हे इतक्या प्रकारचे स्ट्रेन्स तयार होतात? तर या A टाइपचा विषाणू ज्याच्यामध्ये सतत उत्परिवर्तन (mutation) होत असतं. विषाणूमध्ये RNA असतो. जेंव्हा याचे प्रकार तयार होत असतात, ही मुळात या RNA ची वेगवेगळी संयोजने होतात, आणि उत्परिवर्तन होऊन हे इतके प्रारूपे (Strains) तयार होतात. जिथे पक्ष्यांची संख्या जास्त तिथे याचा धोका जास्त असतो. म्हणून कुक्कुटपालन तसेच अन्य पक्ष्यांशी संबंधित उद्योगामध्ये असणार्‍या लोकांना श्वसनावाटे याची लागण होण्याची शक्यता आधिक असते. तसेच अर्धं कच्चं मांस खाणार्‍या लोकांनाही याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

तर हे प्रथमच आढळलेले उदाहरण पाहून चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने हा Bird flu H10N3 स्ट्रेन कमी रोगजनक आहे, तसेच हा गंभीर स्वरूपाचा आजार नाही, तसेच याचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होण्याची शक्यता नाही. असं सांगितलं आहे. खरंतर या A टाइप च्या विषाणू बद्दलची जी वैशिष्ट्ये पाहिली, त्यावरून याचे बरेच स्ट्रेन आहेत असं शास्त्रज्ञांचं मत आहे व त्या सर्वांची पुरेशी माहिती अजून नाही, असं सांगितलं जात आहे. पण गेल्या वर्षातली कोरोनाच्या बाबतीतली चीनची वागणूक बघता आताही चीनी आरोग्य आयोगाच्या मतांवर विश्वास ठेवणं योग्य होणार नाही. या स्ट्रेनचा ही मुख्य स्त्रोत कोणता, ज्यामुळे तो चीनी नागरिक संक्रमित झाला याची माहिती अजूनही या आरोग्य आयोगाला नाही. कोरोना विषाणू प्रमाणे याचा व्यवस्थित अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. नाहीतर चीनच्या निष्काळजी वागणुकीमुळे या जगाला हैराण करण्यासाठी हे नवं संकट येईल, त्याआधी ही खबरदारी घेणं आवश्यक आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole