बायकोला पीएसआय करून दाखवलेच, पळशीच्या जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी……

Jaydip Pisal Story – ही कहाणी आहे एका आगळ्यावेगळ्या जोडप्याची. लग्न म्हणजे नवी माणसं, नवे कुटुंब, नवी स्वप्न, अनेक आशा, आकांक्षा. एकमेकांच्या साथीने, कुटुंबाची जबाबदारी, कर्तव्यं या सर्व गोष्टी एकाच वेळी पार पाडायच्या असतात. त्यात एकमेकांची पक्की साथ या सर्वांत जमेची बाजू असते. जयदीप पिसाळ यांचीही पत्नीला पक्की साथ होती पण थोडी वेगळ्या मार्गाने जाणारी.

जयदीप पिसाळ साताऱ्यातल्या पळशी गावचे रहिवासी. लहानपणापासूनच कष्ट करणाऱ्या जयदीप पिसाळ यांनी प्रसंगी वाठार रेल्वेस्टेशनवर उसाचा रस विकून शिक्षण पूर्ण केले. कष्ट करतच त्यांनी राज्यसेवा परीक्षेची तयारीही केली. या परीक्षेत त्यांना दोन वेळा घवघवीत यश मिळाले. परीक्षा उत्तीर्ण झाल्याने स्थैर्य मिळणार होते. पण जयदीप यांचे मन काही गावातून बाहेर पडायला तयार नव्हते, त्यांच्या मनात गावाच्या विकासासाठी गावात राहून काम करण्याची इच्छा काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे दोन्ही वेळेला त्यांनी राज्य सेवेतील पदे नाकारली. गावाच्या दृष्टीने हा वेडेपणाच होता. गावाच्या विकासाचे स्वप्न उरी बाळगलेल्या जयदीप यांना मात्र त्याची खंत नव्हती. त्यांनी हिरो होंडा गाडीची फ्रँचायझी घेतली, पुढे निवडणुकीत उतरत जयदीप (Jaydip Pisal Story) पळशी गावचे सरपंच म्हणून निवडून आले.

अल्पावधीतच गावात विविध कामे करून त्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलला. विविध योजना आणून गावाचा विकास गेला. गोरगरिबांसाठी सातत्याने कार्यशील राहिले. सिमेंटचे रस्ते, विहीरी बांधणे अशी अनेक कामे केली. शालेय विद्यार्थ्यांसाठी काही योजना राबवल्या. शासन पातळीवर या सर्व प्रयत्नांची दखल घेतल्याने शासनाने गावाला विविध पुरस्कारांनी गौरवले देखील.
एवढे करूनही पोस्ट नाकारलेला माणूस म्हणून गावातील काही लोक त्यांना नावं ठेवतच होते, तरूण तुच्छतेने पाहत होते. जयदीप यांना त्याचा फारसा फरक पडत नव्हता. दरम्यानच्या काळात गावातल्या कल्याणी सकुंडेवर त्यांचा जीव जडला होता. पण पुन्हा पोस्ट नाकारलेल्या मुलाला मुलगी देणार नाही असे त्यांना कल्याणीच्या वडिलांनी ऐकवले. पण निराश होतील ते जयदीप कसले! त्यांनी दोन वर्षात कल्याणीला पीएसआय करून दाखवतो, असे सांगून कल्याणीशी लग्न केले.

लग्नविधी आटोपल्यानंतर देवदर्शन, फिरायला जाणे या सर्व गोष्टींना फाटा देत जयदीपने बायकोच्या हाती पंजाबी ड्रेस आणि पुस्तके दिली. तिला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देऊ केली. कल्याणीच्या वडिलांसह सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि सासऱ्याला जावयाचा अभिमानही वाटला.

एकीकडे गावाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करत जयदीप यांनी कल्याणीला अभ्यासाचे धडे दिले. अवांतर गप्पा न मारला तिला जनरल नॉलेज शिकवत तिच्याकडून व्यवस्थित अभ्यास करून घेतला. दोन वर्ष अभ्यास करून कल्याणीने राज्यसेवेची परीक्षा दिली. पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली आणि पीएसआयची ट्रेनिंगही कल्याणीने पूर्ण केली. कल्याणी सध्या मुंबई पोलिस मध्ये पीएसआय म्हणून कार्यरत आहे.
कल्याणी जेव्हा पीएसआयचे प्रशिक्षण घेऊन गावी आली तेव्हा तिला तिच्या नवऱ्याने तिला सर्वप्रथम सॅल्युट केला. आपण दिलेला शब्द आणि पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊन कल्याणीच्या रूपात जयदीपच्या समोर उभे होते. जयदीपचा आणि घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्री उभी असते, हे रूढ आहेच पण जयदीप सारखे अपवादात्मक पुरूष आपल्या जोडीदाराच्या मागे उभे राहूनही तिच्या प्रगतीचा मार्ग खुला करून देतात.


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.