सोशल मीडियावर नाही, फील्ड वर काम करणारा खमक्या अधिकारी..!

आपल्या समाजात विशेषतः तरुण मुलांना हेवा कुणाचा वाटत असावा तर जी व्यक्ती पोलीस दलात दाखल होते तिचा, कारण अंगावर येणारी वर्दी त्यामुळं खरच साहजिकच व्यक्ती रुबाबदार भासतेच, आपसूकच आजूबाजूचे दबकतात. या व्यक्ती नुसत्याच रुबाबदार नाही तर जबाबदार पण असतात. जबाबदारीच्या जाणिवेतूनच ते आपलं काम करत असतात. पोलिस खात्यात ड्युटी हा शब्द बहुतकरून वापरला जातो. तो बॉडीगार्ड सिनेमातला संवाद नाही का! “ड्युटी याने कर्तव्य और कर्तव्य को छोडते नही उसका पालन करते हैं!” अगदी असंच आयुष्य असतं ना या पोलीस लोकांचं…सण वार काही न बघता कायम कर्तव्य पालनासाठी तयार.

हे पोलीस-कलेक्टर वगैरे व्हायचं म्हटलं की मुलं-मुली लगेच स्पर्धा परीक्षा क्लासेस लावतात, बरं छोट्या शहरात जर क्लास असेल तर ठीक नाही तर थेट गाठावं लागतं पुणे तिथं पास होईपर्यंत नवी पेठ, सदाशिव पेठेत कुठंतरी खोली, जवळच क्लास, मेस व अभ्यासिका हेच या परीक्षार्थी मुलामुलींचं आयुष्य झालेलं असतं. ज्याच्याकडे पैसा आहे तो हे करू शकतो, पण याच्या उलट ग्रामीण किंवा निमशहरी भागांत राहून खाजगी क्लास न लावताही, स्वतः अभ्यास करून पहिल्या दुसऱ्या प्रयत्नातही पोस्ट मिळवणारे विद्यार्थीही आहेत. असंच एक नाव ज्याची फारशी चर्चा होत नाही, DYSP Suresh Patil.

संपूर्ण नाव सुरेश आप्पासो पाटील, मूळ गाव गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. कागल नवोदय विद्यालयात शालेय शिक्षण घेऊन त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यांची नियुक्ती सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बीड मध्ये आहे. त्यांचे वडील सैन्यात होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच वर्दीबद्दल एक आपुलकी निर्माण झाली होती. त्याचबरोबर त्यांना इंग्रजीची आवड, म्हणून त्यांना इंग्रजीत शिक्षण घ्यायचं होतं. नवोदय विद्यालयात गेल्यामुळे त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. दुर्दैवानं ते आठवीत असताना वडिलांचं निधन झालं. आईच्या खांद्यावर आता घराचा भार आला होता. आई व शिक्षण सोडून देऊन बसलेला मोठा भाऊ यांनी ठरवलं की शेतात काम करून घर चालवायचं व सुरेश यांना त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी मदत करायची, सुरेश अधिकारी होईपर्यंत त्यांना पाठिंबा दिला व सर्वतोपरी सहाय्य केलं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यांनी एका छोट्या कंपनीमध्ये नोकरीही केली. २०१६ मध्ये ते पोलीस अधिकारी म्हणून निवडले गेले. याआधी त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या दोन्ही परीक्षा दिल्या होत्या, त्यांत त्यांचं यश थोडक्यात हुकलं. पण २०१६ मध्ये विक्रीकर अधिकारी व पोलीस अधिकारी अशा दोन्ही परीक्षा पास झाले पण त्यांनी पोलीस खातंच निवडलं….

ट्रेनिंगनंतर DYSP Suresh Patil यांची पहिली नियुक्ती झाली ती कळंब उस्मानाबाद मध्ये. कायदा सुव्यवस्थेला कायम आव्हान असणारं वातावरण उस्मानाबाद मध्ये असतं, इथे जातीय-धार्मिक तणाव असतो. यावर उपाय करण्यासाठी, समाजात बंधुभाव टिकून रहावा यासाठी सर्व धार्मिक नेते व धर्मगुरू यांना एकत्र करून ‘सद्भावना बैठकीचं’ आयोजन केलं. शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम केलं. सर्व उत्सव धार्मिक उपक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडले. या परिसरात फासेपारधी समाजाची संख्या जास्त आहे. चोऱ्या-माऱ्या यासाठी हा समाज आजही बदनाम आहे. पण फक्त कायद्याचा बडगा न उगारता या समाजात प्रबोधन करण्यासाठी, सक्षरता व सुशिक्षितपणा वाढवा यासाठी चांगले उपक्रम राबवले.

सध्या पाटील सर हे माजलगाव बीड मध्ये कार्यरत आहेत. इथं काम करताना त्यांचा भर महिला अत्याचार विरोधी व जातीय अत्याचार प्रतिबंधक या प्रकारच्या खटल्यांवर आहे. अट्रोसिटी च्या खटल्यात केवळ तो खटला न बघता त्यातला पीडित लोकांना शक्य होईल त्या पातळीवर मदत ते करत आले आहेत. बीड जिल्हा पोलिस ‘भरोसा सेल’चे समन्वयक ही सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर आहे. याच्यामाध्यमातून त्यांनी महिला वर्गाचा भरोसा जिंकत वेगाने तक्रारी सोडवून महिलांचा पाठीराखा भाऊ ठरले आहेत.

त्यांची पोलीस उपाधिक्षक म्हणून जेंव्हा निवड झाली, तेंव्हा ना कुठे सत्कारात, ना कुठल्या क्लासचे फ्लेक्स इथं आजवर पाहिलं गेलंच नाहीए, इन्स्टाग्राम, फेसबुकवरही ते दिसत नाहीत. पण कामात नाणं खणखणीत वाजवल्यामुळे त्यांचं कौतुक होत असतं. अधिकारीपदावर असूनही खऱ्या अर्थाने लोकसेवा करणारे अधिकारी व्यक्ती कमीच असतात.

ही MPSC Success Story सांगण्याचा उद्देश हाच कि, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सामाजिक भान, संवेदना फक्त लेख-निबंधात लिहायच्या गोष्टी नाहीत त्या कशा अंमलात आणायच्या याचं मूर्तिमंत उदाहरण!.!.! तर प्रसिद्धीला बाजूला सारून म्हणजे प्रसिद्धीपरांगमुख, कर्तव्य पार पाडण्यासाठी कायम तत्पर म्हणजे कर्तव्यापारायण असणाऱ्या सुरेश पाटील यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्याला सलाम !.!.!


SOLVE Daily MPSC Quiz

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.