तौकते चक्रीवादळ – Tauktae Cyclone

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेले तौकते चक्रीवादळ (Tauktae Cyclone) 16 मे 2021 रोजी अधिक तीव्र झाले. वेधशाळेने या वादळाने ‘व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचे जाहीर केले आहे.

तौकते चक्रीवादळ (Tauktae Cyclone) पश्चिम किनाऱ्याला समांतर गुजरातकडे वाहत जाणार आहे. 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो.

म्यानमार देशाने अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या तौकते नामक उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचे नामकरण केले आहे.

चक्रीवादळाविषयी

निसर्गचक्र चालताना ऋतुत बदल होत असताना वारे बदल होतात. हे वारे कधी कधी अगदी विध्वंसकही होतात, त्यांना चक्रीवादळे असे म्हणतात. वादळांचे एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.

चक्रीवादळ कसे तयार होते?

एखाद्या विशिष्ट ठिकाणी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे भारताकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.

जागा बदलते तसे या चक्रीवादळांना वेगवेगळे नाव दिले जाते.

अटलांटिक महासागर, मध्य व ईशान्य प्रशांत महासागर, कॅरेबियन समुद्र व मेक्सिकोच्या उपसागरात वादळ निर्माण झाले की त्यांना हरिकेन म्हणतात.

प्रशांत महासागराच्या वायव्येला निर्माण झालेल्या वादळाला टायफून म्हणतात.

हिंद महासागरात म्हणजे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातल्या वादळांना उष्णकटिबंधीय वादळे म्हटले जाते.

प्रचंड पाणी, बर्फ साठलेला ढग स्वत:भोवतीच गोलगोल फिरत खाली आला की त्याला टोरनॅडो म्हटले जाते.

वादळांचा वेग व त्यामुळे त्यांनी हानी करण्याची क्षमता यावरून त्यांना एक ते पाच या प्रकारात गणले जाते.

ताशी 63 किमी वेगाचे वादळ – श्रेणी एक
ताशी 120 किमी वेगाचे वादळ – श्रेणी दोन
ताशी 119 ते 153 किमी वेगाचे वादळ – श्रेणी तीन
ताशी 249 किमी वेगाचे वादळ – श्रेणी पाच

नावे देण्याची प्रक्रिया

विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात.

भारतीय उपखंडातल्या वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलँड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत.

याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातल्या वादळांची नावे ठरवली जातात. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची नावे जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) / आशिया आणि प्रशांत यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक आयोग (ESCAP) याचे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे समिती (पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स -PTC) निश्चित करते.

या मंडळामध्ये कतार, सौदी अरब, ओमान, श्रीलंका, थायलँड, इराण, भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन असे 13 देश आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole