रस्त्यावर बांगड्या विकणारा झाला IAS अधिकारी

IAS बनून देशसेवा करणारे, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करणाऱ्या बऱ्याच यशकथा आपण याआधी वाचल्या असणार. पण आज आपण ज्यांची गोष्ट जाणून घेणार आहोत जी वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल कि एखादा मनुष्य इतक्या संघर्षांतून जाऊनही एवढा जिद्दी कसा असू शकतो.

सोलापूर जिल्ह्यातील महागाव या खेड्यातील रमेश घोलप हा एक साधारण कुटुंबातील पण अभ्यासात हुशार असणारा मुलगा. वडिलांचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय, ज्यात त्यांच्या परिवाराचं जेमतेम भागायचं. परंतु वडिलांची तब्येत सारखी खराब असल्याने Ramesh Gholap यांच्या आईने बांगड्या विकायला सुरवात केली. पोलिओमुळे एका पायाने अपंग असूनही आईला मदत म्हणून रमेश आणि त्याचा भाऊ देखील बांगड्या विकायला जात असत.

अभ्यासात हुशार असल्याने रमेश शाळेतील सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. १२वी मध्ये असताना अचानक वडिलांचे निधन झाले. शिकायला दुसऱ्या गावी असणाऱ्या रमेश कडे घरी जाण्यासाठी बसच्या भाड्याचेही पैसे नव्हते. शेवटी काही शेजाऱ्यांनी मदत केल्यावर वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी रमेश घरी जाऊ शकला.

आता आर्थिक परिस्थिती अजूनच बिकट होती. पण १२वी च्या परीक्षेत रमेशने ८८.५% मिळवले. चांगले मार्क्स असूनही त्याने D.Ed ला प्रवेश घेतला कारण ह्या कोर्सची फी सर्वात कमी होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर २००९ साली रमेशला शिक्षक म्हणून नोकरी सुद्धा लागली. हा क्षण त्याच्यासाठी स्वप्न सत्यात अवतरल्या सारखा होता, परंतु रमेश घोलप एवढ्यात समाधानी होणार नव्हता. त्याला काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती.

वडिलांच्या मृत्यू नंतर रमेशला बरेच वाईट अनुभव आले. रेशन दुकानदार गरजूंना रॉकेल देण्याऐवजी बेकायदेशीरपणे बाजारात विकत असे. पेन्शन मिळवून देऊ असे सांगून त्याच्या आईची फसवणूक करण्यात आलेली. वडील सरकारी दवाखान्यात असताना त्यांच्या उपचारात केलेली चालढकल, ह्या सगळ्या वाईट अनुभवांमुळे रमेश वैतागला होता. त्याला सरकारी व्यवस्थेत बदल घडवण्याची इच्छा होती.

गावातील काही मित्रांबरोबर मिळून रमेशने एक राजकीय पक्ष सुरु केला. गावातील पंचायत निवडणुकीत आईला उभं केलं. परंतु काही मतांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने रमेश मुळीच खचला नाही. दुसरीकडे पुण्याला जाऊन त्याने MPSC आणि UPSC परीक्षेचा अभ्यास सुरु केला.

अखेर IAS Ramesh Gholap

रमेश घोलप यांना UPSC चा अर्थ देखील माहित नव्हता. पुण्यात कोचिंग क्लास लावण्यासाठी पुरेसे पैसे देखील त्यांच्याकडे नव्हते. रमेश घोलप यांनी नोकरीवरून ६ महिन्यांकरिता रजा घेतली आणि प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी UPSC चा अभ्यास सुरु केला. २०१० साली झालेल्या परीक्षेत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले.

परंतु २०१२ साली दुसऱ्या प्रयत्नात मात्र यशाने रमेशला गवसणी घातली. त्याचं स्वप्न सत्यात उतरलं होतं. रमेश आता IAS रमेश घोलप (IAS Ramesh Gholap) झाले होते. UPSC च्या परीक्षेत रमेश यांनी संपूर्ण देशात २८७ वा रँक पटकावला होता. काही महिन्यांनी MPSC परीक्षेचा निकाल लागला आणि आश्चर्य म्हणजे रमेश घोलप यांनी महाराष्ट्रात १ला रँक मिळवला होता.

IAS Ramesh Gholap सध्या झारखंड येथील Energy Department मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.