उप जिल्हाधिकारी पूजा गायकवाड यांनी दिल्या आहेत खास टिप्स….

स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी आपल्या पाहण्यात असतात. काही जण पदवीधर झाल्यानंतर पुढे शिकता शिकता नोकरीचा मार्ग म्हणून, तर काही जण घरच्यांच्या मतानुसार परीक्षा देणार असतात, काही जणांनी अधिकारी व्हायचे असे शालेय जीवनात ध्येय ठेवलेले असते म्हणून परीक्षेला बसतात तर काही जण निव्वळ माझा मित्र/मैत्रिण करतेय म्हणूनही या परीक्षेला बसतात. नावाप्रमाणेच स्पर्धा परीक्षा असल्याने या सर्वच जणांना स्पर्धेला तोंड द्यायचे असते. त्यामुळे या परीक्षेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. उप जिल्हाधिकारी पदी निवडल्या गेलेल्या पूजा गायकवाड त्यांच्या उपजिल्हाधिकारी होण्याच्या प्रवास उलगडला. 

स्पर्धा परीक्षा देताना स्वतःशी प्रामाणिक रहा.

पूजा गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा का द्यायची आहे? अधिकारी का व्हायचे आहे? याचा स्वतःच्या मनाशी विचार केला पाहिजे. वरीलपैकी एखादे कारण असू शकते, पण जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात स्पष्ट असले पाहिजे. थोडक्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यापुर्वी विद्यार्थ्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात करण्यापुर्वी त्यांच्या मनातले कारण स्पष्टपणे वहीत लिहावे. ती वही कोणालाही न दाखवता सातत्याने आपल्या बरोबर बाळगावी. 

स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत पाहिजे.

सर्वप्रथम राज्यसेवा परीक्षा देताना पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित माहित असला पाहिजे, त्यासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतःच हाताने दोन तीन वेळा लिहून काढा, जेणेकरून आपल्याला नेमका अभ्यास काय करायचा आहे याची कल्पना येईल. विषय, त्याचे धडे माहिती होतील.

स्पर्धा परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचावीत?

 त्यानंतरचा भाग आहे पुस्तके. पूर्व व मुख्य परीक्षेसाठी काही विषय समान आहेत, हे माहिती झाले आहे. त्यामुळे पुस्तकांची यादी करायला हवी. पुस्तक लेखक बरेच आहेत, एकाच विद्यार्थ्याची बुकलिस्ट पाहू नका तर किमान तीन जणांची बुकलिस्ट पहा. विषयानुरूप तीनही याद्यांची तुलना केल्यावर लक्षात येईलच की काही विषयांसाठी एकाच प्रकारची पुस्तके वाचतात. अगदी वीस तीस टक्के फरक असू शकतो. पण तीनही यादीत समान पुस्तके असतात, राज्यातली बहुतांश विद्यार्थी हीच पुस्तके वापरतात. अभ्यासाला सुरूवात करताना, याद्यांची तुलना केल्यानंतर एखाद्या विषयासाठी एखाद दोन पुस्तके नवीन घ्या आणि अभ्यासाला सुरूवात करा. 

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका घेऊन सोडवणे. त्यामुळे परीक्षेतील प्रश्नांचा अंदाज तुम्हाला येतो. त्याशिवाय प्रश्नपत्रिका विश्लेषण पुस्तके मिळतात जी विषयानुरूप असतात. त्याचाही उपयोग होतो. प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर प्रश्नपत्रिका विश्लेषण पुस्तकही सुरुवातीपासून संदर्भासाठी हवे. एखादा विषय वाचला की लगेच त्याची प्रश्नपत्रिका सोडवा आहे. 

एमपीएससी देताना धीर धरायला हवा.

एमपीएससीची तयारी करताना एक लक्षात ठेवा की आज परीक्षा दिली आणि उद्या निकाल मिळाला हे स्पर्धा परीक्षेत शक्य नसते. कारण निकाल लागण्यासाठी एक दीड वर्षही लागते. त्यामुळे धीराची परीक्षा म्हणजे एमपीएससी असे म्हणू शकतो. अभ्यासक्रम हा खूप विस्तारीत आहे, त्यामुळे पहिली परीक्षा पास होण्यासाठी किमान दीड वर्ष लागते. घरी राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांच्या प्रोत्साहन आणि सहकार्याची गरज असते. सलग सात आठ तास अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळाला पाहिजे, यासाठी पालकांनी जागरूक राहून प्रयत्न करायला हवे. शक्य असल्यास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला वेगळी खोली मिळाली तर फारच उत्तम पण नसेल तरीही घरात वर्दळ नसेल याची काळजी घ्या. 

स्पर्धा परीक्षेसाठी योग्य नियोजन महत्वाचे

काही विद्यार्थी पदवी पूर्ण होण्याअगोदर, काही पदवीनंतर तर काही जण नोकरी करत करत स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करतात. कोणत्याही विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेचे नियोजन केल्याशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही टप्पे आहेत त्यांचे योग्य प्रकारे नियोजन करा. तसेच हातात असलेल्या प्रत्येक महिन्याचे नियोजन करा. 

सुरुवातीला विषयांची ओळख होण्याची जे पुस्तक आहे ते वाचा. पुढील तीन महिन्यात प्रत्येक विषयाची ओळख झाली पाहिजे, जे ठरवलेले पुस्तक आहे ते वाचूनच झाले पाहिजे. त्यामुळे विषयाची माहिती होते, त्यावरील प्रश्न सोडवता येऊ शकतात. पहिला महिना बेसिक साठी, पुढच्या तीन महिन्यात प्रत्येक विषयाची पुस्तके एकदा वाचून होतील. मराठी आणि इंग्रजी व्याकरण याची तयारी सुरूवातीपासून करा. पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोन्हींच्या अभ्यासात ते दोन्ही महत्त्वाचे विषय मागे पडतात, ते टाळण्यासाठी सुरूवातीपासूनच ग्रामरचा अभ्यास करा. यामध्ये खूप गुण मिळवून देणारा पेपर आहे. अभ्यास करताना नोटस् काढा. ऑगस्ट महिन्यानंतर प्रत्येक विषय दोन ते तीन वेळा वाचून झाला पाहिजे. अर्थात अभ्यास करताना नुसते वाचन नाही करायचे तर दर दिवसाच्या शेवटी वाचलेल्या विषयावरचे प्रश्न सोडवा. 

बऱ्याचदा विद्यार्थी मुख्य परीक्षेवर लक्ष्य केंद्रीत करतात पण सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेकडे लक्ष द्यायला हवे. नवीन विद्यार्थ्यांनी ही गोष्ट जरूर फॉलो करावी. अर्धा वेळ जीएस चा अभ्यास आणि अर्धा वेळ सीसॅट सोडवावे. पूर्व परीक्षा केंद्रीत अभ्यास केला तर जानेवारी पासून टेस्ट सिरीज सोडवायला आत्मविश्वासही भरपूर असेल. 

थोडक्यात मे पासून जुलै पर्यंत सर्व विषयांची ओळख करून घ्यायची. ऑगस्टपासून पुढचे तीन महिने सर्व विषयांचा खोलवर अभ्यास करायचा. त्यानंतर नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत पूर्व परीक्षेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. सुरूवातीच्या तीन महिन्यातील पुस्तक वाचनाचा इथे तुम्हाला फायदा होतोच शिवाय ग्रामरचा अभ्यासही तयार आहे. 

त्यानंतरच्या चार महिन्यांत मुख्य परीक्षेसाठीच्या नव्या विषयांचा अभ्यास करू शकता आणि पहिल्याच प्रयत्नात पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकता. परीक्षेच्या तयारी पुस्तके, पूर्व प्रश्नपत्रिका, स्पर्धा परीक्षेसाठीचे मासिके मिळतील याचे नियोजन करायला हवे. सात ते आठ तास सलगपणे अभ्यास व्हायला पाहिजे. अभ्यास करणे, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव पहिल्या दिवसापासून चिकाटीने करा. प्रश्नपत्रिका विश्लेषण पुस्तके वाचा. 

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक रहावे.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नव्या विद्यार्थ्यांना थोडे दडपण येऊ शकते पण मनात सकारात्मक विचारांनाच थारा द्यायचा आणि ही परीक्षा व्यवस्थित देणार आणि पास होणार हाच विचार सतत करायला हवा. 

महत्वाचं म्हणजे परीक्षा जरी एक वर्षाने देणार असलो तरीही नियोजन, सातत्य आणि मनाची सकारात्मकता यांच्या मदतीने या परीक्षेत आपल्याला नक्कीच पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होता येऊ शकेल. 


हे वाचलंत का?

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole