कॉर्पोरेट क्षेत्रात पुढे जाण्यासाठी संवाद कौशल्य आहे महत्वाचे

बोलणाऱ्याची माती विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही अशी म्हण तुम्ही आजीआजोबांकडून कदाचित ऐकली असेल. सध्याच्या जमान्यातल्या मार्केटिंगचाही हाच फंडा असतो. तुम्हाला मार्केटिंग जरी करायचं नसलं तरीही संवाद कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्कील्स ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जी सर्वांनाच आपलीशी करणं गरजेचं आहे. त्यातही जर कॉर्पोरेट क्षेत्रात असाल तर उत्तम संवाद कौशल्य असणे ही केवळ कौशल्य नाही तर गरजही आहे. अनेकदा आपण पाहतो की योग्य, प्रामाणिक, जीवतोड मेहनत करूनही काही व्यक्ती मागे राहतात त्याचे कारणही हेच असते की त्यांच्याकडे योग्य संवाद कौशल्य नाही किंवा त्यांच्या कामाला त्याची जोड ते देऊ शकत नाहीत. त्यामुळे काही जण लायक असूनही त्यांना प्रमोशन सारख्या गोष्टींपासून लांब रहावे लागते. त्यामुळेच कम्युनिकेश स्कील्स किंवा संवाद कौशल्य अंगी बाणवण्यासाठी काय करायला हवे त्या संबंधीच्या काही टिप्स पाहूया. 

रोजचा सराव- 

आता तुम्ही म्हणाल, बोलण्याचा काय सराव करायचा? ते तर आपण रोजच बोलतो. मात्र आपण जेव्हा रोज बोलतो, त्यातल्या किती गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो? तर नाही कारण ते रोजचे बोलणे असते. इथे संवाद कौशल्य आत्मसात करताना काही योग्य शब्दांची निवड करणे अपेक्षित आहे. आपण कॉर्पोरेट जगतात वावरताना तिथे काही विशिष्ट शब्द वापरले जात असतील तर त्याकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित असते. त्यातील जर काही नवीन शब्द असतील तर ते लक्षात ठेवण्यापासून आपल्या संवादात त्याचा योग्य वापर करणे या सर्व गोष्टींना सरावाची जोड द्यावी लागेल. त्याचबरोबर दररोज किमान दोन शब्द तरी नवीन शिकले पाहिजेत. त्याचा फायदा हाच तुमचा शब्दसंग्रह वाढेल आणि संवादात त्यांचा योग्य वापरही तुम्ही करू शकता.

मुद्याचे बोला- 

कॉर्पोरेट क्षेत्रात वावरताना एक लक्षात घ्या की आपण बोलताना घाबरून चालणार नाही. आपला मुद्दा योग्य पद्धतीने थेट सांगता आला पाहिजे. तुम्ही मित्राशी बोला किंवा बॉसशी, मुद्द्याचे बोला. फार लांबड लावून फाफट पसारा न लावता आपला मुद्दा मांडता आला पाहिजे. न घाबरता, इकडचे तिकडचे न बोलता, मुद्याचे बोलत येणे महत्त्वाचे अन्यथा मूळ मुद्दा हरवून जातो. मुख्य म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्याला नेमके काय सांगायचे आहे याचा उलगडा न होता त्याला गोंधळल्यासारखे वाटते. म्हणून आपण न गोंधळता मुद्दा मांडायला शिकले पाहिजे. 

योग्य जागी योग्य शब्द- 

वर म्हटल्याप्रमाणे नवीन शब्द शिकल्याचा फायदा होईल की योग्य शब्दांचा योग्य ठिकाणी वापर करता यायला हवा. आपण कोणाशी बोलतो आहोत याचे भान ठेवून नियंत्रित आवाजात योग्य शब्द वापरून बोलायला हवे. एखाद्या चुकीच्या शब्दाच्या वापराने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो तसेच गैरसमजही होतात. बोलताना सर्व सांगायची घाई करू नका त्यामुळे कदाचित अयोग्य शब्द वापरले जाऊ शकतात, त्याचा अर्थही वेगळाच ध्वनित होऊ शकतो. योग्य आवाजाची पट्टी, योग्य शब्द आणि स्पष्टपणे बोलण्याने समोरच्या व्यक्तीला आपला मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येतो. 

दुसऱ्या व्यक्तीचे ऐकून घ्या- 

संवाद कौशल्यामध्ये ही बाब फार महत्त्वाची आहे. दुसऱ्याला काय सांगायचे आहे ते ऐकून घ्यायला शिकले पाहिजे. समोरच्या व्यक्तीचे शांतपणे ऐकले तर त्यांचे शब्दही तुम्हाला समजतील. त्या शब्दांचा वापर तुमच्या लक्षात येईल. आपल्या संभाषणामध्ये त्याचा वापर करताना आपण चुकणार नाही. त्यामुळे आपलाही संवाद योग्य पद्धतीने होईल. त्यामुळे समोरच्या व्यक्ती बोलताना त्याचे निरीक्षण करा आणि त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole