खाकीमध्ये माणुसकी जपत दहा हजार गरजूंना मदत करणारे पोलिस मामा

खरं बघायला गेलं तर या वर्दीच्या आतही एक माणूसच आहे आणि त्यालाही भाव-भावना आहेत, त्या भावना जपत त्यातले काही पोलिस मामा आपलं कर्तव्य पार पाडत असतात.

कोरोनामुळे सध्या आपल्या देशात हाहाकार माजला आहे. सगळ्या यंत्रणा-व्यवस्था मोडकळीला आल्या आहेत, आता सगळ्यात जास्त ज्याची गरज आहे त्या प्राणवायूची मदत मिळणंही अवघड झालं आहे, यासाठी परदेशातून आपल्याला मदत मिळत आहे. या संकटाला तोंड द्यायला आपल्या देशातील विविध संस्था, हाय-प्रोफाइल व्यक्ती यांनी सढळ हाताने मदत केल्याचं आपण बातम्यांमधून पाहिलं असेल. मागचं वर्ष तसंच बहुधा हे ही वर्ष टाळेबंदीत जाणार असं दिसतंय, आपण कुठही बाहेर पडलो तरी चौकाचौकात उभे असणारे पोलिस आपल्याला अडवतात. विनाकारण बाहेर आलो असू तर कारवाई केली जाते. कधीकधी तर पार्श्वभागावर प्रसाद मिळतो. केंव्हा केंव्हा निष्कारण पोलिसांनी अडवून कारवाई केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांचा रागच येतो. हे सगळं आपल्या आरोग्याच्या कारणासाठी जरी पोलिस करत असले तरीही या पोलिसांना त्यांना नागरिकांच्या अडचणी समजतात की नाही, त्यांना माणुसकी आहे का नाही हा प्रश्न पडतो.

कोण आहेत हे पोलिस मामा ?

पण खरं बघायला गेलं तर या वर्दीच्या आतही एक माणूसच आहे आणि त्यालाही भाव-भावना आहेत, त्या भावना जपत त्यातले काही जण आपलं कर्तव्य पार पाडत असतात. असंच नाव आवर्जून घ्यायला हवं ते म्हणजे गौतम तुकाराम चव्हाण. असं काय खास केलं चव्हाण यांनी? जाणून घेऊयात. सध्या जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात सेवा बजावतात. ते पोलिस शिपाई या पदावर आहेत. मदतगार पोलिसवाला अशी त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयामध्ये सध्या ते बंदोबस्ताला आहेत. ते आपलं काम चोख बजावतात पण रूग्णांच्या नातेवाईकांनाही ते मदत करत असतात. एखाद्या पोलिसाला किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कुणाला जर कोरोना झाला असेल तर संबंधित व्यक्तीची चाचणी करणे,त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर त्यानंतर रुग्णालयात दाखल करणे, त्यासाठी रुग्णावहिका मिळवून देणे, खाट मिळवून देणे, डब्याची सोय करणे, बाहेरून जे काय हवं आहे ते आणून देणे हे सगळं काम ते करत असतात. खात्यात नसणार्‍या बाकी सामान्य नागरिकांना देखील ते लागेल ती मदत करतात. आजवर त्यांनी ज्यांना ज्यांना मदत केली आहे तो आकडा चार अंकी आहे.

मध्यंतरी त्यांना या सगळ्या धावपळीत कोरोनाची लागण झाली, त्यांच्याबरोबरीने सगळं कुटुंब ही बाधित झालं. जवळपास दिडेक आठवडा त्यांनी व्हेंटिलेटरवर काढला. पण मनात असलेली सकारात्मकता व तिच्या जोरावर त्यांच्यासह सर्वांनी कोरोनावर मात केली. पुन्हा एकदा चव्हाण साहेब आपलं कर्तव्य निभावायला तयार झाले. पुन्हा नोकरी आणि सोबत लोकांची सेवा करणं सुरू केलं. पोलिस खात्यात काम करणं याला लोकसेवाच म्हटलं जातं पण त्याचबरोबर रुग्णासेवेचंही व्रत हातात घेणं, यातून चव्हाण साहेबांच्या माणुसकीचं दर्शन घडतं. मृत्युला चकवा देऊन पुन्हा जनसेवेसाठी उभं राहणं म्हणजे ज्यांची कामं केलीत त्यांचा दुआ मिळाला म्हणूनच शक्य झालं असावं. पोलिस मामा च्या या कार्याबद्दल त्यांचं कौतुकही झालं आहे. त्यांच्या या समाजसेवेला मान झुकवून प्रणाम करायला हवा.


हे वाचलंत का ? –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole