भारतीय हवाई दलाकडून नव्या अग्निवीर वायू भरतीबाबत घोषणा; नोव्हेंबरपासून सुरू होणार नोंदणी
अग्निवीर वायू भरती – भारतीय हवाई दलानं नवीन अग्निवीर वायू भरती प्रक्रियेसाठी तारखा घोषित केल्या आहेत. नवीन भरती प्रक्रियेसाठीची नोंदणी प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. या भरतीसाठी जानेवारी 2023 मध्ये परीक्षेचं आयोजन केलं जाईल, अशी माहिती हवाई दलानं ट्विटद्वारे दिली आहे. हवाई दलानं 12 ऑक्टोबरला यासंबंधीची आधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून दिली. त्यात म्हटलं आहे की, या भरती प्रक्रियेसंदर्भात लवकरच संपूर्ण नोटिफिकेशन agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलं जाईल. तथापि, हवाई दलाकडून अग्निवीर वायू 2022 ची भरती करण्यात आली आहे. आता 2023 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठीची नोंदणी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल.
मागील भरतीप्रमाणेच, आगामी भरतीमध्येदेखील जे उमेदवार गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजीसह किमान 50 टक्के गुणांनी 12 वी उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्यांनी 10 वी नंतरचा तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा केला आहे. त्यांना सहभागी होण्यासाठी संधी दिली जाऊ शकते. याशिवाय सायन्सव्यतिरिक्त इतर विषयांमध्ये 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण आणि इंग्रजी विषयात किमान 50 टक्के गुण मिळवलेले उमेदवारदेखील अग्निवीर वायू भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसंच या भरतीसाठी तरुण आणि तरुणी असे दोघंही अर्ज करू शकतात.
तसंच, पूर्वीच्या भरतीप्रक्रियेच्या आधारे असंही म्हणता येईल, की उमेदवारांची निवड ऑनलाईन चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल.
दरम्यान, हवाई दलाच्या वतीने नुकताच वायुसेना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. हवाई दलात पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांची भरती केली जाणार असल्याचं चौधरी यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी तरुणींनादेखील अर्ज करता येणार आहेत.
केंद्र सरकारने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अग्निवीर या खास योजनेची घोषणा केली आहे. या योजनेबद्दल देशभरात वादही निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे या योजनेविषयी तज्ज्ञांमध्ये मतमतांतरं दिसून आली होती. मात्र जेव्हा सरकारने या योजनेसंदर्भात अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर मोठ्या संख्येने उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले होते. देशातील तरुणांनी या योजनेला जोरदार प्रतिसाद दिला आहे. लवकरच हवाई दलाकडून 2023 मधील अग्निवीर वायूच्या भरतीप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. देशसेवा करण्याची इच्छा आहे, अशा युवक-युवतींसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय हवाई दलात काम करण्याची संधी मिळणार आहे.