स्क्रीनमुळे डोळ्यात येणारे पाणी असे थांबवा

‘दोन डोळे शेजीरी भेट नाही संसारी’ अशी म्हण आपण वापरत आलो आहोत, मात्र हेच डोळे आपल्याला सुंदर जगाचे दर्शन घडवतात. सकाळी उठल्यापासून उघड्या डोळ्यांनी आपण किती आणि काय काय पाहात असतो, टिपत असतो. त्यात भर पडली आहे ती मोबाईल आणि कॉम्प्युटरची. 

वर्क फ्रॉम होम असो की ऑफिसातून काम; कॉम्प्युटर हा रोजच्या कामाचा पर्यायाने जगण्याचाच भाग झाला आहे. काम तर केलेच पाहिजे पण डोळ्यांना त्याचा त्रास अधिक प्रमाणात होत आहे. कॉम्प्युटर, मोबाईल स्क्रीन यांच्या अतिवापराविषयी मी सांगणार नाही कारण ते टाळलेच पाहिजे. पण जेव्हा कामासाठी म्हणून अधिक वेळ कॉम्प्युटरचा वापर करावा  लागतो. साहाजिकच त्याचा ताण डोळ्यावर येतो. 

डोळ्यावर ताण आला की डोळे, दुखणे, डोळ्यातून पाणी येणे असे त्रास होणारच. त्यासाठी काम करताना काही गोष्टींची सवय किंवा पद्धती अंगवळणी पाडून घ्यायला हव्या. डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी किंवा त्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो याची माहिती घेऊया,

डोळे आणि कॉम्प्युटरमधील अंतर-

लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करताना डोळे आणि स्क्रीन यांच्यामध्ये विशिष्ट अंतर जरूर असले पाहिजे. स्क्रीन डोळ्यापासून जितकी लांब तितका त्याचा थेट परिणाम कमी होतो. अनेकांना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनच्या जवळ जाऊन काम करण्याची सवय असते, परिणामी त्यांच्या डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यातून पाणी येऊ लागते. डोळे कोरडे पडतात, त्यांची जळजळ होते. त्यामुळे कॉम्प्युटरची स्क्रीन ही कमीत कमी दोन फूट लांब असली पाहिजे. 

स्क्रीनचा ब्राईटनेस कमी असावा- 

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा ब्राईटनेस म्हणजे प्रकाश आपल्या सोयीने ठेवता येतो. त्याला ब्राईटनेस अँडजेस्टमेंट म्हणतात. काही जण काम करताना विनाकारण हा प्रकाश वाढवतात. पण त्यामुळे त्यांचे डोळे लवकर थकतात. स्क्रीनचा ब्राईटनेस जितका जास्त तेवढी डोळ्यांची जळजळ अधिक प्रमाणात होते. त्यासाठी अंधारात फुल ब्राईटनेस वाढवून काम करण्यापेक्षा भरपूर उजेड असलेल्या जागी बसून काम करावे. 

सतत काम नको- 

लॅपटॉप किंवा स्क्रीनकडे सातत्याने लक्ष दिल्याने डोळे श्रमतात. जसे आपल्याला दमल्यानंतर विश्रांतीची गरज असते तशीच ती डोळ्यांनाही द्यायला हवी. म्हणून दर साधारण ५० मिनिटांनी स्क्रीनपासून दूर जाणे हितकारक ठरते. काही वेळ ब्रेक घ्या. तसेच दर काही सेकंदांनी डोळे बंद करावेत.

डोळ्यांचा व्यायाम करणे आवश्यक- 

डोळ्यांचे पाहण्याचे कार्य इतर अवयवांच्या मानाने सर्वाधिक होते. जसा शऱीर चालण्यासाठी, तंदुरूस्त राहण्यासाठी व्यायाम गरजेचा असतो तसेच डोळ्यांचा आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहेत. त्यासाठी दर २० मिनिटांनी ब्रेक घ्यावा. डोळे दर २० सेकंदाने बंद करावेत. तसेच डोळे २० फूट अंतरावरील कोणत्याही वस्तूवर स्थिर करून तिथे लक्ष केंद्रीत करावे. 

त्याशिवाय काम संपल्यानंतर डोळ्यांच्या आरोग्याच्या अधिक काळजी घेण्याची गरज आहे. वेळ मिळेल तेव्हा डोळे बंद करून त्यावर कच्या दुधात भिजवून कापसाची पट्टी ठेवावी. तसेच काकडीचे काप, गुलाबपाण्यातील कापसाच्या पट्ट्या ठेवाव्यात. त्यामुळे डोळ्यांना शांतता आणि आराम मिळण्यास मदत होते. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole