प्रदीपकुमार डोईफोडे यांनी सांगितली यशाची गुरुकिल्ली

शिक्षणाची गंगा समाजातल्या  तळागाळापर्यंत पोचताना दिसते आहे. अर्थात या गंगेत प्रत्येकाला आपली नाव लोटता येत नाही, कारण असते अक्षमतेचे. पण जिद्दीच्या जोरावर आर्थिक परिस्थिती बेताची असूनही काही मुलांना शिक्षणाची ओढ शांत बसू देत नाही. अर्थात स्पर्धा परीक्षा ही अशा मुलांसाठी दोन्ही प्रकारे परीक्षा पाहणारीच असते. पाहिले म्हणजे ती स्पर्धात्मक असते आणि दुसरे म्हणजे अपुऱ्या सोयीसुविधांमधून त्यांना ही समुद्र पार करायचा असतो. त्यातही स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी असतात त्या सर्वांनाच पहिल्याच  प्रयत्नात यश मिळते असे नाही. पण जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर कमी सोयीसुविधा असूनही ते यश मिळवतात.

बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी मधील प्रदीपकुमार डोईफोडे हा भटक्या जमातीतील असाच जिद्दी विद्यार्थी. प्रदीपकुमारचे वडील अल्पभुधारक शेतकरी आहेत. प्रदीपकुमारने पहिल्याच प्रयत्नात एनटी-डी प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. प्रदीपकुमार डोईफोडे आता राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण होत राजपत्रित अधिकारी म्हणून कामाला सुरुवात करणार आहे. 

प्रदीपकुमार ज्या गावात राहतो, त्याची लोकसंख्या केवळ ८०० आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या  वडिलांचा हा मुलगा केवळ कष्ट आणि मेहनत यांच्या जोरावर हे यश संपादित करू शकतो यावर खरेतर विश्वास  बसत नाही. पण प्रदीपने ते शक्य करून दाखवले आहे. प्रदीपच्या कुटुंबातील कोणीही शासकीय नोकरीमध्ये नाही. प्रदीपचे प्राथमिक शिक्षणही गावातल्या जिल्हापरिषद शाळेत झाले, तर देऊळगाव राजा इथे त्याचे माध्यमिक शिक्षण झाले आहे. त्यानंतर औरंगाबाद इथे त्याचे पुढील शिक्षण झाले. सिव्हिल इंजिनिअरिंगची आवड असल्यामुळे  त्याने जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंग करता करता त्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली. 

२०१८ मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर प्रदीपने स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रीत केले. पण त्याला या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावणे शक्य नव्हते. पण तरीही त्याच्याकडे जिद्द आणि चिकाटी मात्र भरपूर होती. सातत्यपूर्ण अभ्यासाला नियमिततेची जोड देत प्रदीपने स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी घातली. 

राज्यसेवेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी २०१९ मध्ये जाहिरात आली होती. प्रदीपच्या आईवडिलांनी त्याला खूप प्रोत्साहन व पाठिंबा दिला. प्रदीपने राज्यसेवेचा फॉर्म भरल्यानंतर  केवळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले ते म्हणजे अभ्यास. तासन् तास त्याने अभ्यास केला तोही कोणत्याही क्लासच्या मार्गदर्शनाशिवाय. २०१९ च्या नोव्हेंबर मध्ये मुख्य परीक्षेनंतर जानेवारी २०२२ मध्ये दिलेल्या  मुलाखतीचा निकाल १२ फेब्रुवारी रोज जाहीर झाला. तेव्हा प्रदीप डोईफोडे भटक्या प्रवर्गातून एनटीडी मधून राज्यांमध्ये प्रथम आल्याचा निकाल जाहीर  झाला.

एक गोष्ट यातून स्पष्ट होते की ग्रामीण विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसतील तरीही ते कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यशस्वी झालेले पहायला मिळत आहेत. अर्थातच प्रदीप सांगतो त्याप्रमाणे कोणत्याही प्रशासकीय पदापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवण्याची गरज आहे. तीच यशाची गुरूकिल्ली ठरू शकते. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole