अडचणींवर मात करत तुफैल अहमद होऊ पाहतो आहे ….

यशाचं शिखर ज्यांना खुणावत असतं ते ध्यास घेतात ते गाठण्याचं. आर्थिक परिस्थितीशी झगडून परीक्षेत यश मिळवणारे अनेक तरूण तरूणी आपण पाहिले आहेत. पण जिथे जीवाची शाश्वती नाही, सगळी परिस्थितीच अनिश्चिततेची आहे अशा काश्मिर सारख्या दहशतीच्या आणि सोयीसुविधांचा अभाव असलेल्या राज्यांतही ध्येयनिष्ठ तरूण आपले यशाचे शिखर गाठतातच. काश्मिरमधल्या एका लहान गावात राहूनही जिद्दीच्या जोरावर डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या तुफैल अहमद विषयी जाणून घेऊया. 

तुफैल अहमद हा तरूण श्रीनगरच्या हरवान गावचा राहणारा, त्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणारी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जम्मू-काश्मिर राज्यातला हा पहिला आदिवासी विद्यार्थी आहे ज्याने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जम्मू आणि काश्मिर या भागात सातत्याने दहशतीचे वातावरण असल्याने अस्थिरता कायमच राहिली आहे. या सर्व परिस्थितीत नीट सारखी परीक्षा उत्तीर्ण करणे ही बाब निश्चितच सोपी नाही. तुफैलला यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. 

नीट परिक्षा द्यायची म्हणजे सुयोग्य नियोजन, क्लासेस, इंटरनेटची उपलब्धता असायला हवी आणि नेमके या सर्वांचा अभाव असलेल्या परिस्थितीत तुफैलने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आणि नीट ची परीक्षा उत्तीर्ण केली. 

तुफैलच्या गावात क्लासेस तर नव्हतेच पण इंटरनेटची उपलब्धताही नव्हती. त्यामुळे विषय कसा शिकायचा?, अभ्यास कसा करायचा? सारेच प्रश्न होते. तुफैल ने त्यावर मार्ग काढत युट्युबवरून शिक्षण घ्यायचं ठरवलं. पण गावात इंटरनेटची सुविधाच नाही तर युट्युबवर व्हिडिओ तरी कसे पाहाणार? यावरही तुफैलने उपाय शोधला. त्याने जवळच्या शहरात जाऊन इंटरनेटच्या मदतीने युट्युब व्हिडिओ डाऊनलोड करण्याचा पर्याय शोधला. मग डाऊनलोड केलेले हे व्हिडिओ पाहून तो अभ्यास करू लागला. त्यातही वीजेचा खेळखंडोबा झाला तर त्या अभ्यासातही खंड पडायचा. 

तुफैलचे गाव लहानसं आहे, त्यात काश्मिर सारख्या राज्यात असल्याने सोयीसुविधांचा आजही अभाव आहे. त्यामुळे गावात कोणालाही वैद्यकीय मदतीची अथवा सेवेची गरज लागली दूर अंतरावर प्रवास करून जाण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामुळे कदाचित तुफैलला डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली असावी. तुफैल म्हणतो ही, मी डॉक्टर झालो की गावकऱ्यांचा वैद्यकीय सेवेसाठी दूर अंतरावर प्रवास करून जाण्याचा त्रास संपेल कारण डॉक्टर झालो की मीच त्यांना सेवा देणार आहे. 

जम्मू-काश्मिर सारख्या दहशतीच्या छायेखाली असणाऱ्या भागात तुफैल सारखा ध्येयनिष्ठ तरूण ज्या अडचणींना तोंड देऊन आपली स्वप्नपुर्ती करण्यासाठी धडपडतो ही गोष्ट नक्कीच वाखाणण्यासारखी म्हणावी लागेल. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole