चुकीच्या निर्णयातून डिसिजन मेकिंग शिका – IPS तेजस्वीनी सातपुते

IPS तेजस्वीनी सातपुते – अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या शेवगाव मध्ये आयपीएस तेजस्विनी सातपुते. प्राथमिक शिक्षिका असलेल्या आईच्या तालमीत शिस्तीचे बाळकडू प्यायलेल्या IPS तेजस्वीनी सातपुते यांचा आयपीएस होण्याचा प्रवास हा खूप काही शिकवून जाणारा आहे. आपल्या चुकीच्या निर्णयातूनही आपल्यात निर्णयक्षमता येऊ शकते त्यांच्या एकूण प्रवासातून कळते.

प्राथमिक शिक्षिका असलेल्या आईच्या दृष्टीने शिस्त, शिक्षण याला महत्त्व होतेच पण तेजस्विनी सातपुते मात्र लवकर न उठणाऱ्या, शाळेत उशिरा जाणाऱ्या होत्या. अभ्यास पक्का व्हावा यासाठी आई व्यवसायमाला आणून देत असे आणि तेजस्विनी व त्यांची बहिण मात्र या व्यवसायमाला तशाच कोऱ्या ठेवून देत असत. एक दिवस आईला त्या मिळाल्या आणि त्या व्यवसायमालांचा वापर करायचा तर आपण त्याची शेकोटी करू म्हणाली. त्यानंतर दोन्ही मुलींनी आईच्या हातापाया पडून त्या व्यवसायमाला परत घेऊन चार दिवसात पूर्ण केल्या.

त्यानंतरच्या चौथीच्या केंद्र परीक्षेत तेजस्विनी दुसऱ्या आल्या तेव्हा त्यांना जाणवलं की आपण काही तरी वेगळं करू शकतो. पाठ्यपुस्तकाला निर्मलजीत सिंग या पायलटविषयीचा धडा वाचून त्यांनी पायलट व्हायचं ठरवलं कारण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलं होतं. पुढे अकरावीत गेल्यानंतर चष्मा लागल्याने पायलट होता येणार नाही हे स्पष्ट झाले आणि लहानपणाचं स्वप्न खंडीत झालं.

लहानपण

तेजस्विनी सातपुते एकत्र कुटुंबात राहात होत्या. घऱात एकूण २७ भावंड होती. त्यातल्या बहुतांश मुलींची लग्न झाली होतीच. तेजस्विनी यांना पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळाली होती. पण शिक्षणाच्या वाटेने नेमके काय करायचे हे मात्र तेजस्विनी यांन ठरवता येत नव्हते. विद्या प्रतिष्ठान मध्ये जैवतंत्रज्ञान विषयासाठी अँडमिशन घेतले. तिथे बंगलोर ची संस्था शास्त्रज्ञ होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मार्गदर्शन करत असते.

संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची एकटीची आणि देशातून फक्त दहा जणांची निवड झाली होती. शास्त्रज्ञ होण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेत तीन वर्ष त्यांनी खूप अभ्यास केला पण दोन वर्षाअंती लक्षात आले की हे आपल्यासाठी नाही. त्यामुळे तिसऱ्या वर्षी एमएससी किंवा पीएचडी करायीच नाही हे ठरवलं पण मग नेमकं करायचं काय हे देखील स्पष्ट नव्हतं. मग पर्याय काय. एम ए किंवा एलएलबी. संयुक्त कुटुंबातून मुलीच्या उच्च शिक्षणासाठी परवानगी मिळणं सोपी गोष्ट नव्हती. पण आईवडिलांचा भक्कम पाठिंबा असल्यानेच ते शक्य झाले होते. त्यामुळे आता मागे हटून चालणार नव्हते.

एलएलबी च्या पहिल्या वर्षी त्या विद्यापीठात दुसऱ्या आल्या. तेव्हाच काही मुलांच्या तोंडून त्यांनी कॉम्पिटिटीव्ह एक्झाम विषयी ऐकले. माहिती मिळवली. स्पर्धा परीक्षेत वर्ष नसतात तर अटेम्प्ट असतात, जितके अटेम्प्ट देऊ आणि त्यात पास होऊ त्यानंतर पुढे जाता येते. पायलट होण्याच्या स्वप्नानंतर प्रथमच हे क्षेत्र पॅशन पूर्ण करणारे आहे असे वाटले.

युपीएससीची तयारी सुरू केली.

एलएलबीच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा आणि युपीएससी परीक्षा एकाच वेळी आली. युपीएससी ची पूर्वपरीक्षा द्यायचे ठरवले. प्रश्न एवढाच होता की ज्या घरच्यांना वकील होईल न्यायाधीश होईन अशी स्वप्न दाखवली असताना आता अचानक कलेक्टर होण्याची स्वप्न कशी दाखवायची.

आत्तापर्यंतच्या प्रवासात काही चांगलं करायचं ठरवलं की अचानक वळण घेऊन दुसऱ्याच रस्त्याला जाते, क्षेत्र बदलते असे चित्र निर्माण झाले होते. आई त्यावर नाराज होती पण वडिलांनी मात्र पाठिंबा दिला. त्यांनी कायमच तू चांगला नागरिक होण्यासाठी तुला शिकवणं गरजेचं वाटतं असा विश्वास दिल्यावर चिंता दूर व्हायच्या. मग तेजस्विनी यांनी आईलाही कन्व्हिन्स केलं. युपीएससीच्या परिक्षेसाठी मुंबईतली एक संस्था प्रवेश परीक्षा घेऊन त्यात चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करायची. त्या संस्थेत तेजस्विनींना मार्गदर्शन मिळाले.

IPS तेजस्वीनी सातपुते

युपीएससीची पहिली अटेम्प्ट पास झाल्या नाहीत, दुसऱ्या अटेम्प्टला दिवाळीनंतर परीक्षा होती. मेसलाही सुट्टी होती तेव्हा ते दिवस पाणी आणि बिस्किटे खाऊन तारून नेली. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तेजस्विनींनी पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू ते तीनही टप्पे पार केले. आणि त्या आयपीएस झाल्या.

या सर्व प्रवासात त्यांना आईवडिलांची साथ मिळाली. वय वाढलेली मुलगी, तिचे लग्न नाही केले हे सर्व प्रश्न गावातले लोक विचारतील म्हणून आईवडिलांनाही भेटायला रात्री पोचायच्या आणि पहाटेच्या अंधारात परत मुंबईला परत निघायच्या. परीक्षा पास होईपर्यंत लोकसंपर्क टाळला. परीक्षा होईपर्यंत अनेक मोह आड आले पण निष्ठेने त्यावर मात करत, आईवडिलांचे कष्ट आठवून अभ्यास करत राहिल्या.

आता मागे वळून पाहिल्यानंतर आपल्या चुकीच्या निर्णयातूनही निर्णय क्षमता वाढते, आणि प्रत्येक अपयश काही नाही शिकवून जातो असे वाटत असल्याचे तेजस्विनी सांगतात. करिअर कोणत्याही क्षेत्रात करताना शिक्षणाला फार महत्त्व आहेच पण अपयश हे देखील एक प्रकारचे शिक्षणच असते. त्या अपयशात गुरफटून न जाता जिद्दीने आपले स्वप्न साकार करण्याची धमक त्या अपयशातून मिळवायला हवी, हे तेजस्विनी यांच्या प्रवासातून दिसून येते.


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole