पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर लक्षात ठेवा 5 गोष्टी, डॉक्टर सांगतात हमखास होणाऱ्या चुका

पावसाळा (Rainy Season) हा ऋतू नको असं वाटणारी माणसं फारच तुरळक आढळून येतील. पावसाच्या कोसळणाऱ्या धारा, हिरवाईनं नटलेली जमीन असं आल्हाददायक वातावरण खूप हवंहवंसं वाटतं. पण या काळात जी नकोशी वाटणारी गोष्ट असते ती म्हणजे आजारपण. हवेतला ओलसरपणा हा जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असतो. यामुळे आपल्या तब्येतीवर याचा दुष्परिणाम होतो.

पावसाळ्यात दुषित पाणीपुरवठा होतो, त्यामुळे पोटाचे विकार हमखास होतात. वातावरणात येणाऱ्या गारव्यामुळे सर्दी-खोकला (Cough), ताप येणे (Fever) असे आजार होतात. या सगळ्यापासून स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी आपण खबरदारी (How to take precaution in rainy season) घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही खबरदारी कशी घ्यायची हे आपण जाणून घेऊयात.

उघड्यावरचे पदार्थ खाताना…

पावसाळ्यात गार हवा असते म्हणून बाहेर सहज उपलब्ध होणारे वडे, भजी सारखे चमचमीत पदार्थ खावेसे वाटणं साहजिक आहे. पण शक्यतो बाहेरचं नाही खाल्लं तर उत्तमच. उघड्यावर असणाऱ्या पदार्थांवर माशा घोंगावत असतात. या माशा कुठं ही वावरत असतात. त्या उघडया ठेवलेल्या पदार्थांवर बसल्यामुळे संसर्गासाठी (Infection) जीवजंतूंचं सहज वहन करतात.

बाहेरचे पदार्थ बनवताना योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली आहे का? याबद्दल काहीच माहिती नसते. यामुळे तब्येतीला अपाय होण्याचा संभव असतो. म्हणून ताजे घरी बनवलेले पदार्थ खावेत. बाहेरगावी असू तर अतिशय स्वच्छ जागी बनवलेले पदार्थ खावेत.

सहज पचणारे व गरम पदार्थ खावेत.

पावसाळ्यात बऱ्याच वेळेस अपचनाचा त्रास जाणवतो कारण पोटामध्ये आम्लाचं प्रमाण (Acidity) वाढलेलं असतं, त्याचबरोबर पचनाचा वेग मंदावलेला असतो. या काळात वातविकार बळावतात. म्हणून एकाच वेळेस भरपूर खाऊ नये. थोड्या प्रमाणात खावं. वातकारक जड पदार्थ खाऊ नयेत. थंड तसेच आंबवलेले पदार्थ खाणं टाळावं. गरमागरम पदार्थ खावेत. 

कोणते पदार्थ खावेत व कोणते नको?

या काळात आले, सुंठ यांचा आहारात समावेश करावा. जंतूंचा नायनाट करण्याची ताकद आल्यामध्ये असल्यामुळे आले फायदेशीर ठरते. सैंधव मीठाचा आहारात समावेश करावा. त्याचबरोबर शुद्ध देशी तूप (Ghee) खावं. पावसाळ्यात वाताचा त्रास खूप होतो म्हणून वात वाढवणारे कोणतेही पदार्थ म्हणजे हरभरा, छोले यासारखी कडधान्ये न खाणं चांगलं. पण पातळ पेजेसारखी करून किंवा चरचरीत फोडणी टाकून खावे.

पाणी पिताना सांभाळून..

पाण्यामुळे बरेच पंचनसंस्थेचे आजार होतात म्हणून पावसाळ्यात पाणी उकळून प्यावं, हे कायमच सांगितलं जातं. पाण्यात छोटा तुरटीचा तुकडा फिरवून घ्यावा व मग ते उकळून घ्यावं. छोटासा आल्याचा तुकडा टाकून पाण्याला उकळी काढली तर त्याचा चांगला परिणाम जाणवतो. यामुळे पोटातील मंद झालेल्या अग्नीला चालना मिळते, व भूक वाढते. वाताच्या समस्येलाही आळा बसतो. 

तर निरोगी राहून पावसाळ्याचा आनंद घेता येईल.

छान गार वातावरणात पावसाचं पाणी अंगावर घेता यावं म्हणून छोटेखानी सहलीला बहुतांश जण जात असतात व मनसोक्त भिजत असतात. पण भिजून झाल्यावर लगेच कोरडे होत नाहीत. म्हणून पावसात खरंतर जास्त भिजू नये. जर भिजलो असू तर त्वरित कपडे बदलून स्वतःला कोरडं करावं. गरम कपडे वापरावेत.

आपण पावसाळ्यात सतत पाण्यातून ये जा करत असतो. भिजल्यावर अंग पुसून घेतो पण सगळ्यात दुर्लक्षित करतो ते म्हणजे आपले पाय. पाण्याच्या संपर्कात आल्याने चपला चावणे, पायाला जखमा होणे, बुरशीचा संसर्ग होणे अशा गोष्टी होत असतात म्हणून पाय जितक्या लवकर कोरडे करता येतील ते पहावं. वात प्रकोप टाळण्यासाठी एरंडेल तेलासारखे पदार्थ घेऊन पोट साफ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

आता ही माहिती वाचून आपल्याला काळजी योग्य प्रकारे कशी घ्यायची हे तर आता कळलं आहेच. तर त्याप्रमाणे काळजी घेऊन आपण हाच नव्हे तर प्रत्येक पावसाळा मस्त एन्जॉय कराल अशी अपेक्षा आहे.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole