Toppers Insight क्लास न लावता, घरीच बसून केला अभ्यास अन् बनलो अधिकारी

स्पर्धा परीक्षेसाठी नियोजनपूर्वक आणि नियमित अभ्यास करावा लागतो यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून क्लास लावण्याचा पर्याय विद्यार्थी निवडतात. मात्र काही विद्यार्थी क्लास न लावताही स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत.
बारामतीच्या कृष्णा जाधव यांनी कोणताही क्लास न लावता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि यश मिळवले. कृष्णा जाधव यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. कृष्णा यांचा थोडक्यात प्रवास सांगायचा तर शालेय शिक्षणामध्ये फार हुशार म्हणून ते गणले जात नव्हते. पन्नास साठ टक्क्यांच्या प्रमाणात त्यांचे गुण असायचे.
घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे करिअर वगैरे गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. पण वडिलांना मुलाने खूप शिकून डॉक्टर, इंजिनिअर असे काहीतरी मोठे व्हावे अशी फार इच्छा होती. त्यामुळे कृष्णा यांनी बारावीला सायन्स शाखा निवडली. मात्र आपली शाखा निवड चुकली आहे हे कळण्यात वर्ष गेले आणि बारावी सायन्समध्ये ते चक्क नापास झाले.
एक वर्ष वाया गेलंच पण इतर सर्व मुलांनी अभ्यास करून यश मिळवत विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. त्यानंतर कृष्णा जाधव यांनी वाणिज्य पदवी मिळवली. नुसती पदवी नाही तर महाविद्यालयात तिसरा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घेतला. पण वडिलांनी सामान्य माणसांच्या हितासाठी प्रशासकीय अधिकारी व्हावे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवले.
वडील चांगलीच गोष्ट सांगत होते तेव्हा त्यांनी वकिलीचा अभ्यास सोडून देत राज्यसेवा परीक्षांकडे मोर्चा वळवला. पण या अभ्यासासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा क्लास लावला नाही. पहिल्या प्रयत्नात तर मोठे अपयश आले होते. त्यांनी अभ्यास सोडून दिला होता. पण वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा अभ्यासाला सुरूवात केली. त्यात राज्यसेवेच्या ६ पूर्व परीक्षा दिल्या.
पण दुर्दैव असे की एक – दोन मार्कांनी त्या परीक्षांमध्ये मला अपयश आले. पोस्ट मिळता मिळता राहिली. २०१८ मध्ये राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत धडक मारली पण तेव्हाही अपयश आले. त्यामुळे कृष्णा यांना नैराश्य आले होते. पण घरच्यांचा ठाम विश्वास होता त्यांच्यावर, त्याच्या बळावर त्यांनी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
त्याचदरम्यान असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाचा २०१९ मध्ये निकाल लागला तेव्हा ते एनटी कॅटगिरीतून राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यामुळे घरात आनंदी आनंद झाला. त्याचवेळी राज्य पूर्व परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते नायब तहसीलदार म्हणून नियुक्त झाले.
कृष्णा जाधव यांनी स्वतःच अभ्यास केला. त्यांनी अनेकांकडून फक्त मार्गदर्शन घेतले मात्र त्यांचा मार्ग त्यांनीच निवडला. प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते. कोणाच्या प्रभावाखाली न राहता स्वतःचे वेळापत्रक करावे. त्यांनी अभ्यासासाठी विशिष्ट लायब्ररी, क्लासेस लावले नव्हते.
राज्यसेवेच्या परीक्षा देताना केवळ पुस्तकांच्या मागे न लागता अभ्यास करावा. नीट नियोजनपूर्वक अभ्यास केला पाहिजे, सरधोपट मार्गाने अभ्यास करू शकणार नाही. या अभ्यासासाठी उत्तम मार्ग म्हणजे जुने आय़ोगाचे पेपर सोडवणे. त्यातून आयोगाला काय उत्तर अपेक्षित आहे हे समजते. ते वाचत राहिल्याने आपल्याला नेमके काय करायचे आहे याचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर येते. त्यानंतर एका विषयासाठी एक पुस्तक वापरावे. जास्त पुस्तके वाचण्यापेक्षा सातत्यपूर्ण सराव फार महत्त्वाचे आहे. एकाच विषयासाठी दोन तीन पुस्तके वापरल्याने गोंधळण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे नियोजनपूर्वक, वक्तशीर अभ्यास याला महत्त्व द्या.
कृष्णा जाधव या व्यतिरिक्त एक गोष्ट सांगतात ती म्हणजे आपल्या अवतीभोवती सकारात्मकता निर्माण करणारी लोक, मित्र हवे असतात. कोणत्याही पाय खेचणाऱ्या व्यक्तीबरोबर राहूच नये याची खात्री करा.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्पर्धा परीक्षेत खूप जास्त मुले फॉर्म भरतात. खऱोखरीच यात स्पर्धा असते. ती मान्य करून त्यात अपयश येण्याची शक्यताही अधिक. पण अपयशाला धीराने सामोरे जायला हवे. त्यात कुटुंबाची साथ अत्यंत महत्त्वाची आहे. निराश न होता कुटुंबांच्या मदतीने पुन्हा प्रयत्न करावे. पालकांनीही सतत प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच मित्र परिवारही निवडक असावेत. एकच मित्र असावा जो सातत्याने तुम्हाला प्रोत्साहन देईल. मदत करेल.
स्पर्धा परीक्षेत अपयश कोणालाही येऊ शकते मात्र ते पेलण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे. अपयश येणार नाही किंवा येईलच असे नाही पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर ते हाताळायला शिका. येणाऱ्या समस्येविषयी चर्चा करत उगाळत बसू नका. उलट संधी मिळेल तेव्हा स्पर्धा परीक्षा देत रहावे. एमपीएससीच्या स्पर्धापरिक्षेत सर्वांना एकाच पातळीवरचा संघर्ष करावा लागतो, त्यामुळे पोस्ट मिळवण्यासाठी समस्येवर उत्तर मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या कुटुंबाची, मित्रांची साथ जरूर कायम ठेवा.