शेतकरी पित्याने कर्जावर पैसे घेऊन भरली फी, मुलाने UPSCत 92वा रँक पटकावला

असेल इरादा पक्का तर मार्गातील अडथळे सहज दूर होऊ शकतात. बुलंद शहराच्या IAS Veer Pratap Singh Raghav (वीर प्रताप सिंह) यांची कथा काहीशी अशीच आहे.

आयएएस (IAS) होऊन अधिकाऱ्याची खुर्ची मिळवण्याचे स्वप्न अनेक जण पाहातात. मात्र ते यश गाठण्यासाठी कोणताही छुपा किंवा चोर मार्ग नाही. लक्ष्य गाठण्याची उर्मी आणि आत्मविश्वास याच्या जोरावर आपण नक्कीच लक्ष्य गाठू शकतो.

IAS Veer Pratap Singh यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ९२ वा रँक मिळवला आहे. आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. वीर प्रताप सिंह राघव यांच्या यशाला किनार आहे ती कष्टांची, मेहनतीची आणि उच्च इराद्याची.

वीर प्रताप सिंह यांच्या घरची पार्श्वभुमी गरिबीची होती. वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी व्याजाने पैसे काढले. परंतू आर्थिक अभावापायी वीर प्रताप सिंह यांचे शिक्षण थांबू दिले नाही.

वीर प्रताप सिंह शेतकरी कुटुंबातील आहे, शेतकऱ्यांची स्थिती अपवाद वगळता आपल्या देशात फारशी चांगली नाही. वीर प्रताप सिंह यांच्या वडिलांनाही शिकण्याची खूप इच्छा असूनही शिकता आले नाही कारण आर्थिक स्थिती बिकट होती.

वीर यांच्या मोठ्या भावालाही सिव्हिल सर्विसेसची तयारी करायची होती तिथेही आर्थिक परिस्थितीने घोडे अडले म्हणून त्यांनी सीआरपीएफची नोकरी सुरू केली. त्यानंतर वीर प्रताप आणि मोठा भाऊ यांनी ठरवले की वीर यांना त्यांच्या स्वप्नाबाबत तडजोड करू द्यायची नाही.

मग वडिलांनी ३ टक्के व्याजाने पैसे काढले आणि मुलाचे शिक्षण कायम ठेवले. वीर प्रताप यांनी देखील वडील आणि भाऊ यांच्या कष्टाची जाण ठेवत २०१८ सालामध्ये ९२व्या क्रमांकाने UPSC CSE उत्तीर्ण केली. दलतपूर गावचा हा सुपुत्र आज तिथल्या सर्वच तरूणांसाठी एक प्रेरणास्थान आहे.

प्राथमिक शिक्षणाची खडतर वाट

गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत रोज चालत जाऊन वीर यांनी पाचवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण घेतले. नदी ओलांडून पलीकडे जावे लागे, नदीवर पूल नव्हता तरीही शिक्षणाच्या ओढीने त्यांनी शाळा कधीही चुकवली नाही. त्यांच्या शाळेचे नाव होते आर्य समाज स्कूल, करौरा आणि सहावी पासून शिकारपूर गावातील सूरजभान सरस्वती विद्या मंदीर शाळेतून शिक्षण पूर्ण केले.

२०१५ सालामध्ये त्यांनी अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतून बी. टेक ही पदवी घेतली. तिथे तत्वज्ञान हा एक पर्यायी विषय होता. अभियांत्रिकीचे विद्यार्थी असूनही वीर प्रताप यांनी फिलॉसॉफीतही सर्वाधिक गुण मिळवून विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिले होते.

सिव्हिल सर्विसेस मध्ये यश मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. केंद्रीय किंवा लोक सेवा आयोगाच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी हे बऱ्या आर्थिक वर्गातून आलेले असतात. पण तरीही काही विद्यार्थी गावखेड्यातून येतात आणि यशस्वीही होतात.

संसाधनांची कमतरता असूनही ते अत्यंत पारदर्शी, लखलखीत यश मिळवतात त्यामागे संघर्षाची पार्श्वभुमी असते. त्यामुळेच वीर प्रताप म्हणतात की यशाचा काही फॉर्म्युला किंवा शॉर्टकट नसतो. मन लावून, झोकून देऊन जी व्यक्ती श्रम करते तिला यश हमखास मिळतेच.

हालाखीची परिस्थिती पाहिलेल्या वीर प्रताप यांच्या समोर खचून जाण्याचे अनेक प्रसंग आले. अभावग्रस्त आयुष्याने अनेकदा निराशेचे ढग आले. परंतू सातत्यपूर्ण प्रयत्नांचाच हा परिणाम आहे की दोन वेळा अयशस्वी होऊनही त्यांनी चिकाटीने प्रयत्न केले आणि यशही मिळवले.

वीर प्रताप यांच्यासारखे अधिकारी आपल्या सारख्या तरूणांसाठी प्रेरणास्थान ठरू शकतात. कष्ट, चिकाटी आणि जिद्द यांचे अफलातून मिश्रण वीर प्रताप यांच्या यशामध्ये पहायला मिळते. त्यांच्या या कष्टातून अनेकांना प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा करूया.


हे वाचलंत का ? –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole