हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजन मध्ये नेमका फरक काय?

रुग्णांना दिला जाणारा मेडिकल ऑक्सिजन सध्या लोकांना घाम फोडत आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून याचा आढावा घेणे गरजेचे –

आपण पुन्हा मागच्या वर्षाची पुनरावृत्ती होताना पाहत आहोत, आपल्याला पुन्हा एकदा टाळेबंदीला सामोरं जावं लागलं आहे, कोरोना चा कहर मागच्या पेक्षा अधिक झाला आहे, रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. मृत्यूचं थैमान पुन्हा सुरू झालं आहे, एकाच वेळेला इतक्या चिता जळताना पाहून काळजात चर्र होत आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आहे. आपल्याला माहीत आहे की कोरोना हा आपल्या श्वसन संस्थेला बाधित करतो. त्यामुळे आपल्याला श्वासोश्वास घेण्यास अडचण येते तेंव्हा आपल्याला कृत्रिम श्वासोश्वासासाठी व्हेंटिलेटर लावला जातो. म्हणजे काय तर व्यक्ती जेंव्हा नैसर्गिक ऑक्सिजन घेण्यास असमर्थ ठरतो तेंव्हा त्याला हा साठवलेला ऑक्सिजन दिला जातो. त्याच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. रुग्ण ऑक्सिजन विना मरत आहेत, सौदी अरेबियाने भारताला ८० मेट्रिक टन (१ मेट्रिक टन = १००० किग्रॅ.) इतका ऑक्सिजन पाठवून दिला आहे. आपल्याकडे असा ऑक्सिजन नाही का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पाहुयात…

हा कसला खास ऑक्सिजन आहे?

वर सांगितल्याप्रमाणे जेंव्हा रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वास दिला जातो तेंव्हा जो वायू असतो तो ऑक्सिजनच असतो. आपल्याला माहीत आहे की आपण नैसर्गिक ऑक्सिजन घेतो, त्याचं हवेतील प्रमाण हे २१% इतकं आहे, ७८% नायट्रोजन आहे, तर उरलेल्या १% मध्ये हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मोनॉक्साईड व झेनॉन, हेलियम, अरगॉन सारखे निष्क्रिय वायू असतात. आता हवेतही ऑक्सिजन आहे तर मग तुटवडा कसा जाणवतो? हा ऑक्सिजन रुग्णाला देता येत नाही का? तर नाही रुग्णाला देण्यात येणारा आणि नैसर्गिक ऑक्सिजन यांत फरक आहे. त्याला मेडिकल ऑक्सिजन म्हणतात.

काय असतो हा मेडिकल ऑक्सिजन?

हा हवेतील ऑक्सिजन पेक्षाही शुद्ध असतो. यामध्ये वाफ, धूळ व अन्य वायू अशा अशुद्धी नसतात. यामुळेच याला २०१५ मध्ये याला अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे, याला कायद्याने मान्यता मिळाली आहे, जागतिक आरोग्य संघटनेनंही ही मान्यता दिली. वातावरणातल्या २१% पेक्षाही याच्या शुद्धतेचं प्रमाण जास्त म्हणजे ९८% इतकं असतं, म्हणून हवेतला ऑक्सिजन रुग्णाला देता येत नाही. अजून प्रकार म्हणजे इंडस्ट्रियल ऑक्सिजन. तो पेपर बनवणारे, वाहन बनवणारे, धातू उत्पादन कारखान्यांमध्ये वापरला जातो. त्यामुळे तो इतका शुद्ध नसतो.

मेडिकल ऑक्सिजन कसा बनवला जातो?

सर्व वायूंना संकलित म्हणजेच कॉम्प्रेस करून हवेला फिल्टर मधून काढून त्यातली अशुद्धी बाजूला काढली जाते. मग थंड केलं जातं. यातले निष्क्रिय वायू लवकर बाजूला केले जातात, कारण त्यांचा उत्कलनांक म्हणजे boiling point कमी असतो, त्यामुळे लगेच द्रव रुपात येतात आणि अलग होतात. यासाठी हवा विलगीकरण तंत्र वापरलं जातं. यानंतर -१८३° पर्यंत तापमान खाली आणलं जातं आणि उर्ध्वपातन म्हणजे Distillation पद्धत वापरतात. मग द्रवरूपातला ऑक्सिजन मिळतो. हा ९९.५% शुद्ध असतो.

हा ऑक्सिजन दवाखान्यापर्यंत कसा येतो?

या द्रवरुपात असणाऱ्या ऑक्सिजनला मोठ्या टँकर मध्ये साठवलं जातं. आणि मग त्याला क्रॅयोजेनिक टँकर मध्ये भरून वितरकांकडे पाठवलं जात. वितरक हा द्रवरूप ऑक्सिजन जो उच्च दाबाखाली आहे, त्याच्यावरचा दाब कमी करतात व याचं वायूत रूपांतर केलं जातं, आणि तो वायुरूप ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरला जातो व पुरवठादारांकडे किंवा थेट दवाखान्यात पाठवला जातो.

आता याचा तुटवडा का जाणवतो आहे?

भारतामध्ये मेडिकल ऑक्सिजनचा खप हा १००० – १२०० मेट्रिक टन होता, कोरोनाकाळातला हा आकडा होता, पण १५ एप्रिल नंतर याची खूपच गरज भासू लागली आहे ती जवळपास ४३०० मेट्रिक टन इतकी आहे. १८सप्टेंबर २०२० ला ही मागणी ३१०० मेट्रिक टन इतकी होती. मागणी वाढल्यामुळे तेवढ्या प्रमाणात पुरवठा करण्यात भरपूर अडचणी येत आहेत. देशामध्ये प्लँट मधून द्रव ऑक्सिजन वितरकांकडे पोहोचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्रॅयोजेनिक टँकर्स ची संख्या १२०० – १५०० इतकी आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आधीपर्यंत हे इतके पुरेसे होते. पण आता दिवसाला २,००,००० च्या वर रुग्ण सापडत आहेत म्हणून मोठी समस्या निर्माण झाली आहे. साधारणपणे दवाखाने तीन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करून ठेवतात पण सध्या तो एक दिवस किंवा १२ तास पुरेल इतका कमी झाला आहे. द्रवरूप ऑक्सिजन बनवणाऱ्या बऱ्याच कंपन्या आपल्या देशात आहेत, पण द्रवरूप ऑक्सिजनला वायुरूपात आणण्यासाठी लागणारे रिकामे सिलेंडर्सची संख्याही आता कमी पडत आहे. आपण एप्रिल ते जून २०२० मध्ये जवळपास ९२०० मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन निर्यात केला होता कारण बांग्लादेश, नेपाळ,मलेशिया इथंही कोरोनामुळे ऑक्सिजनची गरज होती. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ५०००० मेट्रिक टन ऑक्सिजनची आयात करण्यासाठी निविदा काढला आहे, सर्व भारतीय राजदूतांना सांगण्यात आलं आहे की कुठून हा ऑक्सिजन आयात करता येईल याची चाचपणी करायला सांगण्यात आली आहे.

या प्राणवायूची रुग्णांना, त्याच बरोबरीने आरोग्यव्यवस्थेला, देशाला नितांत गरज आहे. तो लवकरात लवकर मिळो आणि पुन्हा सर्व नीट रुळावर येवो हीच सदिच्छा व्यक्त करायला हवी.


SOLVE Daily MPSC Quiz

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole