उन्हाळ्यात वजन कमी करताना असा घ्यावा आहार

आपण वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय करत असतो. त्यात हवामानाचाही विचार करावा लागतो. कारण हिवाळा आणि पावसाळा थंड हवेचे ऋतु आहेत, त्यातही पावसामुळे व्यायामात खंड पडू शकतो. तर हिवाळ्यात थंडीमुळे उबदार वातावरणातून बाहेर पडावे वाटत नसते. तरीही बहुतांश लोक थंडीमध्येसुद्धा घाम गाळून व्यायाम करतात. राहता राहिला उन्हाळा, त्यात वजन कमी करण्यासाठी थोडी मदत मिळू शकते कारण उन्हाळ्यात घाम येतो व जेवणही तुलनेने सहज पचेल असे घेतले जाते. 

पण उन्हाळ्यात वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची म्हणजे सकस, हलके आणि सुपाच्य असे ताजे अन्न सेवन करणे. आहाराकडे नीट लक्ष देऊन व्यायामाची दैनंदिनी ठरवा. वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत आहारही फार महत्त्वाची भूमिका बजावतो. 

उन्हामुळे होणाऱ्या काहिलीने शरीरातून घामावाटे पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे पाणी, संत्रे, कलिंगड, खरबूज, ही रसदार फळे, फळांचे रस, काकडी, बीट सारख्या भाज्या आहारात जरूर समाविष्ट करा. तसेच प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि मेदवृद्धी न करणारे कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करा. त्यातही वजन कमी करण्यासाठी भाज्या व फळे यांचे अधिकाधिक सेवन करावे. त्या व्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी खालील पदार्थांचे जरूर सेवन करा. 

विविध प्रकारची सुप्स

उन्हाळ्यात भरपेट जेवण काही जात नाही. वजन कमी करायचे तर सुपासारखा पोटभरीचा पण हलका पदार्थ जरूर सेवन करा. उन्हाळा असल्याने गरम सूप पिणे टाळून गार सूप प्या. त्यासाठी काकडी, बीट, गाजर, दुधी, पालक यांचा वापर करू शकता. रात्रीच्या वेळी पोटभरीचा पण वजन वाढू न देणारे सुपरफूड म्हणजे सूप.

काळे मनुका

आहारात काळ्या मनुकांचा समावेश करा. त्यामुळे पोट साफ राहण्यासही मदत होते. सकाळी किंवा रात्री पाण्यात दहा बारा बियांच्या मनुका भिजवून ठेवाव्यात, त्याचे झोपण्यापुर्वी किंवा सकाळी उठल्यावर सेवन करावे. पचनसंस्था स्वच्छ राहिली तर अन्न योग्य प्रकारे पचते त्यामुळे वजन वाढण्यास अटकाव होतो. 

टरबूज, कलिंगड 

उन्हाळ्यात घामावाटे पाणी बाहेर पडते त्याबरोबर क्षारही बाहेर पडतात. वजन नियंत्रणात राहून शरीराला पोषण देण्यासाठी खरबूजाचे सेवन करावे. टरबूजामुळे शरीराचे हायड्रेशन म्हणजे पाण्याची तहान भागवते. टरबूज खाल्ल्याने भूक कमी लागत असल्याने आहारावर आपोआप नियंत्रण राहाते. 

स्मूदीज

वजन नियंत्रणात म्हणजेत आटोक्यात ठेवण्यासाठी हा एक अफलातून प्रकार आहे. फळांच्या स्मूदीज प्यायल्याने शरीराची जीवनसत्व, खनिजांची गरज भागते आणि वजनही नियंत्रणात राहाते. खरबूज, टरबूज, ब्लुबेरी, आंबा, केळी या फळांच्या स्मुदीज भूकही शांत करतात. 

ओटस् 

हा पदार्थ सध्या भाव खातो आहे. उन्हाळ्यात भूक भागवण्यासाठी पण कमी कॅलरी देणाऱ्या ओटस् मध्ये प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे साहाजिकच वजन कमी करण्यास मदत करतात. ओटस् मध्ये फळे व बदाम, मनुके असा सुकामेवा घालून त्याचे सेवन करता येते. 

ग्रील्ड भाज्या 

उन्हाळ्यात ग्रील्ड भाज्या हा पोटभरीचा उत्तम प्रकार आहे. कांदे, भोपळी मिरची, गाजर, वांगी आणि लसूण हे ग्रील करून खाऊ शकता. ग्रील्ड असल्यामुळे त्यात तेलाचा वापर कमी होतो साहाजिकच वेगळ्या चवीचे आणि पोटभर अन्नपदार्थ म्हणून या भाज्यांचा वापर करता येतो. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole