सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्मार्ट पद्धतीनं तयारी करणं आवश्यक; ‘या’ टिप्स नक्की येतील कामी

शिक्षण पूर्ण झाले की प्रत्येकाला हवी असते ती नोकरी. त्यातही सरकारी नोकरी मिळावी अशी बहुतांश पदवीधरांची अपेक्षा असते. नोकरी म्हणजे सरकारी नोकरी असा एक समज काही काळापुर्वीपर्यंत कायम होता. आताही सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी झाली असली तरीही प्रत्येकाला सरकारी नोकरीची आस असते. सरकारी नोकरी म्हणजे आयुष्याची चिंता मिटली असा समज असला तरीही त्या नोकरीतही अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. ही आव्हाने नोकरी मिळवण्यापासूनच सुरूवात होते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धीर, मेहनत आणि बुद्धिमत्तेची गरज असते. काही जागांसाठी शेकडो उमेदवार जर अर्ज करणार असतील तर साहाजिकच आहे की स्पर्धेला सामोरे जावे लागणारच. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी परीक्षा द्यावी लागते, त्यानंतर मुलाखत होते किंवा पदनियुक्ती होते. 

सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेची पूर्वतयारी योग्य पद्धतीने झाले नाही तर ती परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. त्यामुळे सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी काही गोष्टी जरूर जाणून घ्या. 

अभ्यासात सर्व विषयांना न्याय द्या- 

परीक्षेची तयारी करताना सर्व विषयांना योग्य न्याय देण्यासाठी प्रत्येक विषयाला योग्य वेळ द्या. परीक्षेच्या दृष्टीने वेगवेगळे विषय वाचताना नोटस् काढा. परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण माहिती करून घ्या आणि नियमितपणे अभ्यासाची उजळणी करा. प्रत्येक विषयाचे वाचन आणि नोटस काढून उजळणी केल्यास परीक्षा अवघड जाणार नाही. 

लिखाणाची सवय- 

शाळा, महाविद्यालयात आपल्याला नियमित परीक्षा, सबमिशन यामुळे लिखाणाची सवय असतेच. एकदा ती सवय सुटली की आपण थोडे आळशी होतो. पण सरकारी नोकरीच्या पात्रता परीक्षेत लिखाणाचा वेग हा फार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे जेव्हा सरकारी परीक्षा देण्याचे ठरवाल तेव्हा नियमित अभ्यासाबरोबर लिखाणाचा सरावही केला पाहिजे. परीक्षा तीन तासाची असते पण लिखाणाचा सराव नसल्याने वेळ कमी पडतो. किंवा सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिता येत नाहीत. वाचन आणि पाठांतर करून परीक्षा पास होऊ, उजळणी केली म्हणजे आलंच सगळं अशा भ्रमात न राहता प्रत्येक प्रश्नप्रकाराची उत्तरे लिहून काढा. त्यामुळे सर्व अभ्यास हाताखालून जाईलच शिवाय लिखाणाचा सराव होईल. 

योग्य दिनचर्या- 

कोणतीही परीक्षा देताना शिस्त आणि नियम याला महत्त्व असतेच. त्यामुळे अभ्यासासाठी एक नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. अर्थात ती सवय नोकरीच्या दृष्टीनेही योग्य आहे. सकाळी लवकर उठून अभ्य़ास केल्याचा फायदा होतोच. त्यासाठी सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे ही दिनचर्या पाळावी. त्यात पुरेशी झोप आणि योग्य आहार याकडे लक्ष द्यावे. 

एनर्जी टाईम- 

काही विद्यार्थ्यांना सकाळी लवकर तर काहींना रात्री उशिरा अभ्यास करायची सवय असते. कठीण जाणारे विषय आपल्याकडे पूर्ण उत्साह असताना करावेत. त्यामुळे तुमचा अभ्यास उत्तम होतो आणि लक्षात राहतो. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.