वयाच्या २२व्य वर्षी बनली पोलीस उपनिरीक्षक. पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश…

आपल्याला वाढवण्यासाठी आई- वडील अतोनात कष्ट करतात. आपल्याला जन्म देऊन त्यांचे खूप मोठे ऋण असतात. पण आपल्याला उज्ज्वल भविष्य देण्यासाठीही ते झटत असतात. ते उन्हात राहतात पण आपल्या अपत्याला सावली देतात. त्याची जाण ठेवून जो आपल्या आई- वडिलांचं नाव मोठं करतो त्याचं सर्वत्र कौतुक होतं. अशाच आई – वडिलांचं नाव मोठ्या करणाऱ्या एका तरुणीची ही यशस्वी लढ्याची गोष्ट (Success Story)……

कोण आहे ती तरुण पोलीस अधिकारी?

तिचं नाव भावना विजय भिंगारदिवे. (PSI Bhavna Bhingardive) तिने २२ व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. तिने अनुसूचित प्रवर्गात महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवला. तिच्या घरची फार उत्तम वगैरे प्रकारात मोडणारी नव्हती. लहानपणापासून अस्तिव सिद्ध करण्यासाठी आई वडीलांचे असणारे कष्ट तिने पहिले होते. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, हेच महत्वाचे संस्कार तिच्यावर झालेले होते. म्हणूनच आई वडीलांचा समाजातील मान वाढेल व आपलं कर्तृत्व सिद्ध होईल म्हणून तिने MPSC क्षेत्र निवडलं. आणि कमी वयात यशही.

प्रचंड सकारात्मकता –

तिने जेंव्हा MPSC करण्याचा निर्णय घेतला आणि तिला आपल्या क्षेत्राची इतकी आवड निर्माण झाली होती की अभ्यासाची खोली सकारात्मक विचार आणि प्रसिद्ध अधिकाऱ्यांचे फोटो लावून तिने ती सजवली होती. आपल्या खोलीची व्यवस्थाच अशी करून ठेवली होती की झोपेतून उठल्यावर समोर ध्येयाबद्दल जे वाक्य लिहिलं होतं ते दिसायचं. सतत सकारात्मकता समोर असल्यामुळे तीच सकारात्मक उर्जा आपोआपच तिच्यामध्ये यायची. ते सगळ्या सकारात्मक गोष्टींमुळे तिला रोजच प्रेरणा मिळायची आणि तिचा जोमानं अभ्यास व्हायचा. कारण जो लांबचा पल्ला गाठायचा असतो त्यावेळी स्वतःला कायमच सकारात्मक ठेवणं हे फार आवश्यक असतं. म्हणून तिच्याकडे सकारात्मकता ओतप्रोत भरलेली होती. वहीवर नाव लिहितानाही सोबत PSI भावना भिंगारदिवे असं लिहिण्याची सवय लावून घेतली होती. लोक हे असं बघून तिला हसायचे. पण तिनं स्वतःला इतकं स्थिर ठेवलं आणि विचार केला की यांना आता उत्तर देणं आवश्यक नाही.. मला पद मिळालं की यांची तोंडं आपण हूनच बंद होतील. ती तिच्या बहिणीला कायम सांगायची की वयाच्या २२ व्या वर्षी मी नक्कीच कोणत्या ना कोणत्या पदावर बसलेले असणार, ते पद कोणतं आता नाही सांगू शकत पण पद नक्कीच माझ्याकडे असेल. सकारात्मक दृष्टीकोन असण्याची वृत्ती याचा तिच्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे.

अजून थोडं –

माणसाला आयुष्यात जितकं मिळेल तितकं कमीच असतं पण जेंव्हा द्यायची वेळ येते तेंव्हा त्याचा हात सैल होईलच असं नाही. एमपीएससी च्या या प्रक्रियेदरम्यान आपला वेळ द्यावा लागतो. आणि त्या प्रकारे कष्ट घ्यावे लागतात. तिथं हात आखडता घेता कामा नये. या प्रक्रियेत सातत्य राखताना कंटाळा येऊ शकतो. पण या समस्येवरही उपाय हवा. भावनाने जिथं अभ्यासाची जागा होती तिथं समोरील भिंतीवर लिहिलं होतं “अजून थोडं”….यांमुळे कंटाळा ही समस्याच फार गंभीर बनलीच नाही.

काय रणनीती होती?

पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा. (Combined Preliminary Exam of PSI & STI) भावनाने पूर्ण अभ्यासानिशी पूर्व परीक्षा दिली. तिनं answer key पाहून अंदाज लावला की पूर्व परीक्षेतून ती पात्र ठरू शकते. तरीही थोडी भीती मनात होतीच. पण ती पूर्व परीक्षेत ती पात्र ठरली. आणि आता घरी पालकांना तिला मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्याला जावं लागेल, हे सांगायचं धाडस होईना. कारण तिच्या घरात याआधी कुणीच घराबाहेर राहिलं नव्हतं. तिनं धीर एकवटून हे घरी सांगितलं. मुख्य परीक्षेला एकच महिना बाकी होता.

मुख्य परीक्षा – (Mains Exam) ती पुण्याला गेली आणि खोली शोधून स्थिर होण्यात तिचे सात दिवस गेले. उरलेले २३-२४ दिवस होते. तिला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमही धड माहित नव्हता. तिने कुठलाच क्लास लावला नव्हता त्यामुळं तिला मुख्य परीक्षेला कोणते कायदे असतात याची कल्पना ही नव्हती. म्हणून ती घाबरत होती. पण वडीलांनी तिला धीर दिला की कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नसतानाही मुलीनं पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आता ती ही पण परीक्षा उत्तीर्ण होईल. या वडीलांच्या विश्वासाला तडा जाऊ नये. म्हणून तिनं झोपेचा वेळ सोडला तर जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला. मोबाईल बंद केला. या काळात ती पालकांशी जास्त संपर्क करत नव्हती. तिला इंग्रजी आणि मराठीचं विशेष मार्गदर्शन घ्यायला वेळ मिळाला नाही. पण मैत्रिणीने जे मार्गदर्शन केलं, त्यानुसार इंग्रजीचा अभ्यास केला. जिथून जे घेणं शक्य होतं तिथून ते घेतलं. आणि मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेचा निकालाचा दिवस आला होता. ती साहजिकच चिंतेत होती. नाष्टा करताना तिचे हात पाय थरथरत होते, पण मैत्रिणीने तिला आधार दिला. तिची हिंमत वाढवली. कष्ट करणाऱ्या व्यक्तीला यश हे येतंच, हे समजावून सांगितलं. पण तरीही मनात भीती होतीच

शारीरिक चाचणी – (Physical Test) भावनाला खेळाची पार्श्वभूमी नव्हती आणि ती स्वतः याआधी कोणत्या प्रकारच्या खेळात तरबेज नव्हती. तिला पळायचं याची माहिती नाही.. गोळा फेकतात हे लांबच पण धरतात कसा हे ही माहित नव्हतं..योग्य त्या पद्धतीने चालायचं कसं याचीही माहिती नव्हती….. होतं काय तर जिद्द आणि आपल्याला करायचं आहे ही भावना……शारीरिक परीक्षेला यामुळं तिला अडचण आली….तिच्या बहुतांश मित्र-मैत्रिणी या पुण्यात राहून शारीरिक परीक्षेचा मैदानी सराव करायच्या… तिथं मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक होते. सराव करून घेणाऱ्या अकादमी (Academies for physical test) होत्या. पण भावना नगर जिल्ह्यातल्या तिच्या गावी हा सराव करायची. तिला हे नाही मिळालं. घराजवळच एक छोटं मैदान होतं, तिनं तिथं जाऊन तिनं सराव केला. आणि जे चांगले लोक भेटले, त्यांनी तिला मदत केली. एक ग्रुप होता, त्याच्या मार्गदर्शनामुळे तिच्या या अडचणी दूर झाल्या. तिच्या भावाने तिला गोळाफेक बद्दलचं मार्गदर्शन केलं. जबरदस्त इच्छाशक्ती असेल ना तर मार्ग मिळत जातात आणि अडचणी दूर होत जातात, असं भावना सांगते. तिचे शारीरिक हालचाली करून पाय दुखायचे, तिला शारीरिक इजा ही झाली. तिला लंगडत चालण्याशिवाय पर्याय नव्हता. तरीही मागं जायचं नाही, पुढंच जायचं आणि पद मिळवून राहणार हेच तिनं मनाशी पक्कं ठरवलं होतं. इजा – त्यातून बरं व्हावं यासाठी खूप दवाखान्यांच्या वाऱ्या कराव्या लागल्या. धावणे या विभागात बाकी मुलींपेक्षा काही सेकंद जास्त लागले.. तर या काळात बाकी मुली ग्लुकोज पीत होत्या, कोण चॉकलेट खात होतं….पण भावना मातीत बसून किती मार्क्स मिळालेत आणि अजून किती मिळवायचे आहेत याचं गणित आखत होती..

मुलाखत (Interview) – भावना सांगते की मुलाखत हा प्रकार मॉक मध्ये सांगतात त्याप्रमाणं अवघड आणि भीतीदायक नाही. तुम्ही खरेपणाने मुलाखतीला सामोरे जा. जसे आहात तसे तिथं दाखवा. म्हणूनच तिची मुलाखत ही चांगली झाली.
तिनं पद मिळवण्यासाठी चारही टप्यांवर किती गुण लागतात याची सगळी आकडेमोड केली होती. पण निकाल लागून त्या यादीमध्ये नाव येईपर्यंतही एक भीती असते..

आणि भावनाला यश मिळालं –

निकालाच्या दिवशी त्या यादीत स्वतःचं नाव पाहिलं तो क्षण शब्दांत सांगता येत नाही, असं तिने सांगितलं. आजवर आई-वडीलांनी आणि स्वतः घेतलेले कष्ट, तिने ज्या खाच खळग्यांतून मार्ग काढला, त्याचं सार्थक झालं. जे हवं होतं ते यश अखेर मिळवलंच. तिने आई- वडीलांचा विश्वास सार्थ ठरवला. निकाल ऐकल्यावर आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते.

MPSC करणाऱ्या उमेदवारांना संदेश –

महत्वाची जी गोष्ट भावनाने सांगितली ती अशी की जे गावात आढळत नाही ते सगळं पुण्यात मिळतं. या झगमगाटात आपण ध्येय विसरतो. लोक या लखलखीत जगात हरवून जातात. पण भावनाचं तसं नव्हतं तिला दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. सगळं लक्ष तिनं अभ्यासावर केंद्रीत केलेलं होतं. म्हणून तिला प्रयत्नात यश मिळालं.
आई- वडीलांच्या कष्टांचं चीज करणं, त्यांची मान उच्च राहील असं कर्तृत्व गाजवणं हेच आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. हा महत्वाचा संदेश तिनं सर्वांना दिला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole