5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का?

गेल्या अनेक दिवसांपासून लोक 5G बाबत मेसेज सोशल मीडियावरून शेअर करत आहेत पण खरंच त्यात तथ्य आहे का? 5G तंत्रज्ञांचे फायदे तोटे मांडणारा हा लेख.

आपण २१ व्या शतकात आहोत म्हणून आपला आयुष्याचा विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे सध्या अविभाज्य भाग आहे. आपलं आयुष्य इलेक्ट्रोनिक यंत्रांनी भरून गेलंय. लहान मुलांची खेळणी ही इलेक्ट्रॉनिक असतात आणि अगदी सान-थोर ज्याच्याशिवाय राहू शकत नाहीत तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका मोबाईल. आपण त्या बाबतीत फारच पझेसिव्ह असतो. आजकाल लहान मुलाला चालायला येत नसतं पण हातात मोबाईल पाहिजे. म्हणून त्याचं महत्व अति आहे. यांतही सातत्याने बदल होत आहेत. बटण असलेला फोन, क्वेर्टी कळफलक (keyboard) असलेला, नंतर touch screen त्यानंतर आलेलं 3G व नन्तर आलेली डिजिटल क्रांती म्हणवलं गेलेलं 4G असं सगळं सुधारित तंत्रज्ञान म्हणजेच upgradation होत आलं आहे. आता आपण आहोत ते 5G च्या उंबरठ्यावर…मध्यंतरी 5G नेटवर्क चाचण्या करण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने परवानगी दिल्याची बातमी आली होती. पण जगामध्ये नवीन काही गोष्ट आली की त्यासोबत वाद, संभ्रम अशा गोष्टीही येतात. 5G बाबतीत नक्की काय झालं आपण जाणून घेऊयात,

काय आहे 5G तंत्रज्ञान

२०१२-१३ मध्ये आपल्या देशात ३जी आलं होतं. फास्ट इंटरनेट स्पीड, रिचार्ज- एसएमएस पॅक्स नंतर नवीन इंटरनेट पॅक्स, आपल्याला नवीन होतं. २०१६ मध्ये जिओ ने टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात क्रांतीच केली, नवीन 4G तंत्रज्ञान आलं होतं, त्यावेळी तर मोफत इंटरनेट म्हणून लोकांनी प्रचंड प्रमाणात जिओच्या नव्या व्यापारी कल्पनेला चांगलाच प्रतिसाद दिला आणि जिओ सिम खरेदी केले. आता आपण इंटरनेटचा किती मेगा बाईट्स प्रति सेकंद वेग आहे यावरच ठरवतो. दृक्श्राव्य स्वरूपात किंवा संदेशाच्या आधारे मिळणाऱ्या माहितीचा वेग वाढलेला आहे. आता 5जी म्हणजे fifth generation म्हणजे सध्या इंटरनेटचा आहे त्याहून जास्त वेग असेल ज्याद्वारे विदा म्हणजे data अजून वेगाने लोड किंवा पाठवला जाऊ शकतो. जास्तीत जास्त लोक एकच नेटवर्क वापरू शकतात, हायस्पीड 4जी असूनही आता ज्या अडचणी इंटरनेट वापरताना येत आहेत त्या येणार नाहीत. आपलं आयुष्य यामुळे अजून वेगवान होऊ शकेल. पण यासोबतच काही नुकसान होणार असल्याचं बोललं जात आहे. जसे एखाद्या गोष्टीचे आपल्याला फायदे असतात तसेच तोटेही असतात. काय होऊ शकतं 5G मुळे?

5G बद्दल चा प्रचार

२०२१ च्या सुरुवातीला भारतामध्ये बर्ड फ्ल्यूची साथ आली होती, मोठ्या संख्येने कावळे मृत्युमुखी पडत होते. त्याचबरोबर परदेशी पाहुणे असलेले स्थलांतरित पक्षीही मरत होते. त्याच दरम्यान 5G बद्दल चर्चा सुरू होती, चीनच्या हुवेई कंपनीला 5G नेटवर्कची कंत्राटे देण्यात येऊ नयेत, चीन त्याचा गैरवापर करू शकतो, म्हणून जगातून या विरोधी वातावरण तयार झालं आहे. भारतामध्ये 5G नेटवर्कच्या चाचण्या करण्यासंबंधी भारत सरकारने परवानगी दिली होती, आता यांवर आधारित वृत्तवाहिन्यांवरून किंवा समाज माध्यमांवरून बातम्या यायला सुरुवात झाली की 5G च्या चाचण्या सुरू झाल्या आहेत म्हणून त्यामुळे पक्ष्यांचा जीव जातो आहे, पण ही माहिती बाहेर येऊ दिली जात नाही आहे. याला बर्डफ्ल्यूचं नाव देऊन दडपलं जात आहे. अशा आशयाचे ट्विट राजकारणी लोकांकडून येत होते. बरं जेंव्हा २०१८ मध्ये 5G जेंव्हा लाँच झालं होतं तेंव्हा आपल्याकडे बहू प्रतिक्षित असलेला द ग्रेट रजनीकांतचा (Rajinikanth) 2.0 हा Robot चा सिक्वेलही प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटही विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित होता, यांत 5G मुळे पक्षांचा मृत्यू हाच विषय हाताळला गेला आहे. यामुळे चित्रपट गाजला आणि या विषयाला अधिकच हवा मिळाली. यावर कडी केली ती समाज माध्यमांवर वायरल झालेल्या एका फोटोने; या फोटोत मृत पक्षांचा खच पडला आहे व 5G नेटवर्कमुळे हे घडलं असल्याचं सांगण्यात आलं.

यानंतर मध्यंतरी एक विडिओ वायरल झाला ज्या मध्ये एक टॉवर जळताना दिसत होता. तर परदेशातील लोकांना या 5जी चे दुष्परिणाम लक्षात येत आहेत त्यामुळे त्यांनी हे टॉवर्स उध्वस्त करायला सुरुवात केली आहे, असं सांगण्यात आलं होतं. चीनमध्ये नोव्हेंबर २०१९ मध्ये लोकांचा मृत्यू होत होता, 5 जी च्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागत असल्याचं ट्विट पाश्चात्य सेलेब्रिटींनी केलं होतं. तेंव्हा हा सगळा कोरोनाचा प्रताप आहे हे जगाला अजून माहीत नव्हतं.जगभर कोरोनाचं थैमान सुरू झालं, त्यानंतर लोकांनी अजूनच नवी बातमी सर्वत्र पसरवायला सुरुवात केली की 5G नेटवर्क मुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. यामुळेच हवा दूषित व विषारी होत आहे. हवेतील ऑक्सिजन कमी होत आहे, आणि परिणामी लोकांना श्वसनासाठी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही आहे.


नुकतीच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जुही चावला हिने पण न्यायालयात या 5G च्या चाचण्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. तिने म्हंटलं आहे, 5G तंत्रज्ञान खूप प्रगत आहे, त्याचा वेग सध्याच्या 4G पेक्षा 100 पटीने अधिक आहे. पण जसा हा वेग वाढेल तशीच याच्याद्वारे तयार होणारी प्रारणे म्हणजे radiations १०० पटीने अधिक होतील. आपण २४ x ७ त्या प्रारणांमध्येच असू. यामुळे वनस्पती व प्राणी सृष्टी तसेच सर्व पर्यावरणाला गंभीर धोका उद्भवू शकतो. हे 5G नेटवर्क घातक आहे. या याचिकेवर ३१ मे २०२१ ला पहिली सुनावणी झाली व जुहीला २०,००,०००₹ दंड ठोठावला आहे.

खरं काय आहे?

हे जे 5 G चे वाईट परिणाम सांगणारे दावे करण्यात आले आहेत. पण तथ्य काही वेगळंच आहे. पक्ष्यांच्या मृत्यूच्या दाव्याबाबत जे सांगितलं जात आहे. 5G च्या प्रारणांमुळे पक्षी मरत आहेत. पण यापूर्वीही 3 G तंत्रज्ञान आलं , नंतर 4G आलं होतं तेंव्हा कधीच पक्षी मृत्युमुखी पडल्याच्या कुठल्याच घटना समोर आल्या नाहीत. कारण जे नेटवर्क आधी 3G व सध्या 4G साठी वापरात आहे तेच नंतर 5G साठी पण वापरलं जाणार आहे. मग आताच वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जागृत झाला कळत नाही? या मोबाईलच्या टॉवर्समधून जे विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडतात, खरंतर त्याचा आणि पक्षांच्या मृत्यूचा काहीच संबंध नाही. या मुद्द्याकडे लक्ष एकवटल्यामुळे पक्ष्यांना जगण्यासाठी ज्या गोष्टींमुळे अडचणी येत आहेत त्यांच्याकडे लक्ष जातच नाही. 

मोबाईल टॉवर्सचा पक्ष्यांना त्रास होतो हे खरं आहे. पण तो कशा प्रकारे होतो? खरंतर पक्षी जेंव्हा खूप अंतरावरचा प्रवास करतात, तेंव्हा योग्य दिशा मिळण्यासाठी त्यांना पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राची मदत होते. या टॉवर वर एक लाईट लावला जातो, त्याच्या प्रकाशामुळे ते अपेक्षित दिशेपासून भरकटतात. आसपास असलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने पक्ष्यांचा मृत्यू होतो.
१० मेगाहर्ट्झ वरील हे विद्युत चुंबकीय तरंग पक्ष्यांना हानिकारक नाहीत, असं आढळून आलं आहे.


आता 5G नेटवर्कमुळे कोरोनाचा प्रचार होतो या दाव्या बाबतीत सांगायचं झालं तर कोणताही विषाणू त्याची वाढ त्याचा फैलाव हा काही या रेडिओ लहरींमुळे होत नाही. विषाणू जीवशास्त्राचा तर या लहरी हा भौतिकशास्त्राचा भाग आहे यांचा परस्परांशी काहीच संबंध नाही.
गेले दीड वर्ष आता कोरोना, त्याच्या लाटा, त्यामुळे होणारे उद्रेक, लसी हे सगळ्या आता सवयीच्या गोष्टी झाल्या आहेत, हा कोरोना कशामुळे होतो? होऊ नये म्हणून काय करायचं? कशी काळजी घ्यायची? हे आता लहान लहान मुलं नीट सांगतात आणि तसं वागतात पण मोठ्या माणसांची वागणी पाहिल्यावर त्यांना जे लहान मुलांना कळतं ते यांना कळत नाही असा प्रश्न पडतो.
 

हे वर केलेले दावे लोकांच्या काळजीपोटी केलेले नसतात. चुकीची माहिती पसरवणं, अफवा पसरवणं ही वाईट खोड आहे. बरं कोणत्याही गोष्टीकड़े संशयी नजरेने बघणं हे ही योग्य नाही. आपल्याकडची समाजमाध्यमे ही अफवा, खोटी माहिती पसरवण्यासाठीच जास्त वापरली जातात. सत्यासत्यता न पाहताच जे आलं ते फॉरवर्ड केलं जातं म्हणूनच ही व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी म्हणून प्रसिद्ध झाली आहे. आलेल्या कुठल्याच मेसेजवर लगेचच विश्वास ठेवू नये, त्याचा खरे-खोटेपणा आपण इंटरनेटवरच पाहू शकतो. म्हणून वाचल्यानंतर अशा संशयास्पद दाव्यांची,गोष्टींची पडताळणी करायला हवी. चुकीच्या माहितीमुळे संशय बळावतो व शांतता नाहीशी होते, अस्थिरता येते. कारण सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या साथीशी आपण लढतोच आहोत, कोरोनाच्या विषाणूला हरवू शकतो, पण या अफवांचा जो विषाणू आहे त्याला हरवणं कठीण आहे, कारण याच्या विरोधातली कुठलीच लस अजूनही बाजारात आली नाही आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole