चालू घडामोडी- 07 जुलै 2021

रद्द कायद्यान्तर्गत पोलिसांकडून कारवाई
- आयटी कायदा ६६ ए (IT act 66 A) असंविधानिक घोषित करूनही या प्रकरणी पोलीस ठाण्यात FIR नोंदवल्या जात आहेत. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
- एक स्वयंसेवी संस्था PUCL ने या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २०१५ मध्ये आय टी कायदा ६६ ए ला असंविधानिक घोषित करूनही याचा पोलीस स्टेशन व ट्रायल कोर्टात वापर केला जात असल्याचं याचिकेत म्हणलं आहे.
- तसेच या विषयावर कोर्टाने या आठवड्यात सरकारकडे जाब मागितला आहे.
- तसेच देशभरातील सर्व पोलीस ठाण्यात या अंतर्गत FIR नोंदवू नये म्हणून केंद्राने सल्लागार जारी करावा. या कलमांतर्गत पोलीस ठाण्यामध्ये प्रलंबित एफआयआर/ तपास आणि कोर्टाच्या प्रकरणाचा डेटा केंद्राने द्यावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.
नवेगाव-नागझिऱ्यात काळा बिबट्या
- नवेगाव- नागझिरा व्याघ्रप्रकल्पात नवेगाव क्षेत्रात दुर्मिळ असा काळा बिबट्या आढळला आहे.
- विशेष म्हणजे या वेळी एक सामान्य बिबट्याही या काळ्या बिबत्याबरोबर फिरत होता.
- यापूर्वी २०१९ मध्ये ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पात, २०२० मध्ये पेंच व्याघ्रप्रकल्प आणि सिंघुदुर्गातील आंबोली घाटात काळा बिबट्या आढळल्याची नोंद आहे.
- काळा बिबट्याही सर्वसाधारण बिबट्याच असून ती वेगळी प्रजाती नसल्याचे त्या वेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
- शरीरात ‘मॅलॅनिन’ (Melanin) रंगद्रव्य अधिक प्रमाणात असल्यास शरीर काळे दिसते. त्यामुळे बिबट्याच्या शरीरावरील ठिपकेही दिसत नाहीत.
- ताडोबा व्याघ्रप्रकल्पात नंतर तो अनेकदा दिसला.
- पेंच व्याघ्रप्रकल्पात पहिल्यांदा पर्यटकांना काळा बिबट्या दिसला, पण त्याचं दर्शन काही सेकंदाचंच होतं.
- त्यामुळे छायाचित्र काढता आले नव्हते. त्यांनतर मात्र पर्यटकांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
भारतात ५० वर्षांत उष्णतेच्या लाटांचे १७ हजार बळी
- १९७१ ते २०१९ या काळातील ७०६ उष्णतेच्या लाटांतील घटनांचा अभ्यास करून या संशोधन निबंधांचे लेखन पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम. राजीवन यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिक कमलजीत राय, एस.एस. राय, पी. के, गिरी, ए.पी. डिमरी यांनी केले आहे.
- १९७१ – २०१९ या काळात अतितीव्र हवामान स्थितीत भारतात १ लाख ४१ हजार ३०८ बळी गेले असून त्यात १७,३६२ मृत्यू हे उष्णतेच्या लाटेने झाले आहेत.
- त्यातही हे प्रमाण एकूण मृत्यूच्या बारा टक्के आहे.
- जास्तीत जास्त उष्णतेच्या लाटा आंध्रप्रदेश, तेलंगणा व ओडिशात आल्या आहेत.
- मूलभूत उष्णता लाट विभाग या वर्गावारीचा विचार करता मे महिन्यात अशा घटना जास्त प्रमाणात घडल्या आहेत.
- मूलभूत उष्णता लाट विभागात पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेश, व तेलंगणा, यांचा समावेश आहे.
भाजपाचे १२ आमदार निलंबित
- इतर मागासवर्गीयांचे (OBC) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी सोमवारी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.
- अध्यक्षांच्या दालनात पीठासीन आधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
- गिरीश महाजन, आशिष शेलार, संजय कुटे, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, नारायण कुचे, हरीश पिंपळे, राजकुमार रावळ, राम सातपुते, योगेश सागर, पराग आळवणी, किर्तीकुमार भांगडीया
- या निलंबनाच्या काळात या आमदारांना विधानभवनाच्या आवारात प्रवेशबंदी आहे.
किल्ले पर्यटन योजना
- या योजनेत राज्यातील अवर्गीकृत किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मूलभूत सोयीसुविधा तसेच अनुभवजन्य पर्यटन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- त्यासाठी राज्य शासनाने किल्ला पर्यटन योजना प्रस्तावित केली आहे.
- राज्यात ४०० पेक्षा अधिक किल्ले आहेत. त्यापैकी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित ४७, तर राज्य पुरातत्व विभागाकडे ५१ किल्ले आहेत. हे किल्ले वर्गीकृत आहेत.
- या शिवाय अन्य ३३७ अवर्गीकृत किल्ले आहेत.
- त्यात महसूल व वन विभागाच्या अखत्यारितील, तसेच खाजगी मालकीच्या किल्ल्यांचाही समावेश आहे. खासगी मालकीचे किल्ले वगळून उर्वरित अवर्गीकृत तसेच महसूल व वन विभागाच्या ताब्यातील किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटन मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य पर्यटन उपलब्ध करून देणे यासाठी किल्ले पर्यटन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.