कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती आपल्यात आहे का हे कसं समजतं? कशी मोजतात Immunity?

आता आरोग्या बद्दल कोणताही विषय सुरू झाला की पहिल्यांदा विषय येतो तो म्हणजे कोरोना, तो आता आयुष्याचा भाग झाला आहे. पण आपण सर्वजण त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून असतो. गेले दीड वर्ष आपण स्वस्थ निरोगी राहावं म्हणून हरेक तऱ्हेने प्रयत्न करत आहोत, आपला रोग प्रतिकारक शक्ती (Immunity) चांगली राहावी याकडे लक्ष देत आहोत.

Immunity म्हणजे नेमकं काय असतं? तिची प्रक्रिया कशी चालते? कोरोना विरोधात ती आपल्याला कशी मदत करते? याबद्दल आपण सगळंच जाणून घेऊयात,

काय असते रोगप्रतिकारशक्ती?

आपण सीमापार होणारे दहशतवादी हल्ले, नव्याने होणारे ड्रोन हल्ले याबद्दल वाचत असतो, त्यावर आपल्या सीमा सुरक्षा दलाने (Border security force) ने दिलेलं तगडं प्रत्युत्तर, दहशतवाद्यांचा केलेला खात्मा याबद्दलही वाचलं असेलच. त्यासाठी आपल्या या सुरक्षा दलाचा आपल्याला अभिमान वाटतो. अगदी तसंच सुरक्षा दल आपल्या शरीरातही असतं, ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) म्हणतो. या सुरक्षा दलात जे सैनिक असतात त्यांना प्रतिपिंडे (Antibodies) म्हणतात. या प्रतिपिंडांना Immunoglobuline या नावाने ओळखलं जातं. प्रतिपिंडे ही मुळात प्रथिने (protien) असतात. सर्वसाधारणपणे काय होतं की जेंव्हा जीवाणू/ विषाणू आपल्या शरीरात जातो, म्हणजे काय झालं तर त्या जीवाणू किंवा विषाणूचं संक्रमण (Infection) झालं असं म्हटलं जातं.

आता जीवाणू/विषाणूच्या शरीरातील उपस्थितीमुळे रोग प्रतिकारक शक्तीला (Immunity) चालना मिळते की कोणी दुसरा जीव आला आहे जो आपल्या शरीराला हानिकारक आहे, तर या जिवाणू/ विषाणूला ही प्रतिपिंडे घेरतात आणि त्याला प्रतिकारकशक्तीचा महत्वाचा भाग असलेल्या टी पेशींकडे (T cells) सुपूर्त केलं जातं, मग या टी पेशी त्याला संपवून टाकतात. यासाठीच आपल्या शरीरात हे अर्धमेले जीवाणू- विषाणू सोडले जातात की आपले शरीर त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त प्रतिपिंडे तयार करेल, त्याला आपण लस (Vaccine) म्हणतो, लहानपणापासून आपण खूप लसी घेत आलो आहोत. सध्या कोरोनाचीही लस घेतली जात आहे.

कशी तपासली जाते रोग प्रतिकारक शक्ती?

आता कोरोनाची लस घेतल्यानंतर काही लोक तपासून पहात आहेत की शरीरात कितपत प्रतिपिंडे तयार झाली आहेत. याला Antibody Testing म्हणतात. ज्याप्रमाणे कोरोना विषाणू शरीरात आहे की नाही, हे तपासण्यासाठी RTPCR चाचणी केली जाते. जर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन गेला असेल तर ते तपासण्यासाठी Antibody Testing करण्यात येतं. यांत विशिष्ट प्रतिपिंडे (Specific antibodies) रक्तात आहेत का त्याची तपासणी केली जाते.

काय होतं की एखाद्या विषाणू/ जीवाणूच्या शरीरावर जो एक विशिष्ट रेणु असतो, ज्याला Antigen म्हणतात, त्याला या antibodies जाऊन चिकटतात. या antigen-antibody ची ठराविकता ठरलेली असते. antibody testing करताना या ठराविक antibodies च्या संख्येचं प्रमाण तपासलं जातं. तपासलेल्या अहवालात त्याची अपेक्षित रेंज (range) दिलेली असते. ती १.४० च्या वर असेल तर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे, असा निष्कर्ष निघतो. याचबरोबर एकूण antibodies ची संख्या किती आहे हे ही तपासलं जातं. जर का तुम्हाला कोणताही रोग होऊन गेला असेल तर हा अहवाल १ पेक्षा अधिक असं परीक्षण दाखवतो.

कोरोना विरोधातील प्रतिपिंडे

तसे antibodies चे पाच प्रकार सांगितले गेले आहेत. व पाचही प्रकार सामान्यपणे Y आकारात असतात.
कोरोनाच्या antigen ला IgG हा antibody चा प्रकार चिकटतो. म्हणूनच कोरोनाविरुद्धच्या कोणत्या antibodies आहेत हे समजून येतं. एखाद्या रोगाची लस घेतली की आपलं शरीर भविष्यात त्या रोगाच्या विषाणूशी लढण्यास समर्थ असतं कारण आपल्या शरीरात त्याच्याविरोधात लढणारी प्रतिपिंडे कायम राहतात. पण कोरोनाच्या बाबतीत थोडं वेगळं आहे, आता कोरोनाविरोधात तयार होणार्‍या antibodies त्या ठराविक काळापर्यंत असतात, नंतर त्यांची संख्या कमी होते. आता ही प्रतिपिंडे दीर्घकाळ राहतात का? हा संशोधनाचा भाग आहे. संशोधक सध्या त्यावरच काम करत आहेत.

कोरोनाचं उत्परिवर्तन व त्यावरचं संशोधन

याबरोबरच कोरोना विषाणू (corona virus) चं होणारं उत्परिवर्तन (Mutation) हा ही सध्या महत्वाचा विषय आहे. कोरोनाचे अल्फा (Alfa), बीटा (Beta), गॅमा(Gamma), डेल्टा (Delta), लॅम्ब्डा(lambda), कप्पा (kappa) असे बरेच प्रकार आढळून आले आहेत. आता ज्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या शरीरात प्रतिपिंडे असूनही त्यांना पुन्हा त्रास जाणवतो असं आढळून आलं आहे. उत्परिवर्तन व त्याचे शरीरावर होणारे परिणाम यांवर जसा अभ्यास चालू आहे तसाच उत्पारिवर्तनामुळे प्रतिपिंडांच्यामध्ये काही बदल होऊ शकतो का? हे ही पाहिलं जात आहे. Antibody testing चा उपयोग खरंतर सर्वेक्षण करण्यासाठीच होतो.

काळजी घेतलीच पाहिजे

एकदा कोरोना होऊन गेला किंवा लस घेतली की शरीरात antibodies असतात. त्याची संख्याही तपासली जाते. मग आपण निर्धास्त होतो. पण तसं चालणार नाही. आपल्याला कायमच योग्य ती काळजी घेणं जरूरीचं आहे. कोरोनाचं स्वरूप बदलत आहे, त्याची घातकता वाढत आहे. यांवर भरपूर काळ संशोधन चालू राहणार आहे. तोवर सावधगिरी बाळगणे ही आपली जबाबदारी आहे.
जेंव्हा तुम्ही स्वतःची योग्य काळजी घ्याल तर समाजाची काळजी घेतल्याप्रमाणेच आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.