प्रतिकूल परिस्थितीत ही मिळवलं यश…

इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर माणूस यश मिळवतोच. आपल्या आईच्या स्वप्नपुर्तीसाठी रात्रंदिवस मेहनत करून पीएसआय झालेल्या नरेश गिरघुसे यांच्या प्रवासातून हे अधिक ठळकपणे जाणवते. नरेश गिरघुसे, नागपुरला लागून असलेल्या हिंगणा तालुक्यात राहणारे. आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करताना त्यांनी पीएसआय पदाला गवसणी घातली. 

पीएसआय नरेश गिरघुसे यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. जिल्हापरिषद शाळेमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले, त्यानंतर महात्मा गांधी हायस्कूल वानाडोंगरी या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर हिंगण्यातील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण झाले. याच काळात त्यांच्या इतिहासाचे प्राध्यापक सुरेश गुडघे यांनी नरेशला एमपीएससी परीक्षेबद्दल माहिती दिली. बारावीनंतर नरेश यांनी डीएड केले. आईची इच्छा मात्र मुलाला अधिकारी झालेला पाहाण्याची होती. तरीही घरची परिस्थिती पाहता अर्थार्जन हे जास्त महत्त्वाचे होते. त्यामुळे २०११ मध्ये एसआरपीएफमध्ये पोलिस शिपाई म्हणून त्यांनी नोकरी पत्करली. 

आता आर्थिक समस्या सुटली होती तरीही आईचे स्वप्न पूर्ण करण्याची उर्मी नरेश उराशी बाळगून होते. नोकरी नक्षलग्रस्त भागात होती. तरीही जिद्दीने नोकरी सांभाळून आणि वेळेचे नियोजन करून एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. वैभवनगरच्या झोपडपट्टीत राहाणाऱ्या व घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीत नोकरीला प्राधान्य असल्याने क्लास लावून एमपीएससी करण्याचा विचार तर नरेश करत नव्हते. त्याचवेळी त्यांचा एक डीएडचा मित्र गोविंद डर्फे पुण्यात क्लास करून एमपीएससी करत होता. नरेशने त्याच्याकडून नोटस् मिळवल्या. त्याचे मार्गदर्शनही त्याला मिळाले. तसेच २०१६ या वर्षात भरत वर्मा या अजून एका मित्राची पीएसआय पदावर नियुक्ती झाली, त्यानेही नरेश ला मार्गदर्शन केले. नोकरीतले कर्तव्य बजावत नरेश ने २०११ ते २०१७ ही सलग सहा वर्ष अभ्यास केला. त्यानंतर २०१७ मध्ये पीएसआय पदासाठी जाहिरात आल्यानंतर या परीक्षेला बसण्याचा ठाम पक्का झाला. नोकरीच्या वेळा सांभाळत नरेश यांनी रात्रंदिवस अभ्यास केला. त्यानंतर पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी करून त्यातही ३०० पैकी २६२ गुण मिळवून मुख्य परीक्षाही उत्तीर्ण केली. पीएसआयच्या परीक्षेसाठी शारीरिक चाचणी देखील तितकीच महत्त्वाची असते. त्यासाठी नागपुर इथल्या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे कोच जितू घोराडकर व भाऊ काणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली. शारीरिक चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात हिंगण्यातील एचटीकेबीएसचे प्रमुख मार्गदर्शक राजेश भुते यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुल बिल्लोरे यांनी वेळ काढून वैयक्तिक प्रशिक्षण दिले. शारीरिक चाचणीच्या आधी नरेशला दुखापत झालेली असतानाही त्यांनी या चाचणीत १०० पैकी १०० गुण मिळवत ३६२ गुणांसह राज्यात चौथा क्रमांक पटकावला.

या सर्व प्रवासात नरेश यांच्या कुटुंबियांची त्यांना अढळ साथ होती. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच नोकरी आणि शिक्षण असा अवघड टप्पा पार करता आला. याची नरेश यांना सतत जाणीव असते. त्यामुळे या अवघड प्रवासात साथ देणाऱ्या कुटुंबिय, शिक्षक, सहकारी, मार्गदर्शन, मदत करणारे मित्र यांचा मी कायमच ऋणी राहीन, असेही नरेश घिरगुसे म्हणतात. 

नरेश यांचा हा प्रवास स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कष्टाशिवाय रसाळ गोमटी फळे नाहीत हे खरेच पण त्या कष्टाला नियोजन व प्रयत्नांची साथ दिली तर यश नक्कीच मिळते हे सांगण्यासाठी नरेश यांचे उदाहरण पुरेसे आहे. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole